- काळेवाडीत पाच पाणपोईचे लोकार्पण तर शाळेला वीस महापुरुषांच्या प्रतिमा भेट
पिंपरी, ता. २३ : काळेवाडी येथील शिवशाही महिला बचत गटाच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या कोमल सचिन काळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कोमल काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सचिन काळे सोशल फाउंडेशनच्या वतीने काळेवाडी प्रभागात पाच ठिकाणी सार्वजनिक मोफत पाणपोईचे उदघाट्न करण्यात आले. याप्रसंगी माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक विनोद नढे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इमरान शेख, संगीता कोकणे, जयदीप जोगदंड यांच्यासह सचिन काळे सोशल फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच मावळ तालुक्यातील पांगळोली या अतिशय दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेला वीस महापुरुषांच्या प्रतिमा भेट म्हणून देण्यात आल्या.
पाणपोई लोकार्पणप्रसंगी बोलताना कोमल काळे म्हणाल्या की, माणुसकीच्या नात्याने आपण देखील कुठंतरी समाजाचं देणं लागतो. यंदा उन्हाची तीव्रता खूप असून नागरिकांना घराबाहेर पडल्यानंतर अनेकदा तहानेने व्याकुळ व्हावे लागते. प्रत्येकालाच पाणी विकत घेणे परवडत नाही. याच बाबीचा विचार करून वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही नागरिकांच्या सोयीसाठी पाच पाणपोईचे लोकार्पण केले आहे.
दरम्यान, कोमल काळे यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी समाजातील राजकीय, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर आणि काळेवाडीतील हजारो नागरिक उपस्थित होते.