‘तर्कटपंजरी’ : तर्काच्या आधारावर विवेकवादी समाज घडवण्याची क्षमता असलेले पुस्तक

'तर्कटपंजरी' : तर्काच्या आधारावर विवेकवादी समाज घडवण्याची क्षमता असलेले पुस्तक

जगदीश काबरे

हे जग पुरुषांचे आहे या चालीवर म्हणता येईल की हे जग अस्तिकांचे आहे. ज्याप्रमाणे पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते त्याचप्रमाणे या अस्तिकांच्या जगातसुद्धा नास्तिकांना दुय्यम स्थान दिले जाते. स्त्री म्हणजे पापयोनी समजणारे नास्तिक म्हणजे दुर्जन समजत असतात. पण मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात स्त्रियांनी शेतीचा शोध लावून माणसाच्या सामाजिक प्रगतीचा मार्ग खुला केला त्याचप्रमाणे चार्वकांनी देव आणि पारलौकिता नाकारून वैदिक धर्माला आव्हान दिले आणि वैज्ञानिक प्रगतीचा पाया घातला. पण माणसाला अज्ञाताची भीती असल्यामुळे कुठल्यातरी फसव्या का होईना पण आधाराची गरज लागते. ती गरज सहजपणे देवाची संकल्पना पूर्ण करते. म्हणून त्याला माहीत नसलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ‘देवाची करणी आणि नारळात पाणी’ या पद्धतीचे स्वीकारणे सोयीचे जाते. माणसाला विचार करण्याचा आळस असतो. तसेच तो विचार कलहाला घाबरतो. मग त्यापासून पळवाट करण्यासाठी त्याला देवाची संकल्पना सोयीची वाटते. कारण प्रत्येक अनाकलनीय घटनेचे उत्तर मिळत नसले की ‘देवाची करणी’ हे उत्तर देऊन विचार करण्याचा डोक्याला होणारा ताप वाचवता येतो.

पण माणूस जन्माला येतो तेव्हा तो नास्तिकच असतो. त्याच्या डोक्यात देवाधर्माच्या कल्पना नसतात, जसे इतर प्राण्यांच्या. मग तो ज्या घरात जन्मतो त्या घराचा देव आणि धर्म त्याच्यावर थोपवला जातो. त्याप्रमाणे त्याच्या डोक्यात अंधश्रद्धा वाढवणारे संस्कार केले जातात. थोडक्यात काय तर, न कळत्या वयात न मागता आणि कसलेही विशेष प्राविण्य नसताना सहज मिळालेली गोष्ट म्हणजे देवाचे आणि धर्माचे संस्कार! पण माणूस जसजसा स्वतंत्र विचार करू लागतो, त्याला प्रश्न पडतात. त्याची उत्तरे शोधताना जसजशी त्याच्यात वैचारिक परिपक्वता येत जाते तेव्हा त्याला देवाधर्मातील फोलपणा लक्षात येतो आणि त्याचा नास्तिकतेकडे प्रवास सुरू होतो. म्हणजे नास्तिकता ही वैचारिक प्रक्रियेतून निर्माण होत असते तर आस्तिकता ही पारंपारिक संस्कारातून लादली जाते.

नास्तिक विचाराची माणसे या जगात नेहमीच अल्पसंख्यांक राहिलेली आहेत आणि त्यांच्यावर बहुसंख्य आस्तिकांचा दबावही राहिलेला आहे. त्यामुळे बरीच नास्तिक माणसे आपली नास्तिकता उघड करण्यात धाजावत नाहीत. त्यांना एकटे पडण्याची भीती वाटते आणि बहुसंख्यांक आस्तिकांच्या छळवणुकीचीही, जसे देव आणि धर्माला नाकारत नास्तिकतेचा विचार उच्चारवाने समाजात पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार्वाकांना आस्तिकांनी जिवंत जाळून मारले. आस्तिकांना आजही नास्तिकांच्या प्रश्नांची योग्य शब्दात उत्तरे देता येत नाहीत. त्या प्रश्नामुळे त्यांच्या देवाधर्माचा पायाच उखडला जातोय असे त्यांना वाटते… त्यांच्या देवाधर्माचा मुळावरच घाव बसल्यासारखे त्यांना वाटते. देवधर्मामुळे मिळणारा फसवा का होईना पण तो आधार त्यांना नाहीसा होण्याची भीती वाटते. म्हणून मग ते नेहमीच दहशतवादावर उतरतात, कळपात सुरक्षितता शोधतात आणि नास्तिकांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करतात. मध्ययुगात अशा प्रकारे त्यांनी ब्रूनोला जिवंत जाळले तर गॅलीलीओला मरेपर्यंत कैदेत ठेवले. वर्तमान काळात तर त्यांनी अंनिसचे नेमस्त विचारसरणीचे नरेंद्र दाभोळकर, प्राध्यापक कुलबर्गी, पुरोगामी विचारसरणीचे गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांचे तर सरळ सरळ खूनच केले.

