हडपसर (प्रतिनिधी) : देशाच्या विकासात युवकांचे स्थान मोलाचे आहे. युवकांना संधी मिळावी म्हणून ही स्पर्धा घेण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांनी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपले विचार व्यक्त करावेत. असे विचार आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम प्रमुख इंद्रजीत बागल यांनी व्यक्त केले. ते एस. एम. जोशी कॉलेजमधील मराठी विभाग आणि आकाशवाणी केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त “युवकांसाठी #AIR Nxt विशेष स्पर्धा 2021-22” तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त भाषण स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा व कथाकथन इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी, स्पर्धा प्रमुख मुजमिल पटेल यांनीही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, युवकांमधील टॅलेंट शोधण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आकाशवाणीसाठी आर. जे. शोधण्यासाठी ही स्पर्धा आहे. असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, युवकांनी संधीचे सोने करावे. ही स्पर्धा अनन्यसाधारण अशी स्पर्धा आहे. या स्पर्धेतून युवकांचे विचार देशासाठी उपयुक्त ठरणार आहेत. देशाचा अभिमान व्यक्त करणारा विचार युवकांनी व्यक्त करावा. सतत ज्ञानाची साधना करावी. असे विचार डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी व्यक्त केले. या स्पर्धेत शुभम शेंडे यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
द्वितीय क्रमांक वैभवी काळभोर व उत्तेजनार्थ सिद्धेश कायगुडे व अंजली क्षीरसागर यांना मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अतुल चौरे यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. नम्रता मेस्त्री, शुभम तांगडे यांनी केले. आभार डॉ. संदीप वाकडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.