काँग्रेसच्या नेत्याचा कार्यक्रमातच हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू

प्रयागराज (वृत्तसंस्था) : धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाच काँग्रेसच्या नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निधन झालेल्या काँग्रेसच्या नेत्याचं नाव एहतेशाम रिझवी असं होतं.

एहतेशाम रिझवी हे उत्तरप्रदेशातील काँग्रेस नेते होते. एका धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यादरम्यान, त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि ते जमिनीवर कोसळले. कार्यक्रमादरम्यान एहतेशाम रिझवी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते तेथेच जमिनीवर कोसळले.

या घटनेमुळे उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला. यानंतर रिझवींना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ही सर्व घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एहतेशाम रिझवी हे 65 वर्षांचे होते.