न्या. लोया मृत्यूप्रकरण तडीस नेऊ – निवृत्त न्या. कोळसे पाटील |अपना वतनचा “अन्नत्याग सत्याग्रह” तात्पुरता स्थगित

न्या. लोया मृत्यूप्रकरण तडीस नेऊ - निवृत्त न्या. कोळसे पाटील |अपना वतनचा "अन्नत्याग सत्याग्रह" तात्पुरता स्थगित

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : न्या. लोया प्रकरणात स्वतः लक्ष घालून न्यायालयीन मार्गाने हे प्रकरण तडीस नेहण्याच्या निवृत्त न्या. बी.जी. कोळसे पाटलांच्या आश्वासनाला मान देत अपना वतनचा “अन्नत्याग सत्याग्रह” तात्पुरता स्थगित करण्यात आला. न्या. लोया यांच्या संशयित मृत्यूची फेरचौकशी करण्यासाठी अपना वतन संघटनेच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शनिवारपासून (ता. ७) हे आंदोलन सुरू होते.

न्या. लोया यांच्या संशयित मृत्यूची फेरचौकशी करावी, या मागणीसाठी अपना वतन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, त्यास राज्य सरकारने प्रतिसाद न दिल्याने अपना वतन संघटनेच्या वतीने अन्नत्याग सत्याग्रह सुरु करण्यात आला होता. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी भेट दिली.

यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना न्या. लोया प्रकरणात स्वतः लक्ष घालून न्यायालयीन मार्गाने न्या. लोया प्रकरण तडीस नेहण्याचे आश्वासन देत आंदोलन थांबवण्याची विनंती केली. कोळसे पाटलांच्या या विनंतीला मान देत शहरातील सर्व पाठिंबा देणाऱ्या संघटनांच्या संमतीने अपना वतनचा “अन्नत्याग सत्याग्रह ” तात्पुरता स्थगित करण्यात आला. या आंदोलनास शहरातील ५० राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.

त्यावेळी कोळसे पाटील म्हणाले कि, देशामध्ये सर्व लोकशाही व्यवस्थांवर सत्ताधारी पक्षाकडून अप्रत्यक्षपणे हल्ले केले जात असून लोकशाही उध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे. मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी देशामध्ये अस्थिरता निर्माण करणायचा प्रयत्न सध्याचे केंद्र सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

याप्रसंगी न्या. बी.जी कोळसे पाटील यांच्या हस्ते संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख व हमीद शेख यांना लिंबू सरबत पाजून आंदोलन स्थगित करण्यात आले.

त्यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, राहुल डंबाळे, ऍड मोहन अडसूळ, ऍड किरण शिंदे, ऍड सिकंदर शेख, असलम शेख, राजश्री शिरवळकर, संगीत शहा, अनिता नायडू, प्रकाश पठारे, विशाल जाधव, सुरेश गायकवाड, सालार शेख, शहाबुद्दीन शेख, रौफ शेख, रशीद सय्यद, दीपक खैरनार, फारुख शेख, शिवशंकर उबाळे, तौफिक पठाण, मनोज मोरे, जावेद सौदागर, दिलीप रणपिसे, जमीर तांबोळी, संदीप साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.