स्त्रीने आपली शक्ती ओळखून स्वतःसाठी काम करण्याची गरज आहे – डॉ. भालचंद्र मुणगेकर

स्त्रीने आपली शक्ती ओळखून स्वतःसाठी काम करण्याची गरज आहे - डॉ. भालचंद्र मुणगेकर

मुंबई : स्त्रीला जन्मजात तिसरा सेन्स असतो, ती जन्मताच पुरुषापेक्षा सक्षम असते मात्र आपले वर्चस्व गाजवण्यासाठी पुरुषाने तिला नेहमीच दुय्यम स्थान दिले आहे. आपण जोपर्यंत स्त्रीला समान वागणूक देत नाही, तिच्यावरचे अत्याचार बंद होत नाही, तोपर्यंत आपण पुरोगामी आहोत असे म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही! स्वतः स्त्रीने आपली शक्ती ओळखून स्वतःसाठी काम करण्याची गरज आहे. असे स्पष्ट मत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, नॅशनल क्राईम ब्युरो मधील महिलांवरील अत्याचार, बलात्कार यांची आकडेवारी चिंताजनक आहे. शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या आणि स्त्रीला दुर्गारूप मानणाऱ्या राज्यातही अत्याचारांची संख्या मोठी आहे आणि म्हणूनच सामाजिक संस्था, महिला व पुरुष यांनी एकत्र येऊन जागरूकतेसाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे परंपरा ,रूढी यात न अडकता स्त्रीने स्वतः सक्षम होण्याची गरज आहे !आजची सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक आईने आपल्या घरातील छोट्या मुलींची काळजी पुरुष नातेवाइकांपासून घेण्याची तसेच,कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचारापासून वाचवण्याची नितांत गरज आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र ग्रंथालय संचालनालय व महिला आर्थिक विकासमहामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला सक्षमीकरणासाठी, कायदे, कृतिशील अंमलबजावणी’, परिसंवादाचे आयोजन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शारदा मंगल सभागृहात, दादर पूर्व येथे करण्यात आले होते. या परिसंवादाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे उपाध्यक्ष डॉ .भालचंद्र मुणगेकर होते.

कार्यक्रमास आलेल्या मान्यवर वक्त्यांचे स्वागत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे यांनी ग्रंथभेट देऊन केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली, तर स्त्री शक्तीचे ऊर्जावान गीत रंजना सातपुते यांनी सादर केले.

मुबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या उपाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी राजकीय क्षेत्रातील महिलांचे महत्त्व व कर्तृत्व विशद करताना सांगितले की ,राजकीय क्षेत्राकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन तयार झालाय ,या क्षेत्रात महिलांनी जाऊ नये असं अनेकांचं मत आहे! पण या क्षेत्रात कचरा तयार झालाय म्हणतो तर तो साफ करायला हवाच! महिला जास्त प्रभावीपणे काम करतात,हे आपण पाहतो! एकीकडे चोक्शी, मेहता असे गब्बर लोक कर्ज बुडवून परदेशात पळून जातात तर या बचतगटाच्या ,महिला उद्योजक महिलांचा कर्जाचा परतावा दर नव्वद टक्के आहे.

आगामी काळात मुंबई मनपा व इतर निवडणुका येतील त्यात महिला आरक्षित जागांवर खरोखर सक्षम चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यां महिलांना तिकिटे मिळायला हवीत,नको कोणा पुरुष नेत्यांच्या नातेवाईक महिलांना! असं झालं तरच महिला आरक्षणाचा खरा लाभ महिलांना झाला असं म्हणता येईल.

महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग – ग्रंथालय संचालनालयाच्या संचालिका शालिनी इंगोले यांनी सागितले की,नोकरीधंद्याच्या ठिकाणी महिला एक स्त्री आहे म्हणून लैंगिक हिंसाचार होऊ नयेत आणि तिला पुरुषांप्रमाणे समानतेने काम करण्याची संधी मिळावी म्हणून नोकरीधंद्याच्या ठिकाणी महिलांवर होणारा’ लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, २०१’ केला आहे. परंतु बदनामी व भीतीपोटी पीडित महिला अधिकारी-कर्मचारी अन्यायाविरोधात साधी तक्रारदेखील नोंदविण्यास पुढे येत नाहीत. आणि यातूनही जरी एखादी महिला तक्रार नोंदविण्यास पुढे धजावली तर तिच्याविरुद्धच भ्रष्टाचाराचे आरोप,किंवा तिचे चारित्र्यहनन करून मानसिक खच्चीकरण केले जाते. तसेच स्त्रीत्वाचा फायदा घेऊन विशेष काही न घडताही या कायद्याचे हत्यार उपसणे योग्य नाही.

