वृक्ष संवर्धनासाठी हवी मानसिकता

वृक्ष संवर्धनासाठी हवी मानसिकता

संदीप रांगोळे, वृक्षप्रमी

वृक्ष लावा, वृक्ष जगवा हे आवाहन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून आपण नेहमीच एकतो आहे. त्यासाठी बेसुमार होणारी वृक्षतोड थांबली पाहिजे. नवीन वृक्ष लागवडीबरोबरच ती जगवायला हवी, याबाबात जनजागृती केली जाते. मात्र, ही जनजागृती व आवाहनांचा किती परिणाम झाला किंवा होतो आहे, हे पिंपरी चिंचवड शहरासह उपनगराच्या विविध भागात अव्याहतपणे होत असलेल्या वृक्षतोडीतून स्पष्ट होत आहे.

पावसाळ्यात झाडे लावण्याचे कार्यक्रम पार पाडले जातात व त्या कार्यक्रमांचे फोटो माध्यमांमधून छापून आणले जातात. एकदा अशा कार्यक्रमांमधून फोटो छापून आले की, लावलेल्या झाडांचे काय झाले, ती जगली की नष्ट झाली, याकडे तेवढ्याच तत्परतने बघितले जात नाही. सध्या पिंपरी चिंचवड शहरात बांधकामांना अथवा रस्त्यांना अडथळा ठरणारी झाडे बेमुर्वतपणे तोडली जात आहेत. खासगी जागेतील झाडे तोडण्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. विनापरवानगी वृक्ष तोडणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो. मात्र, याची भीतीही तोडणाऱ्यांत नाही.

सार्वजनिक ठिकाणांवरील झाडे सर्रास तोडली जातात. असे प्रकार शहरात व उपनगरात रोज घडत आहेत. दिवसेंदिवस झाडे कमी होत आहेत, बेसुमार वृक्षतोडीमुळे होणाऱ्या परिणांमाची आपण सारेच किंमत मोजत आहोत. जंगलातील वनसंपदा आम्ही नष्ट केली आणि आता नागरी भागातील झाडे नष्ट करण्याचा सपाटा सुरू केला आहे. झाडे नकोशी झालीत की काय? अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. काही ठिकाणी वृक्षसंवर्धनार्थ या काव्याच्या ओळीही रेखाटलेल्या असतात, पण प्रश्न पडतो की, खरंच वृक्ष वल्ली सगे, सोयरी आहेत का ?

वृक्ष संवर्धनासाठी हवी मानसिकता