सराफ बंधूंनी नाट्यसेवेची परंपरा नेटाने सुरु ठेवली – माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार

संगीत नाटकांसाठी सवलतीत यशवंत नाट्यगृह उपलब्ध होणार – प्रसाद कांबळी

सराफ बंधूंनी नाट्यसेवेची परंपरा नेटाने सुरु ठेवली - माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार

मुंबई : सावकार, सराफ, शिलेदार आणि संगीत नाटक या चौघांमधे सामायिक “स”आहे या “स” मधून एकच रक्तशलाका वाहते ती म्हणजे संगीत रंगभुमीच्या हितासाठी काम करणं. आज आमचा जो सन्मान अशोक सराफ व सुभाष सराफ या बंधुंनी केला आणि नाटक सेवेसाठी कौतुक करत नाट्यप्रयोग गोपीनाथमामांच्या जन्मदिनी सादर करण्याची संधी दिली तिने सराफ सावकार घराण्यापासून आलेल्या संगीत रंगभुमीच्या प्रेमावर मोहोर उमटवली आहेअसे प्रांजळ मत माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांनी व्यक्त केले.

श्री गोपिनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधीच्या वतीने नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या ११०व्या जयंती निमित्ताने संगीत ययाती आणि देवयानी नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात करण्यात आले होते.त्या प्रसंगी संगीत रंगभूमीवरील योगदानासाठी कीर्ती शिलेदार आणि दीप्ती भोगले (लता शिलेदार) यांना मानचिन्ह, सन्मानपत्र,शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचरोबरीने “गंधर्व भूषण जयराम संगीत नाट्य सेवा ट्रस्ट” या शिलेदार भगिनिंच्या विश्वस्त संस्थेला संगीत नाटकांची सेवा करण्यासाठी धनादेश देण्यात आला.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी,विश्वस्त निधीचे अध्यक्ष अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे हस्ते हा सन्मान करण्यात आला. संस्थेचेकार्यवाह रविंद्र ढवळे व शीतल करदेकर यांनी मानपत्राचे वाचन केले. कीर्ती शिलेदार यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, रंगदेवता रघुवीर सावकार यांच्या “रंगबोधेच्छु” संस्थेतून माझे वडील जयराम शिलेदार यांची नाट्य कारकिर्द सुरु झाली. वसंत सावकार व गोपीनाथ सावकार हे रघुवीर सावकारांचे बंधू. तर प्रसाद सावकार चिरंजीव. सावकार घराण्याचा हा वसा सराफांकडेही आला. अशा प्रकारे संगीत नाटकाला आधार देण्याचं काम सराफ बंधु आपल्या मामांच्या नावाने सुरु केलेल्या विश्वस्त संस्थेद्वारे अविरत करत आहेत आणि त्याद्वारे संगीत नाट्यप्रेमाची मोहोर उमटवून त्यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे .

श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश़्वस्त निधीचे अध्यक्ष अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की माझ्या व्यावसायिक नाटयक्षेत्राची सुरूवात संगीत ययाती आणि देवयानी या नाटकाने झाली.वि.वा. शिरवाडकरांची ओघवती भाषा ,प्रत्येक वाक्यात खोलवर अर्थ असलेले संवाद आणि माझे मामा व गुरु गोपीनाथ सावकार यांचेअप्रतीम दिग्दर्शन असा योग असल्यावर नाटकाला यश हे मिळणारच!

सराफ बंधूंनी नाट्यसेवेची परंपरा नेटाने सुरु ठेवली - माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार

मी या नाटकाचे३००प्रयोग केले. त्यानंतरमी मागे वळून पाहिलं नाही. संगीत रंगभुमी आणि नंतरची नवीन नाटकं या मधला मी एक दुवा आहे.आणि म्हणूनच यावर अधिकारवाणीने मी बोलू शकतो.संगीत नाटक टिकवण्याचे काम ज्या मोजक्या लोकांनी केलं त्यापैकी महत्त्वाचे नाव म्हणजे जयराम व जयमाला शिलेदार आणि त्यांची “मराठी रंगभूमी, पुणे” ही संस्था!आजवर मराठी रंगमूमी ही आपल्या वडिलांची नाट्यसंस्था अविरत सुरु ठेवून संगीत रंगभूमीचे संवर्धन दोघी शिलेदार भगिनी करत आहेत.म्हणून त्यांचा सन्मान तोही मामांच्या जयंतीला आणि तेही माझ्यापहिल्या नाटकाच्या सादरीकरणासोबत होतोय हा दुर्मिळ योग आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनी आपल्या गुरुंना आदरांजली वाहताना सांगितले की गोपीनाथ सावकार म्हणजे माझे बाबा नसते तर ही मी जी काही आशालता आहे ती दिसले नसते.त्यांचे ऋणात रहाणे मी पसंत करीन.गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधीचे विश्वस्त सुभाष सराफ यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले आणि प्रस्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती देताना संगीत नाटकांची परंपरा जपण्यासाठी आपली संस्था कार्यरत असल्याचे सांगितले. संगीत नाटक करत असताना येणारी अडचण म्हणजे नाट्यगृहाचे भाडं आहे. संगीत नाटकं चालली पाहिजेत आणि त्यासाठी प्रायोगिक नाटकांप्रमाणे संगीत नाटकांनाही कमी भाडे आकारून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने प्रोत्साहन द्यावे अशी विंनतीवजा मागणी त्यांनी परिषदेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे पाहूणे प्रसाद कांबळी यांचेकडे केली.

प्रसाद कांबळी यांनी आपल्या छोटेखानी भाषणात “यशवंत नाट्यमंदिर” हे प्रायोगिक नाटकांप्रमाणेच संगीत नाटकांना रू.चार हजार भाडे आकारुन उपलब्ध करून देऊन सहकार्य करू”असे जाहीर केले.तसेच “आज संगीत रंगभुमीबरोबरच इतरही नाटकांनाही रसिक प्रेक्षकांची उपस्थिती गरजेची आहे” असे आवाहनही नाट्यनिर्मात्यांच्या वतीने केले.याप्रसंगी संगीत ययाती आणि देवयानी या दिप्ती भोगले दिग्दर्शित नाटकाचा प्रयोग उत्तम रितीने सादर करण्यात आला आणि त्यातील चिन्मय जोगळेकर, स्वरप्रिया बेहेरे, निनाद जाधव, श्रध्दा सबनीस, सुदीप सबनीस या तरुण कलाकारांनी प्रयोगाची रंगत वाढवली आणि उपस्थित दर्दी संगीत नाटक रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवत आनंद दिला.