पंकज कुमार
तुम्हाला दोन वर्षांपुर्वीची दिल्लीच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलची घटना आठवते? दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या सात वर्षाच्या चिमुकल्या मुलाची शाळेच्याच वॉशरूममध्ये दोनदा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. सोशल मिडीयावर त्याचा मृतदेह पाहून मन विषाण्ण झालं, राग द्वेष सगळ्या भावना एकदम उफाळून आल्या. पोलिसांनी चोवीस तासांच्या आत त्याच शाळेच्या बस ड्रायव्हरला अटक केली, बस ड्रायव्हरने त्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केली असे सांगितले. बस ड्रायव्हर ने लगेच गुन्हा कबूल सुद्धा केला. मिडीयाने वारंवार कहाण्या सांगून, मल्टीमिडीया प्रेझेंटेशन दाखवून आपल्या कल्पकतेला जणू हायजेक केले. हेच सत्य आहे असे आपल्या मनात बिंबविले. संपूर्ण प्रकरण आणि घटना आपल्याला अगदी क्लियर दिसू लागल्या. लोकांच्या भावना तिव्र होत्या, आरोपी ड्रायव्हरला भर चौकात फाशी द्या, जनतेच्या हवाली करा, गोळ्या घाला वगैरे वगैरे.
तिकडे मृत मुलाच्या वडीलांना समाधान नव्हतं, ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. कोर्टाने सीबीआय तपासाचा फर्मान दिला. सीबीआय ने योग्य फिल्डींग लावली, कोण घटनास्थळी वारंवार येतो, घटनेच्या संदर्भात कोण नियमीत अपडेट घेतो, यावर बारिक नजर ठेवली. लवकरच त्याच शाळेचा वरच्या वर्गाचा एक विद्यार्थी त्यांच्या नजरेस आला. परिक्षा आणि पीटीएम पुढे ढकल्या जाव्यात म्हणून या सोळा वर्षे वयाच्या मुलाने ही निर्घूण हत्या केली होती.
हे सगळं व्हायला दोन तीन महिने लागले, पुढे पाच महिन्यानी त्या ड्रायव्हरची कोर्टाने ससम्मान सुटका केली. निर्दोष आहे हे सिद्ध होऊन सुद्धा त्याला सुटायला अजून तीन महीने लागले कारण जामीन घ्यायला त्याच्याकडे पैसे नव्हते. आज तो ड्रायव्हर पोलीसांचा मार खाऊन खाऊन कायमचा जायबंदी झाला आहे. या घटनेनंतर जर सरकार किंवा पोलीस तिव्र जनभावनेच्या आहारी गेली असती तर? त्या ड्रायव्हरला एनकाऊन्टर केला असता तर? न्याय झाला असता? खरा आरोपी अधीक आत्मविश्वास कमावून शुल्लक कारणांसाठी पुढची हत्या करायला सज्ज झाला नसता?
मिडीया जे आपल्याला दाखवते, आपल्या मनावर जे बिंबवते ते खरंच सत्य असते? आपल्या भावना, आपल्या समजूती खरंच सत्यावर आधारित असतात?
आता आरूषी तलवार हत्येकडे…सुरुवातीचे दोन दिवस पोलीस आणि मिडीया हा दरोडा आहे हे सांगत होती, आपण ते सत्य मानलं. तिसऱ्या दिवशी पोलीस आणि मिडीया सांगायला लागली की आरूषीचे अभिभावक तलवार दंपत्ती लैंगिक चाळे करत असत हे आरूषीला माहिती होते, त्यामुळे ती तेरा वर्षाची पोर सुद्धा नोकरा बरोबर हेच करत होती. हे बघून तलवार दंपत्ती यांचा तोल सुटला आणि संतापाच्या भरात त्यांनी तिची हत्या केली. आपण हे सुद्धा सत्य मानलं. पुढे सीबीआय म्हणाली नोकर पार्टी करत होते आणि त्यांनीच ही हत्या केली. मिडीयाने नव्याने आपल्या मनावर हे बिंबविले. आता हे नवीन सत्य आपल्याकरिता शाश्वत होते. वर्ष दोन वर्षे नोकर तुरुंगात राहिले, सीबीआय ला नोकरांविरूद्ध कोणतेही पुरावे सादर करता आले नाहीत, नोकर सुटले. तपासात दिरंगाई होत आहे म्हणून तलवार दंपत्ती पुन्हा कोर्टात गेली. आता सीबीआय तलवार दंपत्ती वर चिडली, हत्या यांनीच केली असे सांगत तलवार दंपत्ती यांच्यावर केस केली. लोवर कोर्टाने सीबीआय ची केस मान्य करत त्यांना तुरुंगात टाकले. आता हे नवीन सत्य आपल्या मनावर बिंबविले गेले. काही वर्षांनी वरच्या कोर्टाने तलवार दंपत्ती यांची निर्दोष मुक्तता केली. आता हे आपल्याकरिता सत्य होतं.
खरंच आपण सत्य जाणतो? की मिडीयाने जे सांगितले तेच सत्य. दोन वर्षांपूर्वी मरीन लाईन्स मध्ये देशाच्या सर्वात श्रीमंत एका रईस जाद्याने एका तरुणीला कार खाली चिरडले, रातोरात मीडियावरून ही बातमी गायब करण्यात आली, एका दुसऱ्याच गरिबाला गुन्हेगार म्हणून प्रस्तुत करण्यात आलं. केस सुरू आहे.
हैदराबादमध्ये ज्या चौघांनी हत्या करण्यात आली ते खरंच गुन्हेगार होते हे ठामपणे कोण सांगू शकेल? मिडीयाच्या रंगीत प्रेझेंटेशनवर सत्य ठरवणारे आपण, इतक्या लांब बसून हेच ते चार खरे गुन्हेगार, हे ठामपणे सांगू शकतो का? नाही. मात्र न्यायालय हे करू शकते. विषयाची योग्य चिकित्सा करून सत्य हुडकून काढू शकते. ते त्यांचे काम आहे, कर्तव्य आहे, त्यात ते निष्णात आहेत.
अनेक ओपिनीयन पोल पाहिले, प्रत्येक पोल मथ्ये नव्वद पेक्षा जास्त लोकं या एनकाऊन्टर समर्थन करताना दिसतात. अनेकांना वाटतं हीच लोकशाही आहे. लोकं समर्थन करताहेत मग जे केलं ते योग्य आहे. परंतु ही लोकशाही नाही, हा निव्वळ बहुसंख्यवाद आहे. देशाच्या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचणं, त्याची मतं जाणून घेणं, त्या मताला महत्त्व देणं, त्या प्रत्येकाला न्याय देणं ही लोकशाही आहे. ही लोकशाही आपल्याला मोठ्या महत्तेने शेकडो वर्षांच्या तपश्चर्येनंतर मिळाली आहे. मध्ययुगापासून समाज सुधारकांची, संताची मेहनत, क्रांतिकारकांचा, स्वंतत्रता संग्राम सैनिकांचा त्याग हे सगळं मिळून आपल्या या आत्ताच्या पिढ्यांना आयतं ताट मिळालं आहे. जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.
व्यवस्थेत ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी तीव्र आंदोलन झालीच पाहिजेत. परंतु पोलिसांनी त्यांनीच घेतलेल्या शपथा मोडून केलेल्या अश्या कुकृत्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही.