- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा ‘युनिट ए’ची कारवाई
- १८ लाख रुपयांचा ऐवज जप्त
पिंपरी (लोकमराठी) : परिवहन विभागाकडून रिक्षा परमिट मिळविण्यासाठी पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून बनावट सही आणि शिक्क्याची तसेच वेगवेगळ्या मजकुराची एकूण ८८ प्रकरणे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या टोळीकडून एकूण १८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली.अशोक भीमराव जोगदंड (वय ३७, रा. निगडी), बालाजी अशोक माशाळकर (वय ४०, रा. काळेवाडी), सचिन महादू साळवे (वय ३५, रा. तळवडे), मुकुंद दत्तू पवार (वय ३०, रा. निगडी), रामदास मच्छिंद्र हारपुडे (वय ३५, रा. चिखली), किरण रामभाऊ ढोबळे (वय २६, रा. भोसरी), खेतमल नामदेव पाटील (वय ३६, रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील चारित्र्य पडताळणी विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील पिंजण यांना रिक्षा परमिटसाठी लागणारे पोलिसांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळाले. त्यावरून पिंपरी-चिंचवड आरटीओ येथे काहीजण स्वयंघोषित एजंट म्हणून काम करत असून ते पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देत आहेत, अशी खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली.एजंटच्या स्वयंघोषित टोळीने पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांची बनावट सही व पोलीस आयुक्तालयाचा बनावट शिक्का तयार केला आहे. त्याद्वारे ते बनावट कागदपत्रे तयार करून रिक्षा परमिटसाठी त्याचा वापर करीत आहेत. या बदल्यात एका परमिट धारकाकडून १५ हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत ही टोळी पैसे उकळत आहे.
हा प्रकार मागील वर्षभरापासून सुरू आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याचे निदर्शनास येताच पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी या प्रकरणावर कारवाई करण्याच्या गुन्हे शाखा ‘युनिट एक’ला सूचना दिल्या.गुन्हे शाखा ‘युनिट एक’च्या पथकाने संबंधित एजंटची माहिती काढली. त्यांची नावे आणि त्यांच्या थांबण्याची ठिकाणे, कार्यालयात येण्याची-जाण्याची वेळ, परवान्याचे कागदपत्र, त्यांच्या कामकाजाची वेळ, त्यांचे सहकारी याबाबतची माहिती शोधून काढली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा एकच्या पोलिसांनी सुरुवातीला तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांची चौकशी करून आणखी चार जणांना ताब्यात घेतले. एकूण सात जणांकडून बनावट सही व शिक्क्याची वेगवेगळ्या मजकुराची एकूण 88 बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे जप्त केली.
तसेच काही शाळांचे शाळा सोडल्याचे कोरे दाखले, मुख्याध्यापकांच्या सहीचे कोरे दाखले, काही परिपूर्ण सही शिक्क्याचे दाखले, तहसीलदारांचे रहिवासी प्रमाणपत्र आढळून आले. पोलिसांनी कसून चौकशी करत आरोपींकडून चार वाहने, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर असा एकूण 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलिस करीत आहेत.ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, चारित्र्य पडताळणी (विशेष शाखा) विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील पिंजण, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, शिवाजी कानडे काळू कोकाटे, अमित गायकवाड, महेंद्र तातळे, अंजनराव सोडगीर, मनोजकुमार कमले, प्रवीण पाटील, विशाल भोइर, गणेश सावंत, प्रवीण मोरे, सचिन मोरे, तानाजी पानसरे, सायबर विभागाचे नाजुका हुलावळे व नितेश बिचेवार यांच्या पथकाने केली.