अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लढणार भाजपच्या गोपाळ शेट्टीच्या विरोधात

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लढणार भाजपच्या गोपाळ शेट्टीच्या विरोधात

मुंबई ( दि. २९) – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे तगडे उमेदवार आव्हान परतवून लावण्यासाठी काँगेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. आज, शुक्रवारी अखिल भारतीय काँगेस कमिटीने दिल्लीतून याची घोषणा केली.
उत्तर मुंबईतून पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रविण छेडा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू होते. मात्र छेडा यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला. यामुळे निवडणुकीत चमत्कार घडवेल अशा उमेद्वाराच्या शोधत काँग्रेसचे नेते होते. निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र त्यांचा फारसा प्रभाव नसल्याने तीनच दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली.

उत्तर मुंबईतून २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी निरुपम यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. शेट्टी यांचा मतदारसंघातील प्रभाव पाहता त्यांच्या विरोधात लढण्याऐवज सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात असलेल्या निरुपम यांनी पक्षश्रेष्ठींकडून उत्तर-पश्‍चिम मुंबईतून उमेदवारी मिळविली. त्यासाठी त्यांना मुंबई काँग्रेसच अध्यक्षपदही गमवावे लागले.

उर्मिलाने गेल्या बुधवारी नवी दिल्‍ली येथे काँग्रेस अध्‍यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन जाहीरपणे काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला होता. सन २००४ साली भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार राम नाईक यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने अशाचप्रकारे अभिनेता गोविंदा आहुजा याना मैदानात उतरविले होते. तिच राजकीय खेळी करून खा. शेट्टीविरोधात अभिनेत्री उर्मिला मातोडकर यांना रिंगणात उभे केले असल्याचे उत्तर मुंबईतील राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

उत्तर मुंबई मतदार संघ हा दहिसर ते मालाडपर्यंत विभागलेला आहे. या मतदार संघात मराठी, उत्तर भारतीय, मुस्लीम, तमिळ, गुजराती आणि मारवाडी असे मिश्रित मतदार आहेत. यामुळे या सर्वांची मते निर्णायक ठरतात.