औंध : पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम, वाड्मय मंडळ उद्घाटन समारंभ, ऑनलाईन व्याख्यान, ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धा, ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा, ऑनलाईन नाट्यवाचन स्पर्धा, ऑनलाईन कर्मवीर जीवन दर्शन प्रदर्शन इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे साहेब यांनी सांगितले.
पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. छत्रपती शिवाजी विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे प्रा. अनिल जायभाय हे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अरुण आंधळे साहेब, प्रा.बी.एस. पाटील, प्रा. सुशीलकुमार गुजर, उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर, डॉ. रमेश रणदिवे, डॉ. राजेंद्र रासकर, प्रा. नलिनी पाचर्णे, प्रा.एकनाथ झावरे, डॉ.सुहास निंबाळकर यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
मराठी विभाग आयोजित ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धा आणि ऑनलाईन वाड्मय मंडळ उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख डॉ.प्रभाकर देसाई सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, रयत शिक्षण संस्था अजूनही आपल्या निष्ठा आणि तत्वांपासून ढळलेली नाही. त्यामुळे आजही ती विद्यार्थीकेंद्री भूमिका ठेवून विविध उपक्रम राबविताना दिसते. आजच्या काळात आपण लिब्रर आर्ट शिक्षण पद्धतीचा वापर केल्यास विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास त्याच्या ज्ञानाच्या कक्षा अधिक विस्तारु शकतात. असे मत डॉ. प्रभाकर देसाई यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभागप्रमुख डॉ.संजय नगरकर यांनी केले.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव मा.प्रिं.डॉ.प्रतिभा गायकवाड उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या रयतेचा वटवृक्ष हा कर्मवीरांच्या विचारांवर सुरू आहे. तसेच महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पायावर रयत शिक्षण संस्था उभी आहे. त्यामुळे करोना सारख्या या साथीच्या रोगाच्या काळातही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी रयत शिक्षण संस्था ऑनलाईन पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.
मराठी विभागामार्फत ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष मा.श्री.विकास रानवडे हे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे संयोजन प्रा.मीनाक्षी कापरे, प्रा.अविनाश जाधव यांनी केले.
वाङमय मंडळामार्फत ऑनलाईन नाट्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयातील ८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नाट्यवाचन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे. तसेच कोरोना सारख्या साथीच्या रोगाच्या काळातही विद्यार्थ्यांच्या मनात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्याची ऊर्जा निर्माण व्हावी. अशा हेतूने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालय विविध उपक्रमांचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे परीक्षक म्हणून प्रा.मीनाक्षी कापरे, प्रा.आविनाश जाधव यांनी काम पाहिले. तर कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभागप्रमुख व उपप्राचार्य डॉ.संजय नगरकर, डॉ.अतुल चौरे यांनी केले.
इंग्रजी विभागामार्फत कर्मवीर जीवन दर्शन प्रदर्शन हा ऑनलाईन पद्धतीने उपक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन आय.क्यू.ए.सी. विभागाच्या चेअरमन व इंग्रजी विभागप्रमुख डॉ.सविता पाटील यांनी केले. पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या सप्ताहासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.