मानवी जीवाची हानी करणाऱ्या परराज्यातून येणाऱ्या औषधांवर नियंत्रण ठेवावे – विवेक तापकीर

मानवी जीवाची हानी करणाऱ्या परराज्यातून येणाऱ्या औषधांवर नियंत्रण ठेवावे - विवेक तापकीर

पिंपरी : ॲानलाईन औषध विक्रीला कोणतीही परवानगी नसताना आज मोठ्या प्रमाणावर ॲानलाईन औषध विक्री होत आहे. त्यामुळे मानवी जीवाला धोका निर्माण झाला आहे. मानवी जीवाची हानी करणाऱ्या परराज्यातून येणाऱ्या अशा औषधांवर नियंत्रण ठेवावे. अशी मागणी केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष व काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक तापकीर (Vivek Tapkir) यांनी केली आहे.

याबाबत तापकीर यांनी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अन्न व औषध प्रशासनाने बाहेरील राज्यातून येणाऱ्या औषधांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यामुळे अनेक गैरप्रकाराला आळा घालता येईल. ॲानलाईन औषधविक्रीला कोणताही परवानगी नसतानाही ही विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परराज्यातून येणारी औषधे कोणत्या प्रकारची आहेत. याबद्दल आपणांस काही कल्पना नसते, ती योग्य आहेत की अयोग्य, गुणवत्ता, मूळ आहेत की नक्कल, गर्भपाताची औषधे, नशेचे औषधे, झोपेच्या गोळ्या या सर्व थेट रूग्णांच्या हातात पडतात, ते ही मोठ्या सवलतीच्या दरामध्ये.

विविध प्रलोभने दाखवून रूग्ण बळी पाडतात. तिथे फार्मासिस्ट उपस्थित आहे की नाही हा विषय गौनच? याविरूद्ध स्थानिक औषधविक्रेता हा फार्मासिस्टच्या उपस्थितीमध्ये सर्व नियंमांचे पालन करून औषध विक्री करीत असतो. बाजारांमध्ये परराज्यातून येणारी अनेक औषधे हि बनावटीची असू शकतात. डिजिटल इंडीयामध्ये अनाधिकृत ॲानलाईन औषधविक्री सोईस्कररित्या रूग्णास कधी ॲाफलाईन करेल हे सांगता येत नाही. अन्न व औषध प्रशासनाने योग्य ते लक्ष घालून परराज्यातून येणाऱ्या औषधांवर नियंत्रण ठेवून होणारी हानी टाळावी. असे तापकीर यांनी निवेदनात नमुद केले आहे.