प्रा. डॉ. किरण मोहिते
२००० – ०१ साली स्वामी सदानंद भारती शिक्षण शास्त्र महाविद्यालय श्रीरामपूर येथे BEd ला ऍडमिशन घेतलंल. या महाविद्यालयाच्या वर्गमित्रांनी ६ नोव्हेंबर २०२२ राजी गेट टुगेदर घेण्याच ठरवलं. त्या दिवशी रविवार होता. तब्बल वीस वर्षांनंतर BEd कॉलेजची मित्र भेटणार, गुरुवर्य भेटणार, या उत्सुकतेपोटी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली. नियोजन केले. आठ दिवस अगोदर सरांना फोन केला.
“ सर! तुम्हीं आमच्या घरी यायचं! आपण येथूनच दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीने श्रीरामपूरला जाऊ ” सर म्हणाले. “ घरी चर्चा करतों अन् सांगतो.” सर आपल्या घरी येणार या आशेने घरी सर्व काही नियोजन केलं. दुसऱ्या दिवशी परत सरांना फोन केला. सरांनी लगेच होकार दिला. मला म्हणाले “ मोहिते मी तुझ्या घरी मुक्कामी येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण श्रीरामपूरला जाऊ ”. ते “मोहिते” या आडनावाने मला हाक मारायचे.
मला मोहिते म्हटल्यावर ओशाळल्यासारखं वाटायचं. परंतु, त्या पाठीमागे माया पोटी मारलेली हाक वाटायची. हाकेपाटी एक लळा, आपुलकी, माया, जिव्हाळा होता. जणू काय वडिलांनी मारलेली हाक. बोलणं मात्र, पोटातून असायचं, वरवरनी बोलणं नव्हतं. फोनवर बोलण जरी असलं, तरी कधी तेवढ्यापुरत क्षणिक बोलण नव्हतं, विस्तृतपणे बोलण करायचे. बोलण्यात गर्व नव्हता. अभिलाषा नव्हती. फक्त निखळ बोलण…
माणसाच्या बोलण्याच्या, हसण्याच्या छटा असतात. निखळ हसणं. वरवर हसणं. पोटापासून हसणं. असे नाना प्रकार असतात. सर, मला विद्यार्थी या नात्याने मोहिते म्हणत असले, तरी अरेतुरे न बोलता आवजावं बोलायचे. खर म्हणजे मी आवजाव बोलण्याइतक मी एवढा मोठा नव्हतो. सर, मला नेहमी म्हणायचे “कोणाच्या तरी मदतीला यावं, नेहमी मदत करावी, त्यांच्या बोलण्यात नेहमी सामाजिक उपक्रमचा गंध दरवळताना पाहिला आहे. त्यांच्या बोलण्यात कोणासाठी काहीतरी करावं, असं नेहमी बोलणं असायचं. फोनवर बोलता बोलता असाच त्यांनी एकदा त्याच्याबद्दल सामाजिक उपक्रमाचा किस्सा सांगितला.
मला म्हणाले “ मी चिपळूणला दर महिन्याला जात असतो ” मी म्हणालो “ कशाला ??? ”….. डोंगर दऱ्यात राहणाऱ्या कातकरी मुलांसाठी. मी त्याचं बोलण कान लाऊन ऐकत होतो. कातकरी मुल डोंगरात राहतात. दिवसभर काबाडकष्ट. डोंगरावरच शाळा. अन् त्यांना शिकवणारे शिक्षक देखील डोंगरदऱ्यातच. अशा शिक्षकांना पगार पोटी आम्ही एक महिन्याची पेन्शन देऊ करतो. मी पूर्णपणे थबकलो. उस्फूर्तिने ऐकतच होतो.
आज माणूस साधा रुपया पण कोणाला द्याच म्हटलं, तर दहा वेळा विचार करतो. माझं कुटुंब, गाडी, बंगला या चौकटीतच राहत असतात. जीवन कंठीत असतात. मी विचारलं , ” सर फक्तं यामध्ये तुमचाच सहभाग आहे का?”
“नाहीं”……या सामाजिक उपक्रमात माझा एकट्याचाच समावेश नाही. तर माझ्या मित्राचा देखील समावेश आहे…अजून एक त्याच्या बोलण्यात आल. १९८४ साली अपंगाच्या सर्वांगीण पुनर्वसन कार्यासाठी संस्थापिका अध्यक्ष डॉ. नसीमा मोहम्मद अमीन हुरजुक यांनी कोल्हापूर मध्ये हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅप या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केलेली आहे. डॉ. नसीमा यांना वयाच्या सोळाव्या वर्षी शारीरिक अपंगत्व आले. दोन्ही पायांना पोलिओ असला तरी जिद्दीने घरच्यांच्या सहकार्याने त्यांनी स्वतःचे आयुष्य पुन्हा उभे केले.
सर पुढे म्हणाले…. “अशा या स्वयंसेवी संस्थेचा मी सभासद झालो आहे सणासुदीला अशा मुलांसाठी खाऊ घेऊन, अथवा देणगी रूपाने फुल नाहीं तर फुलाची पाकळी देत असतो.” खरंच एखाद्याचं काय दातृत्व असतं, अशा थोर व्यक्तीच्या सहवासात गेल्यावरच त्यांचं खरं व्यक्तिमत्व कळतं. आपण तर अजून काहीच नाही, असं नेहमी वाटत राहत.
