
जेट जगदीश
अनेकदा मुस्लिम मित्रांशी बोलताना ते नेहमी कबूल करतात की, ‘भारतातील बहुतांशी मुस्लिमांचे पूर्वज हे हिंदू होते, असे मोहन भागवत सांगतात ते काही खोटे नाही.’ पण ते भागवतांचे राजकीय स्टेटमेंट असते. कारण त्याचबरोबर मुस्लिम मित्र पुढे असेही म्हणतात की, ‘आमचे बव्हंशी पूर्वज जे काही मुसलमान झाले ते मुस्लिम राजांच्या किंवा मुल्ला मौलवींच्या बळजबरीमुळे वा अत्याचारामुळे नव्हे; तर येथील उच्चवर्णीयांनी बहुजनांवर केलेल्या अनन्वित अत्याचारांना कंटाळून त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. एवढेच नव्हे तर कोणी मुस्लिमांच्या हातचा चहा प्यायला असल्या क्षुल्लक कारणासाठी इथल्या जातीय गंड असलेल्या उच्चवर्णीयांनी ‘ते मुस्लिम झाले’ अशी हाकाटी पिटुन त्यांना धर्मबाह्य केले. काही पिढ्या गेल्या नंतर आता ते स्वतःला कट्टर मुसलमानच समजू लागले आहेत. कारण हिंदूंनी त्यांची नाळ केव्हाच कापली आहे. आणि ही नाळ कापण्यात हिंदू धर्मांध उच्चवर्णीयांचाच पुढाकार होता.’
यावरून मला विवेकानंदांचे या विषयावरील विचार वाचल्याचे आठवले. ते असे…
स्वामी विवेकानंदांनी २० सप्टेंबर १८९२ आणि नोव्हेंबर १८९४ रोजी पाठविलेल्या पत्रात सांगितले आहे, ‘या देशातील धर्मातरे मुसलमान आणि ख्रिश्चन यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हेत, तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झालीत’. आणि या देशाचा अभ्युदय करावयाचा असेल तर हिंदू-मुसलमान सहकार्य नव्हे तर समन्वय हवा, म्हणून आग्रहाने सांगणाऱ्या विवेकानंदानी विवाहाबद्दल आपल्या शिष्यांचे प्रबोधन करताना ३० जानेवारी १८९४ आणि १९ नोव्हेंबर १८९४ रोजी आपल्या मद्रासमधील शिष्यांना पाठविलेल्या पत्रात सांगितले आहे, ‘‘माणसाला जिवंत राहण्यासाठी फक्त हवा, पाणी आणि अन्न पुरेसे नाही. त्याला स्वातंत्र्य हवे. पण स्वातंत्र्य म्हणजे केवळ विचार आणि उच्चारस्वातंत्र्य नव्हे. आपण काय खावे, कोणते कपडे घालावेत आणि कोणाशी विवाह करावयाचा याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला हवे.’
हे स्वातंत्र्य देण्यास हिंदू उच्चवर्णीयांनी बहुजनांना कायम नकार दिला. एवढेच नव्हे तर त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी सुद्धा अधिकार ठेवला नाही. एवढ्या हीन पद्धतीने त्यांच्याशी हे उच्चवर्णीय वागले. त्यामुळे शेवटी हिंदूंच्या या जाचाला कंटाळून अनेक बहुजन, कनिष्ठ जातीतील लोकांनी मुस्लीम धर्म स्वीकारला. याचा दोष कनिष्ठ जातींना न देता उच्चवर्णीयांच्या अहंकारी आणि जातीय गंडाच्या अहंमान्य वृत्तीला द्यायला हवा. खरे पाहता सामान्य हिंदू आणि मुसलमान हे दोघेही प्रत्यक्षात एकमेकांशी सहकार्य करूनच जगत असतात. पण आपापल्या धर्मातील राजकारणी आपल्या स्वार्थी राजकारणासाठी परधर्मयांविषयी लोकांमध्ये कलुषित करत आणि अस्मिताखोर भाषणे देत आपापसात कलह माजवत असतात.
अजूनही हिंदूंचीच संस्कृती काय ती उच्च आणि इस्लामच काय तो श्रेष्ठ असा टेंभा मिरवणार्या धर्मांधांना अक्कल आलेली नाही. म्हणून आजही ते मोठ्या प्रमाणात हिंदूमुस्लिम द्वेषाची विषवल्ली पसरवून सामान्य पापभिरू लोकांमध्ये परस्परांविषयी खोटेनाटे विचार सांगत अविश्वासाचे वातावरण निर्माण करत आहेत. आपण सगळे एका देशाचे नागरिक आहोत हे लक्षात न घेता जसे आपण स्थावरजंगम संपत्तीसाठी घराच्या वाटण्या करून घराचे तुकडे करतो तसेच हे हिंदू-मुसलमान करत देशाचे तुकडे करायला निघालेले देशद्रोही आहेत.