काळेवाडीतील गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा – सोमनाथ तापकीर

काळेवाडीतील गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा - सोमनाथ तापकीर

काळेवाडी : रहदारी वाढली असून नागरिकरणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पाश्र्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व गुन्हेगारी थोपविण्यासाठी काळीवाडीतील गर्दीच्या मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, तसेच या कॅमेर्‍यांचे नियंत्रित काळेवाडी पोलिस चौकीत देण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत तापकीर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काळेवाडीतील प्रभाग क्रमांक २२, विजय नगर परिसरात महानगरपालिकेच्या निधीमधून नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या फक्त तीन चौकात एकूण सात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्याचे नियंत्रण काळेवाडी पोलीस चौकीत देण्यात आलेले आहे. परंतु अनेक गर्दीच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच काळेवाडीमध्ये दुहेरी हत्याकांडची घटना घडलेली आहे. त्याचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत, जर कॅमेरे त्या भागात असते, तर पोलीस यंत्रणेला तपासामध्ये सहकार्य झाले असते. परिणामी तपासाला वेग मिळून गुन्हेगारांना अटक करता आली असती.

शहरातील वाढती गुन्हेगारी थोपवण्यासाठी, प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी तसेच अशा घटना किंवा अनर्थाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून सर्व गर्दीच्या ठिकाणी, चौकाचौकात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे. म्हणून नागरिकांना एक प्रकारे सुरक्षा पुरवून सहकार्य व दिलासा मिळावा, यासाठी ही आग्रहाची मागणी करण्यात आली आहे.