धक्कादायक : खंडणीसाठी लहान मुलाचे अपहरण करून केला खून

धक्कादायक : खंडणीसाठी लहान मुलाचे अपहरण करून केला खून 

पिंपरी, ता. १० : एका लहान मुलाचे अपहरण करून खून केल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. या प्रकरणी गुंडा विरोधी पथकाने आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात २० कोटींची खंडणी ही आरोपींनी मागितली असल्याची माहिती आहे.

आदित्य आगले (वय सात वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी मंथन किरण भोसले आणि अनिकेत समदूर यांना अटक करण्यात आली आहे. आदित्यचा मृतदेह रात्री भोसरी एमआयडीसी परिसरात आढळून आला आहे.

गुरुवार पासून आदित्य बेपत्ता होता, त्याचा शोध कुटुंबीय घेत होते. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी मंथन किरण भोसले हा मयत आदित्यच्या सोसायटीत राहत आहे. मंथन याने मित्राच्या मदतीने अपहरणाचा कट रचला. अपहरण करण्यासाठी चारचाकी गाडीला काळी फिल्म लावण्यात आली.

गुरुवारी संध्याकाळी आदित्य सोसायटीच्या खाली खेळण्यास आला त्याचे अपहरण करण्यात आले. आदित्यच्या कुटुंबियांच्या व्हाट्सएपवर २० कोटींची खंडणी मागण्यात आली. परंतु, अवघ्या काही तासातच आरोपीपर्यंत पोहचत गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पिंपरी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.