सावित्रीची लेक कुंदाताई या शेकडो महिलांचा आधारवड – अश्विनी जगताप

सावित्रीची लेक कुंदाताई या शेकडो महिलांचा आधारवड - अश्विनी जगताप
  • उन्नती सोशल फाउंडेशनच्या माधमातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न – कुंदा भिसे
  • पिंपळे सौदागर येथे महिला दिनी विविध क्षेत्रातील महिलांचा ”उन्नती महिला रत्न” पुरस्काराने सन्मान

पिंपरी : पिंपळे सौदागरसह शहरातील महिलांच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील राहत युवतींसह त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून कार्यक्षम समाजसेविका सौ कुंदाताई भिसे करीत आहेत. त्यामुळेच त्यांच्या कार्याचा अफाट पसारा दिवसेंदिवस विस्तारत आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक सांस्कृतिक उन्नती व्हावी या ध्येयाने त्यांची वाटचाल सुरु आहे. ही सावित्रीची लेक शेकडो महिलांचा आधारवड बनू पाहत आहे. यंदा त्या पिंपळे सौदागरचे नेतृत्व करू इच्छित आहेत; त्यासाठी सर्वांनी कुंदाताईंच्या पाठीमागे उभे रहावे, असे प्रतिपादन अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या वतीने पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यान परिसरात शनिवारी (दि. ५) रोजी शहरातील विविध क्षेत्रातील महिलांना “उन्नती महिला रत्न” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी अश्विनी बोलत होत्या. ब्रह्मकुमारी वर्षादीदी, पोलीस उपनिरीक्षक कविताताई रुपणर, सामजिक कार्यकर्त्या शारदाताई मुंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

यावेळी दिवंगत लतादीदींच्या आठवणीना उजाळा देत त्यांनी गायलेल्या अजरामर गीतांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी लक्ष्मण जगताप, नगरसेविका निर्मला कुटे, आरती चोंधे, उषा मुंडे, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, जयनाथशेठ काटे, बबनराव काटे, उत्तम घनवते, पिके इंटरनेशनल स्कूलचे संस्थापक जग्गनाथ काटे, धनंजय भिसे, विजय भिसे, विकास भिसे, विकास काटे, जेष्ठ नागरिक शंकरराव पाटील, हास्य क्लबचे सर्व सदस्य, महिला भजनी मंडळ आणि सर्व सोसायटीचे चेअरमन आणि सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ”माझी तुझी रेशीम गाठ फेम प्रार्थना बहेरे”, सारेगमप फेम अजित विसपुते, प्रसिद्ध पार्श्वगायिका राधिका अत्रे, कथक नृत्यांगना प्रिया बिरारी, तर संकल्पना निवेदक शोभा कुलकर्णी यांनी कार्यक्रमात रंगत आणली.

अभिनेत्री प्रार्थना बहेरे म्हणाल्या, महिला दिनाचे खरे महत्व हे महिलांनाच ठाऊक असते. विविध क्षेत्रात काम करीत असताना तेथील येणारे बरे-वाईट अनुभव आणि संकट यावर मात करून आजची महिला खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण झाल्याचे पहावयास मिळते. मात्र यासाठी कुणाचातरी पाठीवर हात लागतो. तो मदतीचा एक हात कुंदाताई भिसे यांनी महिलांसाठी नेहमीच पुढे केला. त्यामुळेच आज पिंपळे सौदागरमधील महिला सक्षम होताना दिसत आहेत. त्यांचे हे कार्य खरेच कौतुकास्पद आहे. उपस्थित महिलांनी आज महिला दिनी संकल्प करून त्यांना तुमचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी; त्या तुमचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवतील, असा विश्वास व्यक्त केला.

कुंदा भिसे म्हणाल्या, स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने, समाजकारण, राजकारण व इतरही अशा विविध क्षेत्रांत महिलांनी आतापर्यंत जी प्रगती केली आहे, ती साजरा करण्यासाठीच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. मात्र, महिलांच्या हक्कांचे `रक्षण करण्यासाठी आता सर्वांनी पुढे आले पाहिजे. ती काळजी गरज आहे. उन्नती सोशल फाउंडेशनच्या माधमातून महिला सक्षमीकरणाचा घेतलेला वसा यापुढेही मी सुरुच ठेवणार आहे.

दरम्यान डॉक्टर प्राजक्ता नागरे, शिक्षिका उषा भरद्वाज, सांप्रदायिक वर्षाताई, पत्रकार माधुरी कोराड, पोस्टाच्या वर्षा जाधव, सफाई कामगार ज्योती श्रींगारे, कलाकार मीनल गोडसे, घरकाम महिला सुरेखा आलटे, तृतीयपंथी देविका सूर्यवंशी, महिला खेळाडू अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा “उन्नती महिला रत्न” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सफाई आणि घरकाम कामगारांचा दहा लाखांचा विमा काढण्यात आला.

महिलांसाठी खास लकी ड्रॉ पद्धतीने आकर्षक ११ विविध रंगांच्या पैठणी साड्यांचे वाटप करण्यात आले. यात पूजा शिंदे, रत्ना बादल, अश्विनी बगाडे, वैशाली सूर्यवंशी, कविता पाटील, सविता पाटील, धनश्री भिसे, सुनंदा जावळे, मिना हरदास, अडसूळ, अनिता कांबळे, रेखा बिराजदार, सुजाता मोरे, मिनाक्षी पाटील यांना बहुमान मिळाला. याशिवाय उपस्थित प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. आभार सागर बिरारी यांनी मानले. लतादीदींच्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गिताने कार्यक्रमाचा समारोप झाला.