कर्जत नगरपंचायतीच्या १२ जागेसाठी सरासरी ८०% मतदान | आ. रोहित पवार आणि माजीमंत्री राम शिंदेकडून विजयाचा दावा

कर्जत नगरपंचायतीच्या १२ जागेसाठी सरासरी ८०% मतदान | आ. रोहित पवार आणि माजीमंत्री राम शिंदेकडून विजयाचा दावा

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायतीच्या (Karjat Nagarpanchayat Election) १२ जागेसाठी १५ मतदान केंद्रावर सरासरी एकूण ८०.२१% मतदान पार पडले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली.

१२ जागेसाठी ३१ उमेदवाराचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. १२ जागेसाठी १० हजार ३१६ मतदारापैकी ८२७४ मतदारांनी आपला हक्क बजावला. आ रोहित पवार यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला विकासाचे व्हिजन पाहता जनतेचा कौल मिळणार असून मोठ्या मताधिक्याने आपले उमेदवार विजयी होण्याचा दावा केला तर माजीमंत्री राम शिंदे यांनी देखील जनता आपल्या विकासकामाना साथ देतील असे म्हणत भाजपा कर्जत नगरपंचायतीमध्ये सत्ता कायम राखण्यात यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला. मात्र या निकालासाठी १९ जानेवारीची वाट पाहावी लागेल.

कर्जत नगरपंचायतीसाठी प्रचार तोफा थंडावल्यानंतर मंगळवार दि २१ रोजी १२ जागेसाठी १५ मतदान केंद्रावर प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया राबवली गेली. निर्भीडपणे मतदान प्रकिया पार पडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळपासून आ रोहित पवार आणि माजीमंत्री राम शिंदे यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर जात परिस्थितीचा आढावा घेतला. सकाळी ११ पर्यंत मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली होती. मात्र दुपारनंतर मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडले. मतदान केंद्रावर सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

प्रभागनिहाय मतदार आणि मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे – प्रभाग क्रमांक ४ माळेगल्ली ९२७ पैकी ७४० – ७९.८३% – , प्रभाग क्रमांक ६ याशीननगर ५५३ पैकी ४५५- ८२.२८% , प्रभाग क्रमांक ८ शाहूनगर ८४६ पैकी ६२१- ७३.४०% , प्रभाग क्रमांक ९ समर्थनगर ६८१ पैकी ५२९ – ७७.६८% , प्रभाग क्रमांक १० बेलेकर कॉलनी ९७५ पैकी ७५९ – ७७.८४% , प्रभाग क्रमांक ११ बर्गेवाडी ५८६ पैकी ५६०- ९५.५६% , प्रभाग क्रमांक १२ शहाजीनगर १२२१ पैकी ९७९ – ८०% , प्रभाग क्रमांक १३ गोदड महाराज गल्ली ८१८ पैकी ५७३ – ७०% , प्रभाग क्रमांक १४ सोनारगल्ली ५९४ पैकी ४९३ – ८३% , प्रभाग क्रमांक १५ भवानीनगर ९२८ पैकी ७५७ – ८१.५७% , प्रभाग क्रमांक १६ अक्काबाईनगर ७२१ पैकी ५६६ – ७८.५९% आणि प्रभाग क्रमांक १७ भांडेवाडी १४६६ पैकी १२४२ – ८४ .४५% मतदान पार पडले. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळेल. जनता विकासाच्या व्हिजनला साथ देतील असा विश्वास आ रोहित पवार यांनी व्यक्त केला. तर माजीमंत्री राम शिंदे यांनी जनता भाजपा आणि मित्रपक्षाबरोबरच राहील आणि सत्ता कायम राखण्यात मदत करतील असा दावा केला.

कर्जत नगरपंचायतीला मतदान करा वैद्यकीय बिलात ५०% सवलत घ्या – पवार हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम

कर्जत नगरपंचायतीसाठी मतदान करा आणि वैद्यकीय बिलामध्ये ५०% सवलत घ्या असा अभिनव उपक्रम शहरातील पवार हॉस्पिटलचे संचालक स्त्रीरोगतज्ञ डॉ दयानंद पवार, भूलतज्ञ डॉ श्वेता पवार, बालरोगतज्ज्ञ डॉ शरदकुमार पवार आणि हृदयरोग तज्ञ डॉ धनंजय वारे यांनी घेतला. यामध्ये मतदान केल्यापासून पुढील १० दिवसापर्यंत हृदयरोग तपासणी, टू डी इको, ईसीजी, रक्त तपासणी, बाल ग्रुप तज्ञांकडून लहान मुलांचे उपचार, व गरोदर स्त्रियांची तपासणी तसेच पोटाची सोनोग्राफीमध्ये ५०% सवलत देण्याची घोषणा पवार हॉस्पिटलद्वारे करण्यात आली.

निकालासाठी महिन्याची प्रतीक्षा

कर्जत नगरपंचायतीच्या १७ पैकी आज १२ जागेसाठीच निवडणूक पार पडली. उर्वरित ४ जागा ओबीसी आरक्षणामुळे स्थगित करण्यात आली होती. पुढील ४ जागेसाठी १८ जानेवारी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीचा एकूण १७ निकाल १९ जानेवारीला लागणार असून यासाठी तब्बल एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागेल. मतदान पार पडल्यानंतर अनेक प्रभागात मात्र फटाक्याची आतिषबाजी पाहावयास मिळत होती.