पण प्रश्न विचारण्याचे धाडस ज्या लोकांमध्ये होते आणि आहे त्यांच्यामुळेच मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक प्रगती आणि सामाजिक उन्नती झालेली दिसते. अशा माणसांनी जगभर वेगवेगळ्या संघटना उभारल्या आणि आस्तिकांशी दोन हात करायला सुरुवात केली. तसेच एकएकट्या नास्तिकांना ‘तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्याबरोबर नास्तिकांचे संघटन आहे’, हा आशावाद एकांडया नास्तिकात निर्माण केला. असेच एक संघटन नास्तिक विचाराच्या विखुरलेल्या लोकांना बळ मिळावे म्हणून महाराष्ट्रात 2013 साली ‘ब्राईट्स सोसायटी’ नावाने नास्तिकतेचा जाहीर पुरस्कार करत जन्मास आले. या संघटनेने अकरा वर्षात बरीच मोठी मजल मारलेली आहे आणि महाराष्ट्रातील समस्त नास्तिकांना वैचारिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या संघटनेत मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या आहे हे विशेष. या तरुणांमध्ये नवीन विचार स्वीकारण्याची आणि ते अमलात आणण्याची ताकद कशी वाढत गेली तसेच त्यांचा नास्तिकतेकडे कसा प्रवास झाला, ते मनोगत व्यक्त करणारे ब्राईट्स सोसायटीने ‘तर्कटपंजरी’ हे पुस्तक प्राजक्ता अतुल यांच्या संपादनाखाली तयार केले आहे. या पुस्तकातील मनोगते वाचताना ही तरुण मंडळी समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचे धाडस अंगी कशी आणि का आणू शकली याचे त्यांनी मनोज्ञ विवेचन केले आहे. यातील बरीचशी मंडळी ही कर्मठ आणि धार्मिक कुळाचार पाळणाऱ्या घरात जन्माला आली होती. अर्थातच लहान वयात ते सगळेच देवधर्म पाळणारे देवभोळे होते. पण शिक्षण घेत असताना त्यांच्यात विचार करायची सवय लागली आणि वाचनाची आवड निर्माण झाली. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे अशा वाचनातूनच त्यांना मिळू लागली. कारण घरातील मोठी माणसे ती उत्तरे देण्यास असमर्थ होती. त्यातून देवाधर्मातील फोलपणा त्यांच्या लक्षात येऊ लागला तसतसे ते धार्मिक कर्मकांडापासून दूर जाऊ लागले. पण तरीही जगात मोठ्या प्रमाणात देवाधर्माचे कर्मकांड करणारे लोक आजूबाजूला असताना त्यांना आपले वेगळे विचार लोकांसमोर जाहीरपणे मांडणे अवघड झाले. कारण त्यांच्या विचारांची आस्तिकांकडून ‘आलाय फार मोठा शहाणा! आपले वाडवडील काय मूर्ख होते?’ असा प्रति प्रश्न विचारून खिल्ली उडवली जायची. अशा सगळ्या तरुणांना ब्राईट्समुळे ‘नास्तिक विचाराचे आपण एकटे नाही आहोत, आपल्याबरोबर अनेक लोक आहेत’, याचे बळ मिळाले आणि ते हळूहळू ठामपणे समाजात आपले नास्तिक विचार उघडपणे व्यक्त करू लागले. त्यांना ब्राईट्स संस्था ही नास्तिकांसाठी एका परीने सुरक्षित आश्रयस्थान वाटते.

आता आपण ‘तर्कटपंजरी’ या पुस्तकातील लेखकांनी लिहिलेल्या मनोगतातील काही महत्त्वाची उद्घृते पाहूया…
1) सीमा नायक म्हणतात, सगळ्यात महत्त्वाची होती माझे स्वतःची विवेकबुद्धी. हिने मला कोणत्याही बऱ्यावाईट प्रसंगात कमजोर पडू दिले नाही. एक आठवण सांगते, मुलाच्या जन्मानंतर त्याला लगेच व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्या बारा दिवसात कधीही देवासमोर हात जोडावेसे वाटले नाहीत. सासरच्यांनी ‘ब्राह्मणांकडून मंत्रपठण करून घेऊ’, असे सांगितल्यावर मी “दोन दिवसाच्या बाळाला आपण व्हेंटिलेटर वरून काढून घेऊ आणि मगच मंत्रपठण करूया”, असे छातीठोकपणे सांगू शकले ते माझ्या विवेकी शक्तीमुळेच. (पृष्ठ क्र. 143)

