सामाजिक, वैचारिक दृष्टी बदलल्यावर शिक्षकदिन तमाम शिक्षकांसाठी खरा शिक्षक दिन ठरेल

सामाजिक, वैचारिक दृष्टी बदलल्यावर शिक्षकदिन तमाम शिक्षकांसाठी खरा शिक्षक दिन ठरेल

डॉ. मोहिते के. बी.

जीवनातील सर्वात पहिले गुरु म्हणजेच आई वडील. जीवनात आई-वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही कारण, त्यांनी आपल्याला या सुंदर जगात आणले. आई-वडिलांनंतर शिक्षकाकडून बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. शिक्षकांना दुसरे पालक म्हटले जाते. चांगले व्यक्तिमत्व घडवणे, चांगले संस्कार करणे, शिस्तीत राहणे, योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. शिक्षक एकाच बागेत विभिन्न रूप, विविध रंगाचे फुल सजवणाऱ्या माळयाप्रमाणे असतो. विद्यार्थ्यांना काट्यावर हसत चालण्यासाठी प्रेरित करतात. आजही मला शिकवणारे प्राथमिक शिक्षक आठवतात. ज्यांनी मला घडवलं, जीवनाला दिशा दिली, आपली जडणघडण करण्यात सर्वप्रथम प्राथमिक गुरूंचा वाटा खूप मोठा आहे. प्राथमिक शिक्षक ते पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षक आज देखील आठवतात. मनाला भावनिक स्पर्श करून जातात.

शिक्षक म्हणजे विशाल वृक्ष सारखे व्यक्तिमत्व. बेदरकारपणे ज्ञानाची पाने फांदीतून सळसळत असतात. त्यांच्याच छायेखाली सौख्य लाभते. अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या अस्फुट चित्रकाराला किंवा त्याच्याच रेषेखाली अंधातरी लटकलेली असतात. कित्येक भावनांच्या डोहात भिजून नतमस्तक झालेली इवालाल्या चेहऱ्याची निरागस अक्षरे असतात. अंधार भरलेल्या चिमुकल्या गोळ्यातून सूर्याचे तेज बाहेर काढणारा तो समाजसुधारक, क्रांतिकारक असतो.

शिक्षकाला समर्थ तत्वज्ञान जपावी लागतात. कुतूहलाच्या झाडाची पाने जिवापाड आणि आकार द्यावा लागतो. मुक्तपणे बागडणार्‍या निराकार चैतन्याला ती स्वतःला विसरून बागडावं ही लागतं. कधी अंधारही प्यावा लागतो बेभानपणे. तेव्हा कुठे चमकतात, उजेडाची किरणं. उद्दिष्टेच्या वाटेवर त्याच्या सोबतील असतेच की खडूची धारदार तलवार आणि फळ्याची ढाल असते पाठीशी.

पहिला विद्यार्थी व शिक्षक यांचं नातं वेगळं होतं. मनाला भावणार होतं. आजचा विद्यार्थी तसा राहिला नाही. कालच्या विद्यार्थ्यांमध्ये जेवढे वैविध्य होते, तेवढेच वैविध्य आजच्या विद्यार्थ्यातही नाही. आजचा विद्यार्थी तंत्रज्ञानाद्वारे माहिती संपन्न झाला आहे .आजचे विद्यार्थी टेक्नोसेवी आहेत. गुगल वरून ‘रेफरन्सेस’ चटकन शोधतात. पूर्वी काही माहिती मिळवायची असेल तर लायब्ररीत जावं लागायचं. पुस्तकं शोधावी लागायची. आता हीच माहिती ‘गुगल’वर लगेच मिळत असल्याने विद्यार्थ्यांना शिकवताना निव्वळ माहिती देऊन चालत नाही. माहितीच्या पलीकडे जाऊन शिकवण्याची खरी गरज आहे. त्यामुळे शिक्षकासमोरील आव्हान वाढले आहे

पुण्यात लहानाचे मोठे झालेल्यांनाही प्रसिद्ध ठिकाण माहित नाहीत. एका विद्यार्थ्यांनी साहित्य परिषदेचे कार्यालय कुठे आहे? असा प्रश्न मला विचारला ! सांगा काय करायचं. काळ बदलला. तंत्रज्ञान हाताशी आले, तरी परिस्थितीत फार बदल झाला नाही. त्यामुळे या तंत्रयुगातही विद्यार्थ्यांना अगदी मुळापासून शिकवावं लागतं. विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, घरातील वातावरण आणि बुद्धिमत्ता आदि घटक विद्यार्थ्यांना घडवत असतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे. अतिशय स्मार्ट आहे. आजच्या विद्यार्थ्याला काहीही येत नाही. अशी विधाने देखील करता येत नाहीत.

समुद्रातून नौका सफर करण्यावरही तहानेने व्याकुळ होण्याची वेळ कधी कधी येते. तसाच प्रकार माहितीच्या बाबतीत होऊ शकतो. माहितीचा खजिना एका क्लिकवर उपलब्ध झाल्याने माहिती मिळवण्याबाबतची भूक आता कमी झाली आहे. आळस वाढला आहे. आजच्या सोशल मीडियामुळे काहीसे उथळ ज्ञान प्राप्त होत आहे. उथळ पाण्याला जसा खळखळाट फार असतो, तसा उथळ अर्धवट ज्ञानाचेही असते.

या विद्यार्थ्यांना ज्ञानाची कक्षा रुंदावण्याची जबाबदारी शिक्षकावर आहे. उथळ ज्ञानातून झालेले आकलन दूर करून विषय सुस्पष्ट करण्याची जबाबदारी शिक्षकाची आहे. पारंपारिक शिक्षणाच्या चौकटी बाहेर जाऊन हे संस्कार करावे लागणार आहेत. अन्यथा अर्धवट माहिती आणि ज्ञानाच्या आधारे दिशाभूल झालेल्या तरुणाची मोठी फौज तयार होण्याचा धोका आहे.

माहिती आणि ज्ञान यातील फरक उलगडून दाखवून विद्यार्थ्यांना ज्ञान संपन्न करण्याचे आव्हान आजच्या शिक्षकांसमोर आहे. पहिला विद्यार्थी नाकासमोर चालायचा. आता छातीठोकपणे चालतो. शिक्षकाबद्दलची आदर युक्त भीती कमी झाली आहे. आता विद्यार्थ्याला शिस्त लावताना शिक्षकाची दमछाक होते. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, यासाठी शाळेत शिक्षक छडी वापरत होते. त्या छडीच्या धाकाने विद्यार्थ्याला शिस्त लागे. अभ्यास करीत. त्यामुळेच कदाचित छडी लागे छम छम……. अशी म्हण प्रचलित होती. राष्ट्रीय शिक्षण आयोगाच्या आदेशानुसार शाळेतून छडी हद्दपार झाली. यांचे चांगले, वाईट परिणाम सध्या दिसत आहेत.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमामुळे विद्यार्थी सहजरित्या पुढच्या वर्गात जाऊ लागल्याने गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न केले, तरीही त्याला पालकाकडून पाठिंबा मिळत नाही. पालकांनी अपेक्षाचे ओझे मुलावर लादल्याचे चित्र घराघरात पाहायला मिळत आहे. आपल्या मुलाने सर्वाधिक गुण मिळावेत, अशी पालकांची इच्छा असते. परंतु, त्यासाठी शिक्षकांनी मुलांना शिक्षा करायची नाही असेही पालकांना वाटते. पहिले पालकच शाळेत येऊन माझ्या मुलाला शिक्षा करा आणि त्याच्यात सुधारणा करा, असे सांगायचे. मात्र, आता हे चित्र राहिले नाही. आज विद्यार्थ्याला घडवताना शिक्षकाला आणि पालकांनाही कसरत करावी लागत आहे.

राष्ट्रीय शिक्षण बाल हक्क कायद्यानुसार वर्गात मुलांना रागवायचं नाही. छडी मारायची नाही .शारीरिक, मानसिक, शाब्दिक अशा सर्व प्रकारच्या शिक्षेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना अनावश्यक कठोर शिक्षा केल्याने विद्यार्थ्यांचे स्वास्थ बिघडणे, अपमानस्पद बोलल्याने शाळा सोडणे, शाळेत बेंचवर उभे केल्याने आत्महत्याचा प्रयत्न करणे, असे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे शिक्षकांनी मुलांना शिक्षा करणे सोडून दिले. विद्यार्थी बिनधास्त झाला. शिक्षकांचा जो पूर्वी आदर असायचा तो आजच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत नाही.

आज शिक्षकांना पूर्ण वेळ काम करावे लागते. मात्र, तुटपुंजे मानधनावर. मानधन मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. आजचा शिक्षक कंत्राटी म्हणून काम स्वीकारत आहे. अधिकाऱ्यांनी शिक्षकाच्या मानसिक स्थितीचा विचार करावा. आज शिक्षकांना अल्पशा मानधनावर अतिरिक्त कामे पूर्ण करावे लागतात. हे कोणत्या वयापर्यंत चालणार आहे. त्याची शासनाने रूपरेषा ठरवली नाही. सामाजिक, वैचारिक दृष्टी बदलल्यावर आणि सर्व आव्हाने संपुष्टात आल्यानंतर शिक्षकदीन न राहता तो तमाम शिक्षकांसाठी खरा शिक्षक दिन ठरेल.