बाळासाहेब गायकवाड – ख्रिस्ती समाजातील एक घोंघावलेले वादळ

बाळासाहेब गायकवाड - ख्रिस्ती समाजातील एक घोंघावलेले वादळ


कामिल पारखे


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्वचितच सार्वजनिक व्यासपीठावर हजेरी लावत असत. निवडणुकीच्या काळातच फक्त त्यांच्या मुंबईबाहेर प्रचारसभा होत असत. मात्र, अहमदनगर येथे १३ नोव्हेंबर १९९२ रोजी होणारी ती जाहीर सभा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधणारी ठरली. अहमदनगरच्या त्यादिवशीच्या घडामोडींची बातमी देण्यासाठी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांनी आपल्या मुख्यालयातून बातमीदार पाठवले होते. याचे कारण म्हणजे गेले अनेक दिवस विविध कारणांनी प्रकाशझोतात असलेले ख्रिस्ती कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड हे त्यादिवशी ठाकरे यांच्या उपस्थितीत हिंदू धर्मात पुनर्प्रवेश करणार होते.


महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजजीवनात या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली होती. तसे पाहिले तर महाराष्ट्रात मराठी ख्रिस्ती समाजघटक अगदीच नगण्य आहे, या घटकाच्या अस्तित्वाची आजच्या घडीलाही अनेकांना जाणीवही नाही. संघटीत नसल्याने हा समाज कुठे आहेत, त्याच्या स्वतःच्या काही वेगळ्या समस्या आणि अस्मिता आहेत का याची इतर समाजघटकांना माहिती नाही. असे असूनही या समाजात उठलेल्या त्या वादळाची बहुसंख्य समाजाने त्यावेळी दखल घेतली आणि त्याकाळात प्रसारमाध्यमाची मक्तेदारी असलेल्या मुद्रित माध्यमांनीही या घोघावत्या वादळाला अधिक शक्तीही मिळवून दिली. या वादळाचे कारण आणि निमित्त होते मराठी ख्रिस्ती समाजातील एका युवानेत्याने, ‘ख्रिस्ती महार’ या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक बाळासाहेब गायकवाड यांनी पुनर्धर्मांतर करुन हिंदू धर्मात परत येण्याची केलेली घोषणा.
”ख्रिस्ती महार” या आपल्या पुस्तकाचा शेवट गायकवाड यांनी पुढील वाक्यांत केला होता. ”चर्चचा घंटानाद चाललाय…. मला आंबेडकर जयंतीच्या घोषणा ऐकू येत आहेत…त्या उत्सवात सामील व्हायचे आहे.. कोण माझी सुटका करणार? ”

अर्थात हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करणारे बाळासाहेब गायकवाड मराठी ख्रिस्ती समाजातील पहिली व्यक्ती नव्हती. मध्ययुगीन काळात पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या पालघर जिल्ह्यातील वसई परीसरातील ख्रिस्ती धर्म तीन शतके जुना असला तरी महाराष्ट्राच्या पश्चिम आणि इतर भागांत ख्रिस्ती धर्माचे आगमन ब्रिटीश अमदानीत झाले आहे. महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्म रुजला आणि फोफावला तो एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात. विदर्भात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, कोल्हापूर वगैरे जिल्ह्यांत या काळात ख्रिस्ती धर्माने मूळ धरले. मात्र रितसर बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती झालेल्या यापैकी अनेकांनी पहिल्या किंवा दुसऱ्या पिढीतच विविध कारणांनी परत आपल्या स्वधर्मात आणि अर्थांतच मूळच्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींत गाजावाजा न करता पुन्हा प्रवेश केला होता. ख्रिस्ती धर्मात राहाण्याचे आर्थिक आणि इतर तोटे समजल्याने काहींनी विचारपूर्वक हे पुनर्धर्मांतर करुन आपल्या शैक्षणिक, राजकिय आरक्षणाच्या हक्कांवर आणि इतर सोयीसुविधांवरचा हक्क शाबूत ठेवला होता. ख्रिस्ती धर्मांत राहिले तर हे आरक्षण आणि इतर सुविधा आपल्याला मिळत नाही हे अनेकांच्या लक्षात आले होते. दलित ख्रिश्चनांचे हे मोठ्या प्रमाणावरचे पुनर्धर्मांतर मराठवाड्यात आणि महाराष्ट्राच्या इतर भागांत विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात आणि नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केल्यानंतर घडले. औरंगाबाद जिल्ह्यातील माझ्या स्वतःच्या घरातील म्हणजे आजीआजोबांचे समान रक्त असलेल्या भाऊबंदांनी अशाप्रकारे बौद्ध धर्म स्वीकारुन पुनर्धर्मांतर केले आहे. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील या दलित समाजात एखाद्या व्यक्तीने व कुटुंबाने हिंदू धर्म सोडून ख्रिस्ती होण्याची, परत हिंदू वा बौद्ध होण्याची वा काही कारणांनी पुन्हा ख्रिस्ती धर्माकडे वळण्याच्या कैक घटना आहेत. या दलित लोकांमध्ये धर्माधर्मांत असे आत-बाहेर होण्याचे प्रकार कायम होत असतात याची इतर बहुसंख्य समाजाला माहिती वा सोयरसुतकही नसते.