2) डॉ सचिन लांडगे म्हणतात, कोणतीही गोष्ट आपल्याला त्रास तेव्हाच देऊ शकते जेव्हा आपण त्याचा त्रास करून घेतो, असे मनोवैज्ञानिक अल्बर्ट एलीस म्हणतो. थोडक्यात कोणतीही गोष्ट ही समस्या नसते, तर त्या गोष्टीकडे पाहायचा आपला दृष्टिकोन हीच खरी समस्या असते. म्हणून अज्ञान स्वीकारणे हे ‘जाणून घेण्याच्या’ दिशेने टाकलेले पहिले पाऊल असते. त्यामुळे आपल्याकडे एखाद्या गोष्टीचे प्रामाणिक उत्तर नसेल तर कोणत्याही अप्रमाणित व्याख्या किंवा कथांवर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी उत्तर नसल्याचा प्रामाणिक स्वीकार करणे चांगले. (पृष्ठ क्र. 136,138)

3) शिवप्रसाद महाजन म्हणतात, प्रत्येक स्त्रोत्र परमेश्वर स्तुतीच असते. प्रत्येक स्तोत्राच्या उत्तरार्धात फलश्रुती असते, जी परमेश्वराच्या स्तुतीच्या बदल्यात संरक्षणाची, संपत्तीची, पुत्रप्राप्तीची इच्छा मांडते आणि त्याची हमीसुद्धा देत असते. स्तुती न केल्यास हानी होण्याची भीती दाखवली जाते. प्रत्येक स्तोत्रात स्तुती व फलश्रुती एका ठराविक साच्यात असतात. याची कल्पना आली आणि पाठांतर करण्याची सवय लागणे हा मुद्दा वगळता हे सर्व फोल आहे याची जाणीव हळूहळू होत गेली. (पृष्ठ क्र. 120)

4) वैशाली जोग यांनी एकाच वाक्यात पण अत्यंत महत्त्वाचे मार्मिक निरीक्षण नोंदवले आहे. त्या पृष्ठ क्र. 117 वर म्हणतात, ‘तुमच्या चारित्र्यापेक्षासुद्धा तुमचे आस्तिक्य महत्त्वाचे ठरते.’ (म्हणूनच आपल्या अवतीभवती अनेक चारित्रहीन माणसे आस्तिक असली तरी त्यांच्याविषयी काही वाटेनासे होते.- इति अस्मादिक)

5) राहुल खरे म्हणतात, जेव्हा लोक म्हणतात की, ‘ही माझी श्रद्धा आहे.’ तर ती खरी श्रद्धा नसून फक्त भीती असते. देवाचा प्रकोप होईल, आपल्यासोबत काहीतरी वाईट घडेल या भीतीने बहुतांश लोक कर्मकांड करीत असतात. ईश्वर हा वर आकाशात कोणीतरी बसला आहे, तो खूप दयाळू, न्यायी आहे. पूजापाठ, होमहवन, मंत्रोपचार केल्याने, पोथ्या वाचल्याने तो प्रसन्न होतो आणि भक्तांच्या अडचणीचे निवारण करतो, निपुत्रिकाना संतान देतो, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. थोडक्यात देवाला सौदेबाजी मान्य आहे. म्हणून नास्तिक विचारांमधून मी अधिकाधिक परिपक्व होतो आहे. ही परिपक्वता स्वतंत्रपणे विचार करण्यातून येते. त्यामुळे देव या संकल्पनेच्या कुबड्याची मला आत्तापर्यंत गरज वाटलेली नाही… अगदी संकटाच्या प्रसंगात सुद्धा नाहीच. (पृष्ठ क्र. 110,111)

6) डॉ प्रियंका लांडगे आणि डॉ सचिन लांडगे यांच्या लेखात ते म्हणतात, विवेकबुद्धी म्हणजे सारासार विचार करण्याची पद्धत. तर्काच्या आधारावर समजणाऱ्या गोष्टी पारखून घेण्याची पद्धत. ही एक विचार प्रक्रिया असते. पण उपजत नसते. जसे शरीराच्या रक्षणासाठी प्रतिकारशक्ती असते तसे मनाच्या रक्षणासाठी विवेकबुद्धी असते. (पृष्ठ क्र. 91, 93)

