Coronavirus: पुण्यात दिवसभरात करोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू; ३६ नवे रुग्ण आढळले

Coronavirus: पुण्यात दिवसभरात करोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू; ३६ नवे रुग्ण आढळले

पुणे (लोकमराठी) : पुणे शहर आणि जिल्ह्यात करोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ३६ नवे रुग्ण आढळले त्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या २४५ वर गेली आहे. दरम्यान, आज (शुक्रवार) २ रुग्णांचा उपचारावेळी मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यात मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. वाढत्या मृतांची संख्या लक्षात घेता, पुणेकरांच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉक्टरांची विशेष पथके नेमण्यात आली आहेत. त्यानुसार अनेक भागात नागरिकांकडून माहिती घेणे आणि तपासणी केली जात आहे. दरम्यान, शहरात २०७, पिंपरी-चिंचवडमध्ये २६ आणि ग्रामीण भागात १२ असे एकूण २४५ बाधित रुग्ण आढळले आहेत. आज दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे.

दरम्यान, शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना करोनाची लागण झाली होती. त्या सर्वांचा १४ दिवसांचा आयसोलेशनचा काळ संपल्यानंतर त्यांची दोनदा चाचणी करण्यात आली, यामध्ये त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे या कुटुंबाला आज घरी सोडण्यात आलं. यामुळे आज अखेर एकूण २३ जण करोनामुक्त झाले आहेत, ही एक समाधानाची बाब आहे.