कोरोनाचा नवीन स्ट्रेन देशात प्रवेश करू नये, याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे

कोरोनाचा नवीन स्ट्रेन देशात प्रवेश करू नये, याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे

डॉ. प्रकाश कोयाडे

गेल्या दोन दिवसांत कोविड संबंधित अचानक बातम्या येऊ लागल्या आहेत. तिसऱ्या लाटेबद्दल चर्चा होऊ लागली आहे. कोरोनाबद्दल सोशल मीडिया आणि टीव्ही वरील सुरू झालेल्या चर्चेवरून समज-गैरसमज आणि अफवांचं पीक उठणार आहे. एक भीतीचं वातावरण तयार होऊन येत्या आठवड्याभरात आपण पॅनिक अवस्थेत जाऊ की काय अशी परिस्थिती येण्याच्या मार्गावर आहे.

कोरोनाचा नवीन स्ट्रेन ‘Omicron चे दोन रुग्ण बेंगलोरमध्ये सापडले असून ते दक्षिण आफ्रिकेचे रहिवासी आहेत. त्यांचे अजून काही रिपोर्ट यायचे बाकी आहेत. नेमके किती म्युटेशन झाले आहे याबद्दल माहिती येणं बाकी आहे. सध्यातरी एकाही भारतीयांमध्ये हा विषाणू सापडला नाही.

या स्ट्रेन बद्दल बरेच तर्क-वितर्क सुरू आहेत. लक्षणं असणार नाहीत, नाक-घशात हा विषाणू प्रकार सापडत नाही डायरेक्ट फुफ्फुसात जातो, शेवटच्या टप्प्यात आल्यानंतरच हा डिटेक्ट होतो वगैरे चर्चा सुरू आहेत. टीव्हीवाले हाच मुद्दा धरून पॅनिक पसरवतील, अर्धवट ऐकीव माहिती पुन्हा पुन्हा सांगतील. एक मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे की, शेवटी तो कोरोनाचाच एक प्रकार आहे त्यामुळे मूळ कोरोना विषाणूपेक्षा फार भयानक वेगळा असा काही राहणार नाही. त्यामुळे घाबरून जाण्यात काही अर्थ नाही.

काही गोष्ट आशादायक आहेत जसं की भारतात बऱ्यापैकी लोकांना कोरोना होऊन गेला आहे तसेच लसीकरणही झाले आहे, येत्या दोन महिन्यांत अजून लसीकरण होईल त्यामुळे संक्रमण भरपूर होईल, कोरोना रुग्णांची संख्या गेल्या लाटेप्रमाणे दरदिवशी लाखावर जाईल पण मनुष्यहानी जास्त होणार नाही.

गेल्या दोन वर्षांत जे नुकसान झालं आहे ते पुन्हा होऊ नये म्हणून शासनाने आजच पाऊल उचलणं आवश्यक आहे आणि त्यातील सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आफ्रिका आणि इतर संक्रमित देशातून येणारी विमानं थांबवावीत! जे लोक आले आहेत त्यांची ट्रेसिंग आणि त्यांचं आयडियल आयसोलेशन करणं आवश्यक आहे. आज जर हा निर्णय घेण्यात उशिर झाला तर पुन्हा तेच पाढे सुरू होतील. नंतर लॉकडाऊन लावून लोकांना वेठीस धरण्यापेक्षा विषाणूने देशात प्रवेश करूच नये याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

लक्षात घ्या, भारतातील लोकांची इम्युनिटी खूप मजबूत आहे. आपल्याकडे जे लोक गेल्या दोन लाटेंमध्ये मृत्यू पावले ते आजारापेक्षा जास्त बेड न मिळाल्याने आणि दुर्लक्ष केल्यामुळे झाले आहेत. संक्रमित लोकांची संख्या मर्यादेबाहेर गेली की व्यवस्था कोलमडून पडते हा दोन्ही वेळचा अनुभव आहे. फेब्रुवारीच्या शेवटी ही वेळ येऊ शकते!

ही वेळ येऊ नये हे आजघडीला फक्त शासनाच्या हाती आहे!इतर कोणत्याही कामापेक्षा या विषाणू प्रकाराला इकडे येऊ न देणं ही देशाची प्राथमिकता आहे. नंतर लोकांच्या माथी खापर फोडून लॉकडाऊन लावण्यात काहीही अर्थ नाही.