PIMPRI : भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा – महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांची मागणी

PIMPRI : भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा - महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांची मागणी

पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – कॉंग्रेसच्या प्रचारात सहभागी होणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करण्याची धमकी भाजपचे खासदार धनंजय महाडिक (MP Dhanjay Mahadik) यांनी दिली आहे. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत पिंपरी चिंचवड शहरात महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यावेळी माजी नगरसेविका निगार बारस्कर, स्वाती शिंदे, शबाना शेख, आशा भोसले, महाराष्ट्र प्रदेश एन. एस. यु. आय.चे माजी अध्यक्ष मनोज कांबळे, एन. एस. यु. आय.चे उपाध्यक्ष उमेश खंदारे, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, संदेश नवले, आबा खराडे, हिरामण देवकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसवर टीका करताना चक्क महिलांना धमकी देत त्यांचा अपमान केला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान, महाडिक म्हणाले की, ”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या सभेत आणि रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो”, अशा शब्दात महिलांना एकप्रकारे दमच भरला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, ”या ठिकाणी काँग्रेसची रॅली निघाली, तर त्या रॅलीमधील महिलांचे फोटो काढा. लाडकी बहीण योजनेतून ज्या महिला १५०० रुपये घेतात, त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या. घ्यायचं शासनाचं आणि गायचं त्यांचं, असं अजिबात चालणार नाही. अनेक महिला आहेत, ज्या छात्या बडवून सांगत आहेत की, आम्हाला या योजनेचे पैसे नकोत. जर पैसे नको असतील, तर राजकारण का करताय? ज्यांना या योजनेचे पैसे नकोत, त्यांना म्हणायचं या फॉर्मवर सही कर, उद्यापासून लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद”, असंही धनंजय महाडिक यांनी महिलांना म्हटलं आहे.

दरम्यान, कोणत्याही शासकीय योजनेत लाभार्थ्यांना दिला जाणारा निधी, शासकीय तिजोरीतून दिला जातो. शासनाकडे नागरिकांच्या करातून हा निधी जमा होतो. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत शासनाने पैसे दिले आहेत. त्यावर भाजप आपला हक्क सांगत आहे. धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून त्यांनी महिलांना धमकी दिल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा पिंपरी चिंचवड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे (Sayali Nadhe) यांनी निषेध करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.