मटका व्यावसायिकाचा मुलगा झाला नायब तहसिलदार

ताज्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो कराफेसबुक |ट्वीटर |युट्यूब |


बारामती : कष्ट आणि जिद्द असेल तर यशाला गवसणी घालणे अवघड नसते ही बाब बारामतीच्या विक्रांत कृष्णा जाधव याने सिध्द करुन दाखवली आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत विक्रांतने नायब तहसिलदार होण्याचे स्वप्न साकारले आहे. वडीलांच्या वेगळ्या व्यवसायाची पार्श्वभूमी असतानाही त्याने अत्यंत जिद्दीने अभ्यास करत हे यश साकारले.


विक्रांतचे वडील कृष्णा जाधव हे अनेक वर्षे मटक्याच्या व्यवसायात कार्यरत होते. घरची परिस्थिती प्रतिकूल होती तरी कृष्णा जाधव यांना आपल्या मुलाने सरकारी अधिकारी बनावे अशी मनोमन इच्छा होती. त्याने त्याचे करिअर घडवावे व उच्चपदस्थ अधिकारी बनावे या साठी त्यांनी त्याला सर्वतोपरी सहकार्य केले.


वडीलांसोबतच सर्व कुटुंबिय व मित्रांचीही साथ असल्याने विक्रांतनेही शासकीय अधिकारी बनण्याचे मनावर घेतले व अभ्यासास प्रारंभ केला. दिवसातील अनेक तास अभ्यासावर त्याने लक्ष केंद्रीत केले. कुटुंबाभोवती सातत्याने वेगळे वातावरण असतानाही सर्वच कुटुंबियांनी त्याला अभ्यासासाठी सतत प्रोत्साहित केले. त्याचा प्रवास सुरु झाल्यानंतर 2018 मध्ये भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून विक्रांत सहायक कक्ष अधिकारी म्हणून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. मात्र यावर त्याचे समाधान होत नव्हते.


त्याने अधिक जोमाने अभ्यास सुरु केला. मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी पदावर त्याची नियुक्ती झाल्यावरही त्याने जिद्द सोडलेली नव्हती. मधल्या काळात कृष्णा जाधव यांचे आकस्मिक निधन झाले आणि कुटुंबियावर आघात झाला. मात्र तरिही विक्रांतची जिद्द पाहून कुटुंबियांनी त्याला आधार देत त्याने अधिक उच् पदस्थ अधिकारी पदासाठी परिक्षा देण्यासाठी त्याला प्रोत्साहित केले.


नायब तहसिलदारपदाची परिक्षा देण्यासाठी त्याने तयारी सुरु केली व चिकाटीने अभ्यास करत हे स्वप्नही पूर्ण केले. कुटुंबाची पार्श्वभूमी काहीशी वेगळी असतानाही त्याने अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही आणि मानसिक संतुलनही कायम राखत या पदावर विराजमान होत कष्ट केल्यास काहीही अवघड नाही हे दाखवून दिले.

दरम्यान, वडीलांनाही व्यवसायातून बाहेर पडायचे होते.
आपले वडील कृष्णा जाधव यांना या चुकीच्या व्यवसायातून बाहेर पडायची इच्छा होती. मुले मोठी झाल्यावर मी समाजात सन्मानाने वावरेन, असे ते म्हणत होते. मात्र मुलगा हा नायब तहसिलदार झालेला पाहण्यासाठी ते नाहीत, याचे दुःख कायमच असेल असे विक्रांतने नमूद केले.