आदल्या दिवशी दोन दिवस अगोदर सकाळी लगबगीने फोन केला. “ सर तुमचं येण्याचं नियोजन.”…म्हणाले “ मी एसटीने वाकडपर्यंत येईल. दुपारी ४.०० पर्यंत पोहचेन. मी छोट्याला घेऊन गाडीने वाकडला पोहचलो. मी पूर्णपणे गागरून गेलो होतो. सराचा मला परत फोन. “ मोहिते! मी दोन मिनिटांमध्ये वाकडला पोहचतोय. “
मी तत्परतेने म्हणालो ” सर! मी देखील आलो आहे.”… गाडी पार्क केली. छोट्याला म्हणालो मागे बस… दरवाजा उघडला आणि गुपचूप मागे बसला. माझी नजर शोध घेत होती. इकडे तिकडे पाहू लागलो. हायवें रोडला गाडीची वर्दळ चालु होती. प्रत्येक येणाऱ्या एसटीकडे माझी नजर खेळत होती.
सर एसटीमधून उतरले. हातात बॅग, पांढरा शुभ्र शर्ट परिधान केलेला. हसरा चेहरा, असे भारदस्त व्यक्तिमत्वास मी चरण स्पर्श केला. हातातून बॅग घेतली. हाकेच्या अंतरावर गाडी उभी केली होती. गाडीत बसलो.
सर म्हणाले “अरे वा छोटयाला पण आणले आहे. ” बोलता बोलता घरी कधी पोहचलो तेच कळल नाहीं. गाडी पार्किंग मध्ये घेतली. सर म्हणाले “ वा उत्तम! छान बांधले आहे घर.” सरांच स्तुतीपर बोलणं ऐकलं. ऐकून भारावून गेलो. सावरलो. सरांनी छोट्यासाठी खाऊ आणला होता. सर फ्रेश झाले. चहा पाणी घेतल. बाजारात गेलो. काही प्रमाणात खरेदी केली. बाजारातून येता येता म्हणाले, “ मोहिते संध्याकाळी बरोबर ७ ते ८.३० पर्यंत मोठ्याचा इंग्लीश ग्रामरचा क्लास घेईन. ”सरांनी मला सांगितले होते की, मी घरी आल्यावर मोठ्याचा क्लास घेईन. Tense शिकवीन. रिपोर्टेड स्पीच शिकवीन.
अन् बरोबर ७.०० वाजता क्लास चालू केला. खरंच किती नियोजनबद्ध, कामकाज….. कार्डबोर्ड अन् पेन घेतला. शिकवायला सुरुवात केली. मी निरीक्षण करत होतो. एक वैशिष्ट्य जाणवलं कोणत्याही खुर्चीवर गादीवर न बसता खाली बैठक मांडून पोत्याच्या घडीवर बसलेले. मी पाहूनच थबकलो. म्हणालो सर! वरती तर बसा…. त्यांनी ऐकलं नाही, शिकवण्यात म्ग्न झाले होते. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. खरचं किती संस्कृतीपणा….
मोठ्याची शिकवणूक बघून आमच्या लहान्याने देखील वही पुस्तक घेऊन सरांजवळ येऊन बसला आणि म्हणाला “अंकल मला देखील बाराखडी शिकवा.”… सर हसले व म्हणाले चला आपण बाराखडी शिकवूं. सरानी अक्षरशः कार्डबोर्डवर क पासून सुरुवात केली ते क क़ं पर्यंत संपवलं.
मी तर बघून धन्य झालो. बरोबर ८.३० वाजता क्लास संपवला आणि म्हणाले, ” दोन्ही मुले शार्प आहेत, मोठ्याची ग्रासिंप पावर चांगली आहे. बारका देखील चप्पखल आहे. ” सरांनी दोन्ही मुलांना ओळखून जणु काय त्यांची कुंडलीच काढली होती.
एकत्र सहकुटुंब जेवायला बसलो. परत अर्धा पाऊण तास गप्पा रंगल्या…. आणि म्हणाले, ” मोहिते! मी सकाळी सहा वाजता उठतो, सात वाजेपर्यंत तयार होऊ आणि माझ्या कन्येकडे जाऊन येऊ. ” सरांची कन्या संभाजीनगरला राहत होती.. तिथं आम्ही सकाळीं जाऊन आलो. सरांच्या नातीला भेटलो. नातीला भेटण, बोलण, हे खूपच आजोबांच्या दृष्टीने अल्लादायकच.
परत घरी येताना गप्पा…. Bed कॉलेजची मित्र मंडळी घरी पोहचली होती. सराचा मित्राच्या हस्ते सत्कार केला. आम्ही सर्वजणांनी नाष्टा केला. अन् आम्ही श्रीरामपूरला गेट टुगेदर साठी निघालो. खरं सांगायचं म्हणजे आमचं अगोदरच घरात स्नेहसंमेलन झालं होतं. एक अद्भुत, अविस्मरणीय सरांचं घरी आगमन झाले. त्यावेळी खरंच आमच्यासाठी माझ्या कुटुंबासाठी आणि दोन्ही मुलांसाठी एक अनोखी भेट होती.
नियोजनबद्ध, सहकारीवृत्ती, सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत असणाऱ्या अशा मूर्तीचे नाव होतं, प्रा. डॉ. कुंभार आर. ए. अश्या भारदस्त व्यक्तिमत्वास शतशः प्रणाम…