न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये माता रमाबाई आंबेडकर व लता मंगेशकर यांना अभिवादन

न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये माता रमाबाई आंबेडकर व लता मंगेशकर यांना अभिवादन

रहाटणी : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रमाबाई आंबेडकर जयंती व लता मंगेशकर यांना श्रद्धांजली सोशल डिस्टंसिन्ग पाळून साजरी करण्यात आली. रमाबाई यांच्या व लता मंगेशकर यांच्या प्रतिमेस पुरुषोत्तम गाणार, बाळासाहेब शेंडगे, संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेच्या मुख्याध्यापिका आसावरी घोडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, उपस्थित होते.

“करुणेचा महासागर, मातृत्वाचे महाकाव्य महासूर्याची सावली, कोटयावधींची माऊली, बाबासाहेबांची ऊर्जायनी, रामू, रमा, रमाई रंजल्या-गांजल्यांची दीन-दलितांची आई मातारमाई ह्यांनी अनेक हाल अपेष्टा, उपासमार सहन करून, कोणत्याही भौतिक सुखाचा हव्यास न धरता त्या अशिक्षित मातेने बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेले. बाबासाहेबांची समाजाप्रती तळमळ पाहुन त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या राहिल्या, हि जाणीव प्रत्येकामध्ये असली पाहिजे तसेच मातोश्री रमाबाईची सहनशीलता, सोज्वळता त्यागी व वात्सल्यवृत्ती, कष्ट, कामसू निर्मळपणा, स्वाभिमानी इ. गुणांचा आदर करून हे गुण आपल्या अंगी बाळगले पाहिजेत. त्याचप्रमाणे कठीण परीस्थितीवर मात करून कसे जीवन जगावे आणि फक्त जीवन जगणे नाही तर ते आनंदाने व समाधानाने कसे जगावे हा आर्दश घेतला पाहिजे.” असे अरुण चाबुकस्वार ह्यांनी म्हटले.

लता मंगेशकर यांच्या निधनाने महाराष्ट्राचीच नव्हे, तर भारत आणि जगाची पोकळी कधीही भरून न येणारी आहे, केवळ स्वर नाही तर भारतीय संगीताचा लतादीदी आत्मा होत्या. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यातून निघून गेले आहे, याची कल्पनाही करू शकत नाही. लतादीदींची प्रतिमा आणि आवाज प्रत्येक भारतीयांच्या हृदयात कायम कोरला जाईल. आज आपण एक दिग्गज व्यक्ती गमावली आहे. लता मंगेशकर जी चे संगीत, व्यक्तिमत्व ,नम्रता पिढ्यानपिढ्या आपल्या सर्वांच्या सोबत राहील. असे पुरुषोत्तम गाणार यांनी उद्गार काढले.

सचिन कळसाईत यांनी सूत्रसंचालन केले. त्याच बरोबर शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले व आनंदा साळवी यांनी आभार मानले.