पिंपरी : राज्यस्तरीय ट्रॅडिशनल रेसलिंग आणि पॅनक्रेशन स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील आदित्य मल्लिकार्जुन बुक्की याने ७१ किलो वजन गटामध्ये बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग आणि पॅनक्रेशन या तीन क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली.
महाबळेश्वर, पाचगणी येथील एल्लिसियम रिसॉर्ट येथे दिनांक २३ व २४ एप्रिल रोजी या स्पर्धा संपन्न झाल्या. सातारा जिल्हा ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन तर्फे या स्पर्धांचे आयोजन केले होते.
स्टेट ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून १५० पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला. पिंपरी-चिंचवड संघटनेच्या वतीने आदित्य बुक्की याने तीन क्रीडा प्रकारात भाग घेऊन तीन सुवर्ण पटकाविले. या स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड प्रथम, पुणे द्वितीय आणि रायगड तृतीय सांघिक विजेतेपदाचे मानकरी ठरले.
आदित्य बुक्की याला प्रशिक्षक उमरकासिम तांबोळी यांनी मार्गदर्शन केले. पिंपरी-चिंचवड संघटनेचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी त्याला मोलाचे मार्गदर्शन केले.
दरम्यान, आदित्य बुक्की हा आंतरराष्ट्रीय खेळाडू असून या स्पर्धेनंतर तो १२ ते १५ मे २०२२ दरम्यान होणाऱ्या सी. एम. कप व फर्स्ट ए.आय. टी. डब्ल्यू. पी. एफ. फेडरेशन कप २०२२ ट्रॅडिशनल रेसलिंग आणि पेॅनक्रेशन नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार आहे.
तसेच मागील २०१९ व २०२१ मधील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये याच वजन गटांमध्ये त्याने सुवर्ण पदक मिळविले. त्यानुसार त्याची निवड रशियातील याकुत्सुक येथे होणाऱ्या वर्ल्ड मास रेसलिंग चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेत भारतीय संघात झाली आहे. दिनांक २१ ते २७ जून २०२२ दरम्यान या स्पर्धा होणार असून त्यात जगातील ५० पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. त्याच बरोबर दिनांक १ ते ४ जुलै २०२२ दरम्यान नूर सुलतान कजाकिस्तान येथे आयोजित एशियन पॅनक्रेशन स्पर्धेत सहभागी होऊन तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. अशी माहिती कोब्रा मार्शल आर्टचे संचालक उमरकासिम तांबोळी यांनी दिली.
आदित्य बुक्की हा इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स मध्ये बीसीएच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. त्यांच्या या यशाबद्दल इंदिरा कॉलेजच्या संचालिका डाॅ. तरीता शंकर यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक करून येणाऱ्या स्पर्धेकरिता त्याला शुभेच्छा दिल्या.