धर्माधर्मांतून आतबाहेर जाण्याची अशी जुनीच आणि चालू असलेली परंपरा असतानासुद्धा बाळासाहेब गायकवाड यांच्या ख्रिस्ती धर्मातून हिंदू धर्मात माघारी जाण्याच्या जाहीर घोषणेने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. गायकवाड हे राज्यातील दलित ख्रिस्ती समाजातील उदयोन्मुख कार्यकर्ते आणि लेखक असल्याने त्यांनी घेतलेल्या पुनर्धर्मांतराच्या या घोषणेने मराठी ख्रिस्ती समाजात फार मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली होती.

आपण आणि आपल्यासह शेकडो दलित ख्रिस्ती हिंदु धर्मात परतणार आहोत आणि हे पुनर्धर्मांतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथे होईल असे गायकवाड यांनी जाहीर करुन गायकवाड यांनी मोठा बॉम्बगोळाच टाकला होता. याचे कारण अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असलेल्या काही प्रमुख मोजक्या भागांत येतो. मुंबई, पालघर जिल्ह्यातला वसई तालुका, पुणे आणि पिंपरी चिंचवड ही जुळी शहरे, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांत ख्रिस्ती समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यातही राज्यभर पसरलेल्या स्थलांतरीत मराठी ख्रिस्ती समाजातील बहुसंख्य लोक मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. ख्रिस्ती समाजाच्या या बालेकिल्ल्यात होणाऱ्या पुनर्धर्मांतराच्या या कार्यक्रमामुळे या समाजात नाराजी आणि संताप निर्माण होणे साहजिकच झाले. आणि याचे प्रत्यंतर लवकरच दिसू लागले.

कोण होते हे बाळासाहेब गायकवाड ?
बाळासाहेब गायकवाड हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहराजवळील उंबरे या गावचे. वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘ख्रिस्ती महार’ या नावाचे आत्मचरित्रात्मक पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकाने त्यांना ख्रिस्ती समाजाबाहेर ओळख निर्माण करून दिली. मात्र ते एकदम प्रकाशझोतात आले ते त्यांनी १९९२च्या जून महिन्यात आपण हिंदू धर्मात परतणार अशी घोषणा केल्याने. त्या घोषणेनंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संपादक असलेल्या ‘सामना; दैनिकाच्या अग्रलेखातून गायकवाड यांच्या समर्थनार्थ अग्रलेख छापून आला. ठाकरे यांनी आपण गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही दिली होती. यानंतर महाराष्ट्रात एक नवे वादळ घोंघावू लागले, या वादळाचे केंद्रबिंदू अर्थांतच बाळासाहेब गायकवाड होते. विरुद्ध बाजूला ख्रिस्ती समाजातर्फे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी उडी घेतली होती.

