- कब्रस्तान संघर्ष समितीच्या वतीने श्रीरंग बारणे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महेश लांडगे यांना निवेदन
पिंपरी : थेरगाव, काळेवाडी परिसरामध्ये मुस्लिम कुटुंबात एखाद्या व्यक्तीची मयत झाल्यास दफनविधीसाठी जागाच उपलब्ध नसल्याने प्रशासनाकडून समाजावर अन्याय होत आहे. तसेच मुस्लिम बांधवांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत मागील महिनाभरापासून कब्रस्तान संघर्ष समितीच्या वतीने परिसरात अनेक बैठका घेण्यात आल्या. लोकांमध्ये जनजागृती करून मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार करण्यात आला.
या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना पत्र पाठवण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील तसेच उपसंचालक नगररचना प्रभाकर नाळे यांची भेट घेऊन दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले होते.
दरम्यान, जनतेच्या भावनांचा उद्रेक पाहता पोलीस प्रशासनाला सुद्धा समाजाच्या भावना निवेदनाच्या माध्यमातून पोहचवल्या आहेत. मागील दोन दिवसांमध्ये शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या भेटी गाठी सुरु आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थेरगाव काळेवाडी दफनभूमी प्रश्नी कब्रस्तान संघर्ष समितीने शिवसेनेचे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे या सर्वांची भेट घेऊन मुस्लिम समाजाच्या दफनभूमी प्रश्नाबाबत चर्चा केली व मुस्लिम समाजाला काळेवाडी, थेरगाव परिसरामध्ये दफनभूमी साठी जागा उपलब्ध करून देणेबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळेस सर्व पक्षीय आमदारांनी आपापल्या पातळीवर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याशी बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच खासदार श्रीरंग बारणे यांनीही स्वतः या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवाना दफनभूमी प्रश्नाबाबत अशा निर्माण झाली आहे.
त्यावेळी कब्रस्तान संघर्ष समितीचे सिद्दीकभाई शेख, आवद चाऊस, तौफिक पठाण, कारी इकबाल उस्मानी, नूर खान, शब्बीर शेख, मिटुभाई शेख, इम्रान शेख, लतीफ अन्सारी, जुम्मादिन मुलाणी, मुस्तफा तांबोळी, शकील बेग, मैनुद्दीन शेख, तहसीन खान, अख्तर खान, अयुब इनामदार, अल्ताफ शेख, मलंग शेख, इम्रान शेख, फय्याज सय्यद, अब्दुल गणी सय्यद, कलीम शेख यांसह अनेकजण उपस्थित होते.