जर एखादी स्त्री यशस्वी व्हायची असेल तर प्रत्येक पुरुषाची साथ तिच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मिळणे आवश्यक आहे. कुटुंब आणि पर्यायाने समाज जोपर्यंत स्त्रीशक्ती सन्मानाचा स्वीकार करीत नाही तोपर्यंत महिला सक्षमीकरण होऊ शकत नाही

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्याध्यक्ष पत्रकार शीतल करदेकर यांनी सागितले की,कायदे आहेत पण अंमलबजावणीत टीमवर्क नाही! पोलीस व पत्रकारांसाठी सुरक्षित वातावरण हवे तसे नाही ! महिलांनी एकत्र येऊन सहकार्य भावनेने काम करणे आवश्यक आहे! वर्तमानात याची जास्त गरज आहे असे स्पष्ट मत पत्रकार शीतल करदेकर यांनी व्यक्त केले त्या पुढे म्हणाल्या की, शिवजयंती रोजचीच असावी आणि महिलादिनही रोजच असावा!

महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल कोश्यारी हे पत्रकार होते, त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल जे उद्गार काढले ते निंदनीय आहेत. जिजाऊ मासाहेबांनी गर्भात व जन्मानंतरही आपल्या मुलावर संस्कार केले ,त्याच शिवरायांच्या खऱ्या गुरू. शिवराय हे स्वयंभू आणि आमचे आदरस्थान! तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाईंबद्दल कुत्सित हसून राज्यपालांनी जाहीर खिल्ली उडवली हे अत्यंत निषेधार्थ आहे , त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल या पदावर राहण्याचा अशा व्यक्तीला काहीही अधिकार नाही अशी जनभावना आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) ची स्थापना १९७५ मध्ये नॉन प्रॉफिट कंपनी म्हणून झाली,सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, बँका कर्ज देत नव्हत्या !
माविमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आज रोजी १.४६ लाख बचतगटांच्या माध्यमांतून १७.०३ हजार महिलांची संघटन बांधणी केली गेली.

आज महिलांना वैयक्तिक व सामूहिक उद्योगासाठी बँका १०लाखांपर्यंतचे कर्ज देऊन त्यांच्या उद्योगाला उभारी देत आहेत! ४२०२. ९६ कोटी रुपयांचे बँक कर्ज घेऊन ९८% परतफेड केलेली आहे यामुळे आज माविम स्थापित बचत गट फेडरेशन म्हणजे महिलांचे लोकसंचालित साधन केंद CMRC यांच्या सोबत आज पर्यंत ५ बँकांनी करार केले आहेत.

आता आर्थिक सत्ता महिलांच्या हातात आलेली दिसून येत आहे. तसेच विविध स्तरांवर राजकीय क्षेत्रातही त्याआपले स्थान निर्माण करत आहेत! आदी सविस्तर माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचे कोकण विभागीय अधिकारी मंगेश सूर्यवंशी आणि रंजना सातपुते, (व्यवस्थापक, कायापालट लोकसंचालित साधन केंद्र, शहापूर, ठाणे) यांनी अनेक उदाहरणांतून दिली.

सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. शुभांगी सारंग यानी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की,महिला दिनी आपण सर्व महिलांनी शपथ घेतली पाहिजे की, आपण दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे! प्रत्येक क्षेत्रात आपण असलं पाहिजे खासकरून विकासक म्हणून. जी स्त्री स्वतःचं घर सांभाळू शकते ती घर बांधूही शकते, नोकरीपेक्षा उद्योग व्यवसाय ही काळाची गरज आहे. आपण अबला हा शब्दच डोक्यातून काढून आपले कौटुंबिक अत्याचार आपण थांबवले पाहिजेत! कायदे असूनहीअंमलबजावणी वेळेत होत नसल्याने , त्यात बदल, पोलीस कायद्यात अचूक बदल, शिवाय कौटुंबिक हिंसाचार, महिलांवर कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार अशा या केसचा निकाल सहा महिन्यांत लागला पाहिजे ,यासाठी समिती असावी ज्यात राजकीय नसणाऱ्या स्त्रिया,पुरुष पर्यवेक्षक अधिकारी म्हणून नियुक्त झाले पाहिजेत.

जवळपास तीन तास सुरू असलेल्या या कार्यक्रमास तिन्ही संस्थेतील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने तसेच सोबत पुरुषांची उपस्थितीही लक्षणीय होती. कार्यक्रमास मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे उपाध्यक्ष पत्रकार प्रभाकर नारकर, कार्योपाध्यक्ष मारूती नांदविस्कर, सचिव उमा नाबर, संदर्भ समिती सदस्य मनोज वराडे, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.