इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढवणार – अजित पवार

बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ग्वाही

इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढवणार - अजित पवार

मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आता हा पुतळा ३५० फुटांचा असणार आहे तर स्मारकाची उंची ४५० फूट असेल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या सुधारित प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुतळ्याची उंची वाढणार असल्याने आता या स्मारकाच्या खर्चातही वाढ होणार आहे. आधी स्मारकासाठी ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च होता आता तो ९९० कोटींवर जाणार आहे. परंतु बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी दिली.या स्मारकाचे काम दोन वर्षांत पूर्ण करणार असल्याच्या आपल्या घोषणेचा त्यांनी पुनरूच्चार केला. राज्य सरकारच्या सर्व परवानग्या या प्रत्येक विभागाच्या सचिवांनी ८ दिवसात पूर्ण करायच्या आहेत असे आदेशही दिले असल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले.

येत्या २१ जानेवारीला आदरणीय खासदार शरद पवार साहेब इंदू मिलला भेट देणार असल्याचेही अजितदादा पवार यांनी सांगितले.पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढणार आहे. स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल, ६८ टक्के जागेत खुली हरीत जागा असेल. तसेच या ठिकाणी ४०० लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग व कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. १००० लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल, अशी माहितीही अजितदादा पवार यांनी दिली.