भारत-जपानचे संबंध वृद्धींगत होतील : रेमया किकुची


भारत-जपानचे संबंध वृद्धींगत होतील : रेमया किकुची

एस.बी.पाटील पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताकदिनानिमित्त एक्सप्लोरेषण डे

पिंपरी : भारत आणि जपानचे मैत्रीपूर्ण संबंध आगामी काळात आणखी वृद्धींगत होतील. पुणे-पिंपरी चिंचवडसह देशातील मेट्रो सिटींमध्ये उभारल्या जाणा-या मेट्रो प्रकल्पांना जपानचे सहाय्य आहे. भविष्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान सिंझो अबे यांच्या मार्गदर्शनाखाली जपानची राजधानी टोकियो आणि भारताची राजधानी दिल्ली तसेच जपानमधील प्रमुख शहरे व भारतातील प्रमुख शहरांमध्ये थेट वेगवान हवाई वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. याचा उपयोग भारतात उद्योग व्यवसाय व शैक्षणिक क्षेत्रासाठी होईल, असे मार्गदर्शन जपान येथील लर्निंग सिस्टिमचे मुख्य महाव्यवस्थापक रेमया किकुची यांनी रावेत येथे केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस.बी.पाटील पब्लिक स्कूलमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनानिमित्त एक्सप्लोरेषण डे (ब्रिटीश कौन्सिल-आयएसए) निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.


यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, मुख्याध्यपिका बिंदू सैनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी यावेळी ब्रिटीश कौन्सिलच्या शैक्षणिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत भारत, जर्मनी, फ्रान्स, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या देशातील शेती, पाणी, ऑटोमोबाईल, शिक्षण, संस्कृती, कला, घनकचरा, ई-कचरा व्यवस्थापन, पर्यावरण, वाहतूक व्यवस्थापन या विषयावर प्रकल्प सादरीकरण केले. याविषयी बोलताना किकूची म्हणाले की, अशा प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांना संबंधित विषयांबाबत अवांतर ज्ञान मिळते. त्यामुळे त्यांचा बौद्धीक ज्ञानाबरोबरच सामाजिक विकासही होतो. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ई-वेस्ट या विषयावर पोवाडा सादर केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांची त्यांनी प्रशंसा केली.