समाजामध्ये परिवर्तन करणाऱ्या चळवळींचे प्रेरणास्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. प्रकाश पवार

समाजामध्ये परिवर्तन करणाऱ्या चळवळींचे प्रेरणास्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर - प्रा. प्रकाश पवार

औंध-पुणे (लोकमराठी) : रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुण, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रकाश पवार म्हणाले की, “समाजामध्ये परिवर्तन करणाऱ्या चळवळींचे प्रेरणास्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असून, समाजपरिवर्तनाची प्रेरणा आणि ऊर्जा घेण्यासाठी अनेक माणसे चैत्यभूमीला भेट देतात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त त्यांचे विचार समजून घेऊन आत्मसात करायला हवेत. महात्मा जोतीराव फुले म्हणायचे जशी शेतीला पाण्याची गरज असते. तशीच माणसाला शिक्षणाची गरज असते. तरच त्याचा विकास होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व विद्याशाखांचा अभ्यास करून, ज्ञान ग्रहण केले. आपल्याला मिळालेल्या ज्ञानाने समाजपरिवर्तन केले. ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा’. असा मूलमंत्र त्यांनी समाजाला दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार, घटनाकार, संसदीय नेते, सोशल सायन्सचे अभ्यासक होते. त्यांनी इ.स.१९२० ते १९५६ या कालावधीमध्ये समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी मोठा लढा दिला.” असे मत व्यक्त केले.

पुणे महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक वसंतराव जुनवणे बोलताना म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या हिताच्या दृष्टीने ‘कामगार कायदा’ आणला. तसेच महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिला. चवदार तळ्या सारखा मोठा सत्याग्रह केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक दूरदृष्टीचे समाजसुधारक होते. देशाच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच महापुरुष समजून घेतले पाहिजेत.” असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स.१९२७ रोजी मनुस्मृती नावाचा ग्रंथ सामूहिकपणे जाळून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला. ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा’. या संदेशाबरोबरच वेदना, विद्रोह, नकार, मानवता आणि वैज्ञानिक दृष्टीकोण अशी पाच मुल्ये समाजाला दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळे आणि शिक्षणामुळे गावकुसाबाहेरील समाजाला आत्मभान आल्यामुळे तो इथल्या समाजव्यवस्थेला प्रश्न विचारू लागला. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नसल्याची वेदना व्यक्त करू लागला. माणूस म्हणून जगण्याचे मूल्य मिळावे म्हणून विद्रोह करु लागला. पशूपेक्षाही हीन वागणूक देणाऱ्या व्यवस्थेला नकार देऊ लागला. माणूस म्हणून जगण्यासाठी जे मूल्य लागते तो मानवतावाद मिळावा. आणि जीवन जगताना सद सद विवेकबुद्धी मिळावी, म्हणून इथल्या समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला. विद्यार्थ्यांनी जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने महापुरुषांचे चरित्र वाचून त्यांचे विचार आत्मसात करावेत.” असे मत प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी व्यक्त केले.

समाजामध्ये परिवर्तन करणाऱ्या चळवळींचे प्रेरणास्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर - प्रा. प्रकाश पवार

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. रमेश रणदिवे यांनी तर आभार प्रा. भक्ती पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर, प्रा. भीमराव पाटील, डॉ. सविता पाटील, डॉ. राजेंद्र रासकर, डॉ. तानाजी हातेकर, डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.