औंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील मराठी विभागाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ विविध उपक्रमांनी साजरा केला.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मराठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे, पश्चिम विभागीय अध्यक्ष अँड.राम काडंगे साहेब व माजी विद्यार्थी सूर्यकांत सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयातील ३०० विद्यार्थीनी सहभाग घेतला..
विद्यार्थ्यांनी पु. ल. देशपांडे लिखित ‘विठ्ठल तो आला आला’ या एकांकिकेचे ऑनलाईन वाचन केले. यामध्ये महाविद्यालयातील अक्षय होळकर (विठ्ठल), आकाश टेंभुर्णीकर(भटजी), चंद्रकांत सोनवणे(वकील), सुयोग भोसले(डॉक्टर), परमेश्वर रिठे(शेठजी), हर्षद जानराव(मास्तर), कोमल जाविर(सखुबाई), रेणूका मीठे(द्वारकाबाई), अरुणा साबळे(गायिका), अविनाश पांडे(शिंपी), तेजस राजीवडे(आंधळा), गोविंद गