रहाटणीत नवीन डीपी बसवा व खचलेल्या डीपींची उंची वाढवा

रहाटणीत नवीन डीपी बसवा व खचलेल्या डीपींची उंची वाढवा
  • शिवसेना विभाग प्रमुख प्रदीप दळवी यांची महावितरणकडे मागणी

रहाटणी : प्रभाग क्रमांक २७ मधील बऱ्याच भागात नवीन विद्युत डीपी बॉक्स बसविण्यात आलेले नाहीत. तर अनेक विद्युत डीपी बॉक्स खराब झाले असून बहुसंख्य डीपी बॉक्स खचले आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात. अशी मागणी शिवसेना विभाग प्रमुख प्रदीप दळवी यांनी महावितरणकडे केली आहे.

याबाबत दळवी यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांनी नवीन डीपी बसवावेत म्हणून अनेक वेळा अर्ज दिले आहेत. अष्टविनायक कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, वेणाई कॉलनी, अंबिका कॉलनी, जय भवानी चौक, ज्ञानदीप कॉलनी, शिवनेरी कॉलनी, आदिनाथ कॉलनी, नथुराज कॉलनी अशा अनेक कॉलनीतील नवीन डीपी अजूनपर्यंत बसविलेले नाहीत. महावितरण नागरिकांची दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न दळवी यांनी उपस्थित केला आहे.

तसेच या जुन्या डीपीमध्ये पावसाचे पाणी जाऊन अनेक वेळेस ज्वाला निघतात व रस्ते उंच झाल्यामुळे जुन्या डीपी खड्ड्यातच राहिलेल्या आहेत. प्रशासनाने या कामाची स्वतः पाहणी करून नवीन डीपी बसवून हे काम लवकरात लवकर करून द्यावे.

नागरिकांनी अनेकदा सांगूनही जुन्या डिपी दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे दुर्दैवाने एखादा मोठा अपघात झाल्यास जबाबदार अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. हे काम पंधरा दिवसांमध्ये पूर्ण न झाल्यास शिवसेना व नागरिकांच्या वतीने महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, महावितरण काळेवाडी विभागाचे कनिष्ठ अभियंता ननावरे यांना निवेदन देताना शिवसेना विभागप्रमुख प्रदिप दळवी, विभागसंघटक अंकुश कोळेकर, शाखाप्रमुख अरुण हुमनाबाद, शाखाप्रमुख प्रमोद लांगे उपस्थित होते.