पिंपरी : महाराष्ट्र प्रेस क्लबच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय पत्रकार दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेतील पत्रकार कक्षात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, स्व. भा. वि. कांबळे यांना महाराष्ट्र प्रेस क्लबचे अध्यक्ष अमोल शित्रे, जेष्ठ पत्रकार नाना कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ‘लोकशक्ती न्युज’चे विकास शिंदे, ‘लोकमान्य टाईम्स’चे संजय शिंदे, ‘पीसी लाईव्ह’चे संदेश पुजारी, ‘डेली महाराष्ट्र न्यूज’चे प्रदीप लोखंडे, पुढारीचे विजय जगदाळे, ‘रोखठोक न्युज’चे गणेश हुंबे, ‘निर्भीड सत्ता’चे प्रशांत साळुंखे, ‘न्यूज15’चे गणेश मोरे, ‘लोकमराठी’चे रवींद्र जगधने, ‘वृत्तशक्ती’चे जितेंद्र गवळी आदीसह ‘महाराष्ट्र प्रेस क्लब’चे सदस्य, पत्रकार बांधव उपस्थित होते.
जेष्ठ पत्रकार नाना कांबळे म्हणाले की, “जगाचा विकास वेगाने होत आहे. प्रत्येक नवीन क्रांती वेळी महामारी येत असते. त्यानंतर जगात सर्वच गोष्टीत मोठे बदल होतात. काळानुरूप नवीन गोष्टी येत आहेत. तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्याचा विचार होणे गरजेचे आहे. पत्रकारिता बदलत आहे. पत्रकारितेतील हे बदल स्वीकारणे काळाची गरज आहे.”
क्लबचे अध्यक्ष अमोल शित्रे म्हणाले की, “पत्रकारांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. आजच्या दिवसापासून तसा संकल्प करून कामाला सुरुवात करू. पत्रकारितेच्या माध्यमातून एकजुटीने सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडणे गरजेचे आहे. आपल्या लेखणीतून न्याय देण्याचा प्रयत्न करूयात.”
या निमित्त घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास शिंदे यांनी केले. प्रदीप लोखंडे यांनी आभार मानले.