एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘काव्य संमेलन’ संपन्न

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये 'काव्य संमेलन' संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : कवितेमधून कवी आपल्या मनातील भावना व्यक्त करीत असतो. कवितेत एक अद्भुत शक्ती आहे. युवकांनी साहित्याचे वाचन केले पाहिजे. साहित्य मनाची मशागत करते. आभासी विश्वातही कविता आनंद देत आहे. साहित्यिकांच्या सहवासात काव्य मैफिलीतून आनंद मिळतो. असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांनी व्यक्त केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या काव्य संमेलनात अध्यक्ष म्हणून त्यांनी आपले विचार व्यक्त केले. एस. एम. जोशी कॉलेजमधील मराठी विभाग, मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम व वैश्विक कला पर्यावरण औंध, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा काव्य संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हॉलंडचे सुप्रसिद्ध कवी व चित्रकार भास्कर हांडे यांनी या संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या.

या काव्य संमेलनात कवी अनंत राऊत (पुणे), कवी ज्ञानेश्वर तिखे (इंदोर), कवी बालाजी सूर्यवंशी (लातूर), कवी हनुमंत भवारी (पुणे), कवी श्यामसुंदर मिरजकर (सातारा) इतर कवींनी बहारदार कविता सादर केल्या. कवी अनंत राऊत यांच्या “आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे…” व “मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…” या कवितांना तसेच ज्ञानेश्वर तिखे यांच्या “माझा बाप जीव पेरतो मातीत…” या कवितेला तर बालाजी सूर्यवंशी यांच्या “आईच्या नजरेतून दुनियेला पाहता यावे …” कवी हनुमंत भवारी यांच्या “लेक्चर सुरू झाले मित्रा जरा कॅमेरा ऑन करशील काय ?…” कवी श्यामसुंदर मिरजकर यांच्या सामाजिक वास्तवाच्या कवितांना रसिकांकडून विशेष दाद मिळाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी तर कवींचा परिचय डॉ. अतुल चौरे यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. नम्रता मेस्त्री, प्रा. शुभम तांगडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. संदीप वाकडे यांनी मानले. या काव्यसंमेलनाला उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, आय. क्यू. ए. सी.चे समन्वयक डॉ.किशोर काकडे, सर्व विद्यार्थी प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये 'काव्य संमेलन' संपन्न