पिंपरीसाठी तेजस्विनी कदम भाजपकडून इच्छूक

पिंपरीसाठी तेजस्विनी कदम भाजपकडून इच्छूक

पिंपरी, ता.२५ (लोकमराठी) : पिंपरी मतदार संघातून उच्च शिक्षित युवती तेजस्विनी कदम यांनी भाजप कडून उमेदवारी मागितली आहे. यानिमित्ताने भाजपकडून आता आणखी एक फ्रेश चेहरा समोर आला आहे. त्या युवक व महिलांचा राजकारणातील टक्का वाढविण्याचे काम करणार असल्याने त्यासाठीच राजकारणात उडी घेतली. आमदारकीसाठी दावेदारी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरीकरांचा उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसादही तेजस्विनी यांना मिळतो आहे.

पिंपरीतून राष्ट्रवादीसह भाजपकडूनही नवे व तरुण इच्छूक यावेळी अधिक आहे. सर्वच पक्ष भाकरी फिरवतील अशी चिन्हे आहेत. त्यामुळे शहरातील तीनपैकी सर्वात लहान असलेल्या या राखीव मतदारसंघातून लहान वयाचेच सर्वच उमेदवार असतील, अशी दाट शक्यता आहे. भाजपही आपल्या अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट करून नव्यांना संधी देणार आहेत. त्यातूनच नव्या व तरुण चेहऱ्यांनी उमेदवारीसाठी पिंपरीत भाजपकडे गर्दी केली आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या इच्छूकांच्या मुलाखतीसाठी नाव दिले असून त्यासाठी जाणार असल्याचेही तेजस्विनी यांनी सांगितले. महिलांचे प्रश्न सोडविण्याकरिता आणि युवकांनी

राजकारणात यावे म्हणून मी उमेदवारी मागितली असून त्यासाठीच काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही तेजस्विनी यांनी राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. पक्षाच्या कामगार संघटनेच्या महिला विभागाच्या त्या कार्याध्यक्षा आहेत. पिंपरी-चिंचवड शहर युवती आघाडीप्रमुख म्हणूनही त्या जबाबदारी सांभाळीत आहेत. चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या शिफारशीमुळे चित्रपट महामंडळावर सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली आहे.

महाविद्यालयीन पातळीवर संघटन करण्याचे काम त्यांचे सध्या जोरात आहे. त्याजोडीने सदस्यनोंदणी अभियान, पदवीधर मतदार नोंदणी, बूथ यंत्रणा सक्षमीकरणात त्या व त्यांची युवती आघाडी आघाडीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाच्या धडाक्यामुळे प्रेरित होऊन राजकारणात आल्याचे तेजस्विनी यांनी सांगितले. कामाचा उत्साह आणि उरक या बळावर त्यांनी अल्पावधीतच मोठी झेप घेतली. समाजकार्याची नुसती आवडच त्यांना नसून त्याचा उरकही तेवढाच मोठा आहे. कामाची उत्साह आणि उमेद आहे. त्याचा धडाका मोठा आहे. त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख तयार झाली आहे.