आर्थिक महासत्ता होण्यासाठी ‘रिसर्च ॲण्ड नॉलेज बेस इकॉनॉमी’ हवी – डॉ. अरविंद नातू

  • पीसीसीओईआर मध्ये ‘अविष्कार 2019’ स्पर्धा संपन्न, साठ अभियांत्रिकी महाविद्यालयांचा सहभाग

आर्थिक महासत्ता होण्यासाठी ‘रिसर्च ॲण्ड नॉलेज बेस इकॉनॉमी’ हवी - डॉ. अरविंद नातू

पिपंरी : सध्याची भारतीय अर्थव्यवस्था ‘सर्व्हिस बेस इकॉनॉमी’ प्रकारातील आहे. भारताला जागतिक महासत्ता होण्यासाठी हि अर्थव्यवस्था ‘रिसर्च ॲण्ड नॉलेज बेस इकॉनॉमी’ मध्ये वाढवावी लागेल. असे मार्गदर्शन आयसरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र येथे (पीसीसीओईआर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने ‘अविष्कार 2019’ या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्‌घाटन प्रसंगी डॉ. नातू बोलत होते.

यावेळी जेकेएलएमपीएसचे संचालक मानसिंग कुंभार, विद्यापीठाच्या आयक्युएसीचे प्रमुखे डॉ. मनिष वर्मा, पीसीसीओईआरचे प्राचार्य हरिष तिवारी, प्रा. डॉ. राहुल मापारी आदी उपस्थित होते.

डॉ. नातू म्हणाले की, सध्या माध्यमांमध्ये, राजकीय, सामाजिक व्याख्यानांमध्ये अनेकदा अर्थव्यवस्था आणि जीडीपी या विषयांवर चर्चा होतात. देशाचा जीडीपी वाढविण्यामध्ये इंजिनिअर्स आणि डॉक्टरांचे मोठे योगदान असते. पालक आपल्या पाल्यांना नववी दहावीत असतानाच तुला इंजिनिअर व्हायचे का डॉक्टर असे विचारतात. परंतू अर्थव्यवस्थेच्या दुष्टीकोनातून विचार केला तर डॉक्टर इंजिनिअर या शाखा ‘रिसर्च ॲण्ड नॉलेज बेस’ आहेत. या शाखांमध्ये संशोधनातून रोज नवीन तंत्रज्ञान विकसित होत असते. जुन्या तंत्रज्ञानाच्या जागी सहज कमी खर्चात उपलब्ध होणारे व वापरता येणारे डिजीटल तंत्रज्ञान वापरुन पर्यावरणपुरक प्रकल्प उभारावेत. असे मार्गदर्शन डॉ. नातू यांनी केले.

मानसिंग कुंभार म्हणाले की, तरुणांनी विनाकारण वेळ वाया घालवत आपली कार्यकुशलता सोशल मिडीयावर दाखविण्याऐवजी स्व:ताच्या व राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी संशोधनाकडे लक्ष द्यावे. प्रास्ताविक स्वागत करताना प्राचार्य डॉ. हरिष तिवारी स्पर्धा आयोजना मागील उद्देश सांगितला. डॉ. मनिष वर्मा यांनी विद्यापीठाच्या वतीने अभियंत्यांना संशोधन व उच्च शिक्षणासाठी मदत करणा-या योजनांची माहिती दिली. ‘अविष्कार 2019’ या स्पर्धेत पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातून साठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील 250 स्पर्धेकांनी आपले प्रकल्प सादर केले. सुत्रसंचालन प्रा.डॉ. त्रिवेणी ढमाले, आभार प्रा. डॉ. राहुल मापारी यांनी मानले.