- राज्यातील सर्व आमदारांकडे विधानसभेत आवाज उठविण्याची निवेदनाद्वारे केली मागणी
पुणे : विश्ववंद्य छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण लेखक गिरीष कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनेसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातून संभाजी महाराज यांची नियोजनबद्ध आणि चाणाक्षपणे बदनामी केली आहे. त्यामुळे गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांनी लिहिलेल्या “रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र” या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र विधानसभेच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यातील सर्व आमदारांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
लेखक गिरीश कुबेर यांनी आपल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी मोतोत्री ची हत्या केली आहे असे अनैतिहासिक लिखाण केले आहे, तसेच कुबेर यांनी महादजी शिंदेंची बदनामी केली आहे. या पुस्तकासंदर्भात महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट निर्माण झालेली आहे. या विरोधात अनेक राजकीय पक्ष, विविध संघटना, गट आणि लोकांकडून पुस्तकावर बंदी आणण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे,तसेच याबाबत संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक निवेदने देऊन अनेक आंदोलने केलेली आहेत. तसेच ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे पार पडले होते,यावेळी या साहित्य संमेलनात शिवप्रेमी, शंभुप्रेमीनीं लेखक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करीत आंदोलन केले होते.
तसेच शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केलेला आहे. तरी देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई अद्यापही करण्यात आलेली नाही. त्यामुळे महाराजांची बदनामी करणार्यांना शासन पाठीशी घालत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.महाराष्ट्र राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची करण्यात आलेल्या विटंबने संदर्भात आवाज उठवला. त्यासोबतच पुस्तकाच्या माध्यमातून महाराजांची करण्यात आलेले बदनामीच्या विरुद्धार्थी आक्रमक होणे गरजेचे आहे. त्यामुळं सरकारने या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी व पुस्तकाचे लेखक, गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करून बाजारातून वितरीत करण्यात आलेल्या पुस्तकाच्या प्रती मागे घेण्यात याव्यात, यासाठी राज्यातील लोकप्रतिनिधीं मार्फत हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात यावा, अशी मागणी राज्यातील सर्व आमदारांकडे निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे सदर निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे कार्याध्यक्ष गणेश दहिभाते संघटक ज्ञानेश्वर लोभे यांच्या सह्या आहेत.