पुणे (लोकमराठी) :पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य बाजारासह खडकी, मोशी, उत्तमनगर उपबाजार आजपासून बंद राहणार आहेत. या सर्व बाजारांमधील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विक्री आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, “पुण्यातील या सर्व मार्केटमधील विविध विभाग पुढील काळात बंद राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने फळं, भाजीपाला, कांदा-बटाटा याची विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र, भुसार आणि कडधान्य विभाग सुरु राहणार आहेत.”
पुणे शहरात १५ नवे कोरोनाबाधित
पुणे शहरात आणखी १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ जण डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामुळे पुणे शहरातील रुग्णांची संख्या आता १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे. तसेच २० करोनाबाधित रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल(@Loksatta)जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक कराआणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.