औंध : येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेतील विधी विभागाच्या कायदेशीर सल्लागार मा. अँड. मंजुषा इधाटे मॅडम उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या महिलांना रोजच्या दिवशी सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे. महिलांनी स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये स्वयंप्रेरणेने नावलौकिक मिळवावा. आईने केलेल्या संस्कारांवर मुलांच्या विकासाचा व विचारांचा पाया रचला जातो. शिक्षणामुळे महिलांना आर्थिक अधिकार व स्वातंत्र्य मिळाले आहे. समाजाने स्त्रियांना सन्मानपूर्वक वागणूक द्यायला पाहिजे. महिलांनी समाजाप्रती बांधिलकीची भावना जोपासत सामाजिक कार्य करावे. असे आवाहन मा. अँड. मंजुषा इधाटे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब म्हणाले की, महाविद्यालय हे सर्व विद्यार्थ्यांसाठी एक खुले व्यासपीठच आहे. त्या व्यासपीठाचा लाभ घेऊन, सर्व विद्यार्थ्यांनी स्व-विकास करून घ्यावा. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांची निवड करून स्वतःचा व महाविद्यालयाचा नाव लौकिक वाढवावा. प्रत्येक विद्यार्थ्यांनी नाविन्याचा स्वीकार करत प्रत्येक क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवावे. असे मत प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब यांनी व्यक्त केले..
कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील कु.दिव्या जोशी लिखित व ऋषिकेश कानवडे दिग्दर्शित कारभारी प्रॉडक्शन निर्मित ‘चारित्र्य’या लघुपटाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘देशविदेशातील विविध क्षेत्रातील स्रीकर्तुत्वाचे योगदान’ या विषयावरील सहा ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी ‘ऑस्करवाडी’ या वेब सिरीजचे निर्माते अक्षय कटके, अवधूत कुलकर्णी, अभिनेता अक्षय कोथंबिरे, लेखक कल्पेश जगताप, ओंजळ फिल्मचे काकासाहेब शिंदे, अभिनेता ओंकार भोईर यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख डॉ. संजय नगरकर यांनी तर कार्यक्रमाचे आभार विद्यार्थिनी विकास मंचच्या चेअरमन प्रा. नलिनी पाचर्णे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सायली गोसावी यांनी केले. यावेळी व्यासपीठावर इंग्रजी विभागप्रमुख डॉ.सविता पाटील, डॉ. रमेश रणदिवे, प्रा. बी. एस. पाटील उपस्थित होते. तसेच बहुसंख्येने प्राध्यापक आणि विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.