पिंपरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त काळेवाडीतील रॉयल फाउंडेशन व काँग्रेसचे युवा कार्यकर्ते रवि नांगरे यांच्या वतीने सर्व वयोगटासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला असून त्यातील अनेकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर काहींची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. असे नांगरे यांनी लोकमराठी न्यूजशी बोलताना सांगितले.
या शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी काँग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष गणेश नांगरे, विश्वजित जगताप, माऊली मलशेट्टी, विजय ओव्हाळ, रॉयल फाउंडेशनचे सल्लागार प्रकाश नांगरे, रॉयल फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रकाश पठारे, कार्याध्यक्ष अजय काटे, सल्लागार आनंद काटे, पंकज पाटोळे, आशा नांगरे, नंदिनी नांगरे, जया त्रिभुवन, नवनाथ कोकणे, प्रथम नांगरे, नरेंद्र नांगरे यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
रवि नांगरे म्हणाले की, “भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल करून टाकले आहे. त्यामुळे अनेकांना आरोग्याची काळजी घेणे जिकीरीचे झाले आहे. त्यात डोळे हा शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. त्या शिवाय जग पाहणे अशक्य आहे. मुलांचे शिक्षण ऑनलाईन पध्दतीने सुरू असल्याने त्यांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो, तर डोळ्यांवर जास्त भार असलेल्या कामगार वर्गाला डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात. तसेच वृद्धांना वयोमानानुसार मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. मात्र, योग्य मार्गदर्शनाचा अभाव व आर्थिक अडचण, यामुळे ते मोतीबिंदू शस्त्रक्रिया करू शकत नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून हे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पाहून आपल्या कामाची पावती मिळाल्याची भावना निर्माण झाली.”
दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त काळेवाडीतील विविध कॉलनी व सोसायट्यांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. त्याठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून रवि नांगरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. लोकांमधील हे प्रेम पाहून भारावून गेलो. असे नांगरे यांनी सांगितले.
नांगरे पुढे म्हणाले की, “आरोग्य, शिक्षण, रोजगार व महिला सक्षमीकरण आदी विषयांवर रॉयल फाउंडेशनचे निस्वार्थपणे काम सुरू असून पुढेही अविरतपणे चालू राहणार आहे. दरम्यान, नगरसेवक हा जनतेचा, नगराचा सेवक असतो, ह्या कारणास्तव येणाऱ्या महापालीकेच्या निवडणूकीत मी नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार आहे. तरी आपण माझ्या सारख्या सुशिक्षीत उमेदवारास येणाऱ्या निवडणुकीमध्ये संधी द्यावी.”