विज्ञाननिष्ठ विचारांनी मेंदूची मशागत करा

विज्ञाननिष्ठ विचारांनी मेंदूची मशागत करा

जेट जगदीश

आपल्यातील अनेक जण विवेकी असतात. त्यांना श्रध्दा, विश्वास, देव, धर्म, रूढी-परंपरा, सण-उत्सवी उन्माद जया सर्व गोष्टींपैकी बहुतेक गोष्टी अजिबात पटत नसतात. संस्कृतीचा भाग म्हणून, कुटुंबियांच्या भावना दुखवू नयेत म्हणून आपण अनेकदा प्रवाहपतितांसारखे काही गोष्टी पाळतो.

देव-धर्म पाळण्यातले, पूजा-अर्चा करण्यातले फोलपण समजूनही सामाजिक बंधने म्हणून आपल्यापैकी अनेकजण मनातल्या मनात चडफडत या गोष्टी करीत असतात. यात एक भीतीही असते… बाजूला पडण्याची, एकटे पडण्याची. पण धैर्य दाखवून असे सर्व लोक एकत्र आले, स्पष्ट बोलू लागले तर जगभरातल्या नास्तिकांची संख्या धर्मानुयायांपेक्षा कदाचित जास्तच भरेल. पण ही सारी सायलेन्ट मेजॉरिटी आहे, म्हणून ती मायनॉरिटी वाटते.

‘बाबावाक्यम् प्रमाणम्’ ही शब्दप्रमाण्यवादी वृत्ती आपल्या संस्कृतीच्या नसानसांत भिनली असावी असं आपले उत्सवी गोंधळ पाहून तरी वाटतं. आधुनिक भौतिक प्रगतीला आध्यात्मिक विचारांपेक्षा हीन ठरवून या देशात त्याच भौतिक प्रगतीचा आधार घेतघेत त्यामागील विज्ञानाला पराभूत करण्याचे धंदे चालतात. कितीही उच्च प्रतीच्या अध्यात्मातून, ईश्वराच्या शोधातून, भक्तीतून, तीर्थयात्रा-वाऱ्यांतून, हिमालयातील जपतपांतून आज आपण वापरतो त्यातील साध्यातले साधे अवजारही तयार झाले असते का हा साधा प्रश्नही आपल्याला पडत नाही.

कुठल्याही देवाला अनवाणी जाऊन ना कुणाचा आजार बरा होतो ना कसलं यश येतं… पण तरीही असल्याच गोष्टींनी आधुनिक तंत्रज्ञानावर स्वार होऊन आपण आपला बिस्तरा पसरत नेला आहे. कारण तर्कशुध्द विचार करण्याचं वळण न लावणाऱ्या आपल्या शिक्षणपध्दतीतून बहुतांशी जे बौद्धिक विकलांग निघत रहातात त्यांना चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची हिंमतच होत नाही.

या जगात अनेक देशांतून तसेच आपल्याच देशाच्या विज्ञानसंस्थांतूनही जग अंतर्बाह्य बदलून टाकणाऱ्या विषयांवरचे नवनवीन शोध लागत असताना, नवे शोध लागण्याची गती अनेकपटींनी वाढलेली असताना आपल्या भोवती जो देवधर्मोद्भव होऊन अपरंपार वैचारिक गोंधळ माजलेला दिसतो त्याबाबत आपण काय करणार आहोत? की शतकानुशतकांच्या परंपरा आहेत या… कशा बदलणार…? जाऊं द्या म्हणून गप्प बसणार आहोत?

भ्रामक कल्पनांना मोडीत काढण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलनच नव्हे तर श्रध्दा निर्मूलनाची गरज आहे. कारण श्रद्धेवर आधारित असलेला, पण पुराव्यावर आधारित नसलेला कोणताही दावा-अर्थात श्रध्दा म्हणजे अंधश्रध्दाच असते. हे मत मान्य असलेल्या सर्वांनी केवळ लिहिण्यापुरतेच मर्यादित न रहाता आपण हे विषय हाती घेऊन तरूण मुलामुलींपर्यंत पोहोचले पाहिजे. मराठी भाषक मुलेमुली इंग्रजीतले विचार वाचायला अजूनही बिचकतात. भाषेमुळे ज्ञानही परके होते. म्हणून आपले विचार आपल्या भाषेतून तसेच ज्यांना कोणतीही परकी भाषा येत असेल त्यांनी या साऱ्यांचे विचार आपल्या भाषेतून लिहायचे… मांडायचे… आणि पोहोचवायचे. अशाप्रकारे मेंदूची विवेकी आणि विज्ञाननिष्ठ विचारांची मशागत करत राहिल्यास कालांतराने पुढच्या पिढीत निश्चितच बदल घडेल.