महात्मा ज्योतिराव फुले यांना आम आदमी पार्टीच्या वतीने अभिवादन

महात्मा ज्योतिराव फुले यांना आम आदमी पार्टीच्या वतीने अभिवादन

पिंपरी : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी आम आदमी पार्टीचे सहसंघटक वहाब शेख, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष महेश बिराजदार, वैजनाथ शिरसाट, यशवंत कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

शहरकोअर कमिटी सदस्य वैजनाथ शिरसाट बोलताना म्हणाले की, “सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. स्त्रीयांसाठी शिक्षणाची दारे खुली करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढून वैचारिक, सामाजिक क्रांती घडवली. राज्यकर्त्यांनी शेतकरी, बहुजन समाजाला केंद्रस्थानी ठेवून धोरणं आखली पाहिजेत हा विचार दिला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारांमध्ये राज्याला, देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे. समाजासाठी खूप मोठं काम करणारे हे फुले दाम्पत्य अद्यापही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेलं नाही. केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणी केली. आम आदमी पार्टीच्या वतीने आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल व दिल्लीचे आपचे लोकसभा सदस्यांना या विषयावर आवाज उठवण्याची विनंती करणार आहोत.”

आपचे सामाजिक न्याय विंगचे अध्यक्ष यशवंत कांबळे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र सरकारनेही 2016 मध्ये तशी शिफारस केंद्राकडे केली होती. परंतु केंद्रसरकार या कडे दुर्लक्ष करत आहे, 1954 पासून भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत 45 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2015 मध्ये मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात आला होता. त्यानंतर 2019 मध्ये प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका (मरणोत्तर), नानाजी देशमुख (मरणोत्तर) यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. परंतु महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना ‘भारतरत्न’ का नाही?