7) पद्माकर इंगळे म्हणतात, जनतेत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि विज्ञाननिष्ठ नागरिक घडावा असे नागरिकांचे एक कर्तव्य आपल्या संविधानात सांगितलेले आहे. परंतु धर्माचे नेतृत्व असलेला समाज वैज्ञानिकदृष्ट्या विचार करायला विरोधच करत असतो. अशा प्रकारच्या लोकांना त्यांच्या हितसंबंधांची जोपासना करण्यासाठी, हेतू साध्य करण्यासाठी समाजाला अंधारात चाचपडत ठेवणे सोयीचे वाटते. पण नास्तिकता ही मुळातच वास्तविकता आहे. ही एक वास्तविक जीवन पद्धती असून जी जीवनात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपली आपणच निर्माण करायची असते आणि काळानुरूप त्यात बदल घडवायचे असतात. (पृष्ठ क्र. 78, 79)

8) किरण देसाई म्हणतात, पूर्वी गावाकडील घरामध्ये संडास बांधत नसत. आमच्या जुन्या घरी सरकारी अनुदानातून एक संडास आम्ही बांधून घेतला. त्यावेळेस मी आजीला मुद्दाम सांगितले की, ‘कोणत्याही शुभ कार्याला जसे गृहप्रवेश, वास्तुशांती इत्यादीसाठी भटजीला बोलावून त्याच्या हस्ते उद्घाटन करून घेतो त्याचप्रमाणे ह्या नवीन संडासाचेसुद्धा उद्घाटन भटजीच्या प्रथम वापराने व्हायला हवे.’ अर्थातच आजीची प्रतिक्रिया अतिशय तिखट होती, हे वेगळे सांगायला नकोच. (पृष्ठ क्र. 61)

9) आशिष कोरी म्हणतात, अधिकाधिक लोकांना विवेकी विचारांकडे वळवायचे असेल तर त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल. डॉ दाभोळकर म्हणायचे, ‘लोकहो तुम्ही विचार करायला का घाबरता?’ अंधश्रद्धा निर्मूलन, नास्तिकता हे तर लांबचे टप्पे आहेत. आधी निदान विचार करायला लागा. चिकित्सा करायला लागा. डोके वापरायला सुरुवात तर होऊ द्या. इतके जरी झाले तरी जास्तीत त्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. (पृष्ठ क्र. 54)

10) सलीम मोमीन यांनी त्यांच्या लेखाचा शेवट एका विचार परिलुप्त कवितेने केला आहे. ते एकंदरीत विवेकी माणसाच्या प्रवासाचे सार आहे, असे म्हणायला हवे. पृष्ठ क्र. 140 वर ते लिहितात… धर्म म्हणजे काय? एक अंधार-प्रवास कितीतरी अंधारांशी लढायचं आहे. अंधार धर्माचा, जातीपातीचा, सगळाच नष्ट करायचा आहे. जितका विवेक रुजवत जावा, तितका माणूस माणसाशी मिळत जातो. मी मलाच शोधत व खोदत राहावं, अविरतपणे माणूसपण पेरण्यासाठी आणि माणूसपण जगवण्यासाठीही.

साथींनो, यातील एकही व्यक्ती लेखक म्हणून प्रस्थापित नाही. पण त्यांच्या लिहिण्याच्या शैलीवरून हे लक्षात येते की, विचार जर स्पष्ट असतील तर आपण योग्य शब्दात चपखलपणे ते मांडू शकतो. कसे ते या उद्घृतांवरून स्पष्ट होतेय. एकंदरीत संपूर्ण पुस्तक वाचल्यावर नास्तिकतेकडे प्रवास करणाऱ्या तरुणांना वैचारिक बळ तर मिळेलच, पण परिघावरील तळ्यात-मळ्यात विचार असलेल्या तरुणांचाही हे पुस्तक वाचून नास्तिकतेकडे प्रवास सुरू होईल, हे नक्की. भविष्यातील नास्तिक आणि विवेकी समाज घडवण्यासाठी या पुस्तकाचा मोठाच हातभार लागणार आहे. ‘तर्कटपंजरी’ हे पुस्तक तर्कटी नसून तर्काच्या आधार विवेकवादी कसे व्हावे हे समजावून सांगणारे महत्वाचे पुस्तक आहे. ब्राइट्स संस्थेचे सचिव कुमार नागे यांची पुस्तकाबाबतची संकल्पना कमालीची यशस्वी झालेली आहे. त्याला प्राजक्ता अतुल यांच्या कौशल्यपूर्ण संपादनाने अधिक उठावदार केलेले आहे. भविष्यातील विवेकी समाजाचा भाग होऊ इच्छिणाऱ्या तरुणाईने ‘तर्कटपंजरी’ हे पुस्तक जरूर वाचावे आणि आपले विचार प्रगल्भ करावेत, अशी मी शिफारस करत आहे.