भक्ती शक्ती समुह शिल्पाजवळ शौचालय व ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था करण्याची मागणी

निगडी : भक्ती शक्ती समुहशिल्पाजवळ सार्वजनिक शौचालय व ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी बारा बलुतेदार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष विशाल जाधव व जिल्हाध्यक्ष सोमनाथ शेळके यांनी केली आहे.

याबाबत महापौर माई ढोरे व महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बारा बलुतेदार महासंघाचे पदाधिकारी २ फेब्रुवारी रोजी संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त निगडी येथील भक्ती शक्ती समूह शिल्पाचे दर्शन व संत तुकाराम महाराजांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झालेली पहावयास मिळाली, काही ठिकाणी फर्शीच्या जॉईंट मधील सिमेंट निघालेले तर काही फरश्या निम्म्या तुटलेल्या अवस्थेत दिसल्या.

तसेच अती संवेनशील बाब म्हणजे या परिसरात अनेक पर्यटक विशेष म्हणजे महीला, मुले व ज्येष्ठ नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी शौचालयाची सोय नाही. त्यामुळे सदर दुरुस्ती व स्वच्छ्तागृहाची सोय लवकरात लवकर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावे. असे निवेदनात नमूद केले आहे.

त्याप्रसंगी बारा बलुतेदार महासंघाचे युवाप्रदेशाध्यक्ष विशाल जाधव, पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ तुकाराम शेळके, पिंपरी चिंचवड सचिव संतोष अशोक कुमावत, मावळ तालुका महिला अध्यक्षा संध्या संतोष कुमावत, भगवान बाबा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश ढाकणे उपस्थित होते.