- महात्मा फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन ऑनलाईन पध्दतीने साजरा
पिंपरी : “घोकंमपट्टीच्या पुढे जाऊन ज्ञानाचे उपयोजन, प्रकटीकरण केले पाहिजे. साक्षरतेसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहीजेत. शिक्षणासाठी दिला जाणारा निधी मोठ्या प्रमाणात वाढविला तरच साक्षरता मोहीम प्रभावी होऊ शकते. समाजासाठी, साक्षरतेसाठी प्राध्यापकांनी आपली सर्व संसाधने वापरली पाहिजेत” असे प्रतिपादन पुणे-गणेशखिंड येथील माॅडर्न काॅलेजचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी केले.
आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्ताने आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानविस्तार कार्यक्रम महात्मा फुले महाविद्यालय येथे आॅनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य खरात बोलत होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते प्राचार्य डॉ. खरात यांनी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची सुरुवात कशी झाली याची सविस्तर माहिती दिली व या सोबतच सद्या परिस्थितीतील भारतातील उच्च शिक्षण, साक्षरता अभियान व नवीन शैक्षणिक धोरण व त्यामाध्यमातून होणारा संभाव्य बदल याचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला.
आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रोफेसर डॉ. सतिश शिरसाठ यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून आपले विचार व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक, प्रोफेसर डाॅ. धनंजय लोखंडे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, “आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने समाजापर्यंत शिक्षण व त्यांचे महत्व पोहचविण्यासाठी विभागातील विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.”
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले की, “समाजाची प्रगती शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये कौशल्य विकसित करण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून हे कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.”
या ज्ञानविस्तार कार्यक्रमास प्रोफेसर डाॅ. विलास आढाव, प्राचार्य डाॅ. कैलास बहूले, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय सेवक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक डाॅ. दिनकर मुरकुटे यांनी केले. डाॅ. भारती यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डाॅ. कामायनी सुर्वे यांनी केले.