गायकवाड यांनी त्या दिवसांबद्दल ‘माझे हिंदू धर्मांतर आणि संघ परिवार’ या २००० साली त्यांनी स्वतः प्रकाशित केलेल्या पुस्तकात तपशिलवार लिहिले आहे. एकदा ते ‘मातोश्री’वर बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेले, सुरक्षा कारणामुळे त्यांना भेटता येईना तेव्हा तेथिल एका पोलिसाने त्यांना सल्ला दिला: ”तुम्हाला साहेबांना भेटायचे आहे का? मग त्यांच्या गाडीपुढे आडवं व्हा. घाबरून नका !” मी थांबूनच राहिलो. गाड्या सुसज्ज झाल्या. साहेबांच्या कारपुढे दोन पोलिसांच्या गाड्या तर मागे दोन गाड्या. ते व उद्धव ठाकरे बाहेर कोणत्या तरी कार्यक्रमाला निघाले होते. खास स्टाईलमध्ये शाल ओढली. तुळशीला वंदन केले नि पोलिसांच्या व्यवस्थेत कारमध्ये बसले. तोच मी धावत गेलो. सुटकेससहित. पोलिसांनी स्टेनगन अंगावर रोखली. साहेबांनी थांबवलं. ”बोला !” ”मी नगरचा. तुम्ही नगरच्या धर्मांतराच्या कार्यक्रमाला यावे !” ”तुम्ही डॉ. गायकवाड?” इथेच थांबा. मी एक तासात येतो. ”

संध्याकाळी गायकवाड बाळासाहेब ठाकरेंना भेटले. त्यांना ‘ख्रिस्ती महार’ची प्रत दिली. ”गायकवाड, मी नगरला येतो. कोण माझा बाप्तिस्मा करतो ते पाहतो. तुम्ही घाबरु नका. ख्रिस्ती मिशनरी अंगावर आले तर त्यांना शिंगावर घेऊ.” असे साहेबांनी त्यांना सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांनी पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती शताब्दी कार्यक्रमात सांगितले. ” बाळासाहेब गायकवाड यांनी हिंदू धर्मांतराचा जो निर्णय घेतलाय त्याचं मी स्वागत करतोय. एव्हढा पावसाळा संपल्यावर मी नगरला जाणार आहे.” दुसऱ्या दिवशी संबंध वृत्तपत्रांतून बातम्या पडल्या. ”

१३ नोव्हेंबर १९९२ ही धर्मांतराची तारीख ठरली होती. महाराष्ट्रभर वातावरण तापू लागले. राज्यातल्या दैनिकांत आणि इतर नियतकालिकांत बाळासाहेब गायकवाड यांच्या मुलाखती आणि बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. ख्रिस्ती समाजात अस्वस्थता वाढत होती पण त्यांच्याकडे ना कुठली सामाजिक संघटना ना सामाजिक नेता. त्यामुळे पुन्हा एकदा ख्रिस्ती धर्मगुरुंकडे या समाजाच्या या आंदोलनाची सूत्रे आली. ख्रिस्ती समाजाबाहेर नाव असलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो समाजाच्या वतीने मग बाजू मांडू लागले. या ख्रिस्ती समाजाच्या साथीला येऊन काही दलित संघटनांनी गायकवाड यांच्या हिंदू धर्मांतरविरोधी भूमिका घेतली आणि वातावरण अधिकच तापले. अहमदनगरचे शिवसेना आमदार अनिल राठोड आणि जिल्हा संपर्क प्रमुख बाबूशेठ टायरवाले गायकवाड यांच्या धर्मांतराची सर्व व्यवस्था पाहत होते.

धर्मांतराच्या त्या घटनेचे वर्णन बाळासाहेब गायकवाड यांनी आपल्या पुस्तकात केलेले आहे. संक्षितपणे पण त्यांच्याच शब्दांत ते पुढीलप्रमाणे:`संपूर्ण नगर जिल्हा नि महाराष्ट्र या मुद्यावर गाजत होता. पत्रकार माझी पाठ सोडत नव्हते… मी संपूर्ण जिल्हा फिरत होतो. शिवसैनिक बऱ्यापैकी सहकार्य करत होते. हजारो लोकांनी येण्याचं, धर्मांतरात सहभागी होण्याचं आश्वासन दिलं होतं. कार्यक्रम जवळ येत होता. माझे मित्र अशोक गायकवाड यांनी दलित पँथरच्या वतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी (धर्मांतरविरोधी) मोर्चा आणण्याची घोषणा केली होती. त्यामुळे वातावरणात बदल झाला होता. चार-दोन दिवस मला नगरमध्ये आमदार अनिल राठोड यांच्याशेजारच्या एका रुममध्ये बंद करण्यात आलं. तत्पूर्वी दोन दिवस एम. आय डी. सी.च्या एका हॉटेलात बंद करण्यात आलं. ख्रिस्ती लोक अशोक गायकवाडमुळॆ प्रथमच रस्त्यावर आले होते. पुनश्च एकदा येशू ख्रिस्ताला क्रुसावर खिळे ठोकतात कि काय, असं वाटत होतं. नगरमध्ये आलो. पत्रकार परिषद होती. पत्रकारांच्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरं देत होतो. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आदल्या दिवशी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं. ‘ख्रिश्चन दलितांवर अन्याय झालेला आहे. पण ज्या व्यासपीठावर गायकवाड गेलेत ते व्यासपीठ बरोबर नाही. डॉ. आंबेडकरांचा मार्ग त्यांनी स्वीकारायला हवा होता.”

“धर्मांतराचा दिवस उगवला. बाळासाहेब ठाकरेंचं आगमन झालं. मी बंद खोलीत होतो. ‘नाशिक सकाळ’ चे कार्यकारी संपादक उत्तम कांबळे माझी मुलाखत घेण्यासाठी आले. त्यांना घाईत मुलाखत दिली. आदल्या दिवसाची पत्रकार परिषदेची बातमी पहिल्या पानावर पडली होती – “हिंदू होण्यासाठी कोणताच विधी मी करणार नाही. ” मला बाळासाहेबांच्या भेटीसाठी नेण्यात आलं. व्हीआयपी गेस्टहाऊसवर त्यांची सर्व फॅमिली, कार्यकर्ते होते. नगरमध्ये जेवढी स्टॅंडर्ड हॉटेल्स होती, ती गच्च भरुन गेली होती. साहेबांना भेटलो. त्यांनी विचारलं, ‘फ्रेश आहात ना?’ आमदार मनोहर जोशी, मी व ते एका खोलीत बसलो. ‘धर्मांतरासाठी आलेली माणसं बाहेर काढता येतील का?” मी स्पष्ट ‘नाही’ म्हणालो. ‘मी गेले आठ दिवस बंद आहे. तेव्हा ते शक्य नाही.’ साहेबांबरोबर व्यासपीठावर आलो. माझ्या व बाळासाहेब ठाकऱ्यांच्या विरोधात दुपारी प्रचंड मोठी निषेधसभा झाली होती. मी हादरुन गेलो होतो. ”

“पाच लाख समाज जमला होता. मातंग समाजाचे नेते बाबासाहेब गोपले यांचे भाषण नंतर आजच्या (१९९९ सालच्या म्हणजे मनोहर जोशी) मुख्यमंत्र्यांचं भाषण, माझं भाषण. मी खूप अभ्यासपूर्ण बोललो. शेवटी बाळासाहेब ठाकरेंचं भाषण. साहेबांनी माझ्या धर्मांतरांचं समर्थन केलं. कार्यक्रम संपला. व्हीआयपी सर्किट हाऊसवर आलो. “

बाळासाहेब गायकवाड यांच्या धर्मांतराबाबत श्रीरामपूरला असलेला माझा मोठा भाऊ म्हणजे मार्शल पारखे याची काय भूमिका होती याविषयी मला काहीच माहिती नाही. मार्शल आज हयात नाही. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखला जाणारा मार्शल जॉन पारखे हा १९७०च्या दशकातला अहमदनगर जिल्ह्यातील आणि विशेषतः श्रीरामपूर तालुक्यातला शिवसेनेचा संस्थापक. या धर्मांतराच्या काळात मी पुण्यात इंडियन एक्सप्रेसला बातमीदार होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना मार्शल आपल्या शिवसैनिक मावळ्यांसह तेथे नक्की हजर असणार याविषयी मात्र मला काही शंका नाही.
धर्मांतराच्या कार्यक्रमानंतर आपल्याला काही दगाफटका होण्याच्या भितीमुळे काही महिने गायकवाड अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेर राहिले. नंतर पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांकडे वळाले. त्यातच ६ डिसेम्बर १९९२ला बाबरी मशीद पाडली गेली. गायकवाड लिहितात : “मी पण गुन्हेगार झाली होतो. माझ्यावर सर्वत्र टीका झाली होती. “बाळासाहेब गायकवाडची मुंज झाली का?” “बाळासाहेबांच्या हस्ते आता राममंदिराचं भूमिपूजन करावे! ” माझ्यावर अनेक दलित साहित्यिकांनी टीका केली, लेख लिहिले.’’

गायकवाड यांच्या धर्मांतराची ही घटना लवकरच एक व्यक्तिगत प्रकरण ठरले. त्याचा फार मोठा बाऊ चर्चने व इतरांनाही केला नाही. याचे कारण म्हणजे गायकवाड यांचा कित्ता गिरवायला इतर कुणीही पुढे आले नव्हते. प्रसारमाध्यमांत खूप गाजलेले हे धर्मांतर शेवटी चहाच्या पेल्यातले वादळ ठरले. तीनचार वर्षांतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी गायकवाड यांचा भ्रमनिरास झाला आणि ते दलित चळवळीकडे आणि आंबेडकरवादाकडे वळले. शरणकुमार लिंबाळे, ‘सुगावा प्रकाशन’चे विलास आणि उषाताई वाघ, राजा ढाले यांच्या संपर्कात ते राहिले. सुगावा प्रकाशनाने गायकवाड यांचे ‘ख्रिश्चन दलीत: एक समस्या’ हे पुस्तक १९९६ साली प्रसिद्ध केले. ‘ख्रिश्चनांवरील अत्याचार – ब्राह्मणी षडयंत्र’ हे पुस्तक गायकवाड यांनी स्वतःच २००० साली प्रकाशित केले.

मराठी ख्रिस्ती समाजातील नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सिस वाघमारे यांनी गायकवाड यांना पाठबळ आणि मानसिक आधार दिला. स्वतः वाघमारे यांनीही नाशिक धर्मप्रांताचें बिशप थॉमस भालेराव यांच्या कारभाराविरुद्ध नाशिकमध्ये दीर्घकाळ आंदोलन केले होते. गायकवाड यांनी फ्रान्सिस वाघमारे यांच्या मदतीबद्दल आपल्या लेखनातून कृतज्ञता व्यक्त केली आहे. गायकवाड यांच्या रुपाने मराठी दलित ख्रिस्ती समाजात पहिल्यांदाच चर्चच्या कुबड्या न घेता, चर्चच्या कम्पाउंडबाहेरील एक हुशार, तळमळीचा कार्यकर्ता तयार होत होता. आंबडेकरवादी विचारांची बैठक त्यांनी स्वीकारली होती. मात्र गायकवाड यांचे वयाच्या ऐन उमेदीत निधन झाले. महाराष्ट्रात दलित ख्रिस्ती समाजाला धार्मिक नेते भरपूर मिळाले, मात्र या समाजाच्या दोन शतकांच्या इतिहासात सामाजिक आणि ऱाजकीय नेतृत्व कधी लाभलेच नाही. महाराष्ट्रातील या उपेक्षित समाजघटकात एकही राजा ढाले, नामदेव ढसाळ, हमीद दलवाई, अण्णा डांगे, अब्दुल रेहमान अंतुले, गोपीनाथ मुंडे, नरेंद्र दाभोलकर वा रामदास आठवले अजूनही उदयास आले नाही.

‘’बाळासाहेब गायकवाडांनी धाडस केलं खरं परंतु त्याचं सातत्य त्यांना राखता आलं नाही, याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा पिंड लेखकाचा होता. कार्यकर्ता म्हणून त्यांचा अनुभव शून्य होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत हिंदू धर्मात प्रवेश आणि आरएसएसचा संग त्यांना खूपच महागात पडला. पुरोगामी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षतावादी, कम्युनिस्ट या ताकदी आपसूकच त्यांच्या विरोधात गेल्या. बाळासाहेब गायकवाड ख्रिस्ती समाजाचे नेते म्हणून मान्यता पावले असते. मात्र जनमत तयार करून आतून पाठिंबा मिळविण्याऐवजी ते हिंदुत्ववादी संघटनांचा बाहेरून मिळवत बसले, गायकवाड यांच्या बंडाची ही मर्यादा म्हणता येईल. दलित साहित्याच्या प्रवाहात दलित ख्रिश्चन समाजाच्या आत्मचरित्राची भर टाकणारे लेखक इतकीच काय ती बाळासाहेब गायकवाड यांची दखल घेतली जाईल,’’ असे फ्रान्सिस वाघमारे यांनी म्हटले आहे.