यवतमाळ : ग्रामीण तसेच शहरी भागात 0 ते 6 वर्षे वयोगटातील काही बालकांमध्ये जन्मत: दोष तसेच विविध आजार असतात. मात्र ते लवकर लक्षात येत नसल्यामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटतो. अशा बालकांचे त्वरीत रोगनिदान करून त्यांच्यावर जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राच्या माध्यमातून सर्वोत्तम उपचार करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन करतांना मनापासून आनंद होत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले, 0 ते 6 वर्षे वयोगटातील जन्मत: दोष असलेल्या बालकांवर उपचार करून त्यांचा सर्वांगीन विकास करण्याची जबाबदारी येथील डॉक्टरांवर आहे. त्यामुळे हे केंद्र अतिशय महत्त्वाचे असून त्यामुळे बालक व त्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे. अनेक लहान मुलांना वेळेत योग्य उपचाराची आवश्यकता असते. बालकांमध्ये असलेले जन्मत: दोष ओळखून त्यांचे निदान तसेच उपचार केल्याने सुदृढ पिढी निर्माण करता येईल. निरोगी जीवन जगण्यासाठी या केंद्राची भूमिका महत्त्वाची आहे. उत्तम दर्जाच्या सुविधा या केंद्राकडून मिळाल्या पाहिजेत. काही अडचणी किंवा साधनसामुग्रीची कमतरता असल्यास त्या त्वरीत लक्षात आणून द्याव्यात. जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्रासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा पालकमंत्र्यांनी दिली.
जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले, बालकांच्या मानसिक व शारीरिक रोगांचे निदान लवकर होणे आवश्यक आहे. भावनिकरित्या बालकांशी नाते जोडून त्यांच्यावर उपचार करा. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्रासाठी त्वरीत निधी उपलब्ध करून दिला आणि अतिशय कमी वेळात ही इमारत कार्यान्वित झाली, असेही त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, आजाराचे लवकर निदान झाले तर उपचार लवकर व चांगला होतो. डॉक्टरांनी फिल्डवर राहून काम करावे. राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अंतर्गत जिल्ह्यात नक्कीच चांगले काम करू, असे आश्वासन त्यांनी दिले. तर बालकांची शारीरिक उंचीसोबतच भावनिक व बौद्धिक उंची वाढावी. पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागातील भौतिक सुविधा त्वरीत पूर्ण करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.भुजबळ यांनी सांगितले.
तत्पूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत नर्सींग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी पथनाट्य सादर केले. यावेळी पालकमंत्र्यांनी इमारतीतील बालरोग, दंत, श्रवणदोष विभाग, तपासणी व उपचार केंद्र, मानसिक विकास तपासणी उपचार केंद्र, भौतिकोपचार केंद्र आदींची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले. संचालन डॉ. प्राची उजवणे यांनी तर आभार डॉ. सुबोध तिखवे यांनी मानले. कार्यक्रमाला राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या कार्यकारी व्यवस्थापक डॉ. प्रिती गजभिये, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपल्लेवार यांच्यासह जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्रातील संपूर्ण डॉक्टर्स, नर्सींग स्टाफ व इतर कर्मचारी उपस्थित होते.