इको फ्रेंडली गणेशमूर्ती द्वारे पिंपळे सौदागरवासियांनी दिला पर्यावरण वाचवाचा संदेश

इको फ्रेंडली गणेशमूर्ती द्वारे पिंपळे सौदागरवासियांनी दिला पर्यावरण वाचवाचा संदेश
  • बालचमूंसह थोरा मोठयांनी साकारल्या शाडू मातीपासून गणेशमूर्ती..
  • उन्नती सोशल फाउंडेशनच्या अनोख्या गणपती महोत्सवाची परिसरात चर्चा…

पिंपरी : स्वयंसेवी संस्थांनी एखादी समाजाच्या हिताची कल्पना मांडली, तिला जागरूक लोकांनी प्रतिसाद दिला आणि ती जोपासली तर किती व्यापक क्रांती होऊ शकते, याचे समर्पक उदाहरण आहे उन्नती सोशल फाउंडेशन आणि तिचा गणपती महोत्सव २०२२ अंतगर्त ‘इको फ्रेंडली गणेशोत्सव’! निसर्गावर कोणताही ओरखडा येऊ नये यासाठी परिसरातील बालचमूंसह थोरा मोठयांना शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती कशा बनवायच्या याची मोफत कार्यशाळा यंदाही पिंपळे सौदागर परिसरात उत्साहात पार पडली. परिसरातील जवळपास हजार नागरिकांनी या मोफत कार्यशाळेचा लाभ घेतला.

सुरुवातीला दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास उन्नती सोशल फाऊंडेशन तथा भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई भिसे, उद्योजक संजय भिसे, प्रमुख पाहुणे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेत भगवान भोसले, दिपाली देशमुख व सुधीर लांडगे या कला प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणपती कसे बनवायचे? याचे प्रात्यक्षिक दाखवून मुलांकडून पर्यावरणपूरक गणेशमुर्त्या बनवून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचा आनंद लुटला. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी कला शिक्षकांनी अतोनात परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्ट गणपती बनविलेल्या मुलांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले व सर्व उपस्थित मुलांचे कौतुक केले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुंदाताई भिसे म्हणाल्या, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे स्वरूप, त्याचा आयाम आता पूर्णपणे बदलतो आहे. गणपती बनवताना पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. नद्या या आपल्या जीवनदात्या म्हणून ओळखल्या जातात. मात्र, विघ्नहर्त्यांच्या प्लास्टरच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण होऊन पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. पर्यावरणाचा समतोल कसा राखावा यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात, विहिरीत विसर्जित करून ते पाणीसाठे दूषित करण्याऐवजी शाडूच्या गणेशमूर्ती पुजून नंतर त्या कृत्रिम जलकुंडात विसर्जित करणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी शाडू मातीच्याच मूर्ती बनविण्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.