प्रेरणादायी|पुढचा स्टॉप IAS! बस कंडक्टरने पास केली UPSC परीक्षा

प्रेरणादायी|पुढचा स्टॉप IAS! बस कंडक्टरने पास केली UPSC परीक्षा

बंगळुरू (लोकमराठी ) : केल्यानं होत आहे रे आधी केलेची पाहिजे, असं आपण अनेकदा ऐकलं आहे. पण, एका बस कंडक्टरने आपल्या कृतीतून हे दाखवून दिलंय. मधु एनसी या बस कंटक्टरचा प्रवास नक्कीच सोपा नाही. मात्र, ध्येय्याने पछाडलेली माणसं हार मानत नाहीत, याच उत्तम उदारण म्हणजे बस कंडक्टर मधु होय. बीएमटीसीच्या बसमध्ये मधु कंडक्टर म्हणून कार्यरत आहे. तरीही, अधिकारी होण्याचं त्याचं स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नाही. आपलं उद्दिष्ठ ठिकाण म्हणजे IAS गाठण्यासाठी त्याचा केवळ एक स्टॉपचा प्रवास उरला आहे.

बंगळुरू मेट्रोपोलिटीन ट्रान्सपोर्ट सेवेत कंडक्टर असलेल्या मधुने युपीएससी परीक्षा पास केलीय.नुकतेच मधुने युपीएससीची मुख्य परिक्षा (मेन एक्झाम) पास केली असून आता आपलं ध्येय गाठण्यासाठी एकच स्टॉप बाकी आहे. म्हणून नेक्स स्टॉप आयएएस.. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. युपीएससी परीक्षेसाठी 25 मार्च रोजी मधुची मुलाखत चाचणी घेण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात लागलेल्या युपीएससी परीक्षेच्या निकालपत्रात जेव्हा मधुने स्वत:चा रोल नंबर पाहिला, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मधुचा आनंद गगनात मावेनासा झाला. 29 वर्षीय मधु हा बीएमटीएसमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करत आहे.

कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा असल्याने त्याच्यावर घरची जबाबदारी आहे. गेल्या वर्षीच्या जुन महिन्यात मधुने युपीएससीची पूर्व परीक्षा पास केली होती. या परीक्षेचा निकाल ऑक्टोबर महिन्यात लागला, त्यानंतर मधुने मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली. राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय विषय, मुल्य, भाषा, सामान्य ज्ञान, गणित आणि निबंध लेखन या विषयांचा अभ्यास करत आहे. आपल्या दैनंदिन कामातून दररोज 5 तास तो युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी देत. त्याने पूर्व परीक्षा आपल्या मातृभाषेतून म्हणजेच कन्नडमधून तर मुख्य परीक्षा इंग्रजीतून दिली.

कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील मालावली या लहानशा खेड्यातील मधुने आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले ते आता पूर्णत्वास उतरत आहे. वयाच्या 19 व्या बस कंडक्टर बनून मधुने आपल्या परिस्थितीशी दोनहात करायला सुरुवात केली. दूरस्थ शिक्षण प्रणालीतून त्याने आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मधु हा राज्यशास्त्र विषयाची पदवीधर आहे.

माझ्या घरातून सर्वाधिक शिक्षण घेतलेला मीच आहे, मी कुठली परीक्षा पास केली, याबद्दल माझ्या आई-वडिलांना काहीच माहिती नाही. पण, मी कुठलीतरी परीक्षा पास केलीय, याचा त्यांना अत्यानंद झालाय. सी शिखा या बंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट सर्व्हीसचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक (सनदी अधिकारी) आहेत. आता, मुलाखत पास होऊन मला सी शिखा या माझ्या बॉससारखं अधिकारी व्हायचंय, असे मधुने परीक्षा पास केलेला रोल नंबर दाखवताना सांगितले.

सध्या, प्रत्येक आठवड्यात शिखा आपल्या व्यस्त वेळेतून मधुला दोन तास देतात. या दोन तासात मुलाखतीची कशी तयारी करायची याचं मार्गदर्शन करतात. मॅडम शिखा खूप चांगल्या पद्धितीने मला मार्गदर्शन करत असल्याचंही मधुने सांगितलं. मधुचा बस कंडक्टर ते IAS अधिकारी हा प्रवास आता पूर्णत्वाच्या दिशेने आहे. आता, केवळ थोडाच अवधी असून पुढचा स्टॉप IAS असणार आहे. मधुची जिद्द, चिकाटी अन् परीश्रमाची तयारी देशातील लाखो तरुणांसाठी प्रेरणा देणार आहे. त्यामुळे, मधुप्रमाणेच आता मंड्या जिल्ह्यातील सर्वांनाच 23 तारखेच्या मुलाखतीची अन् त्यानंतर येणाऱ्या आनंददायी वार्ताची उत्सुकता लागली आहे.

Actions

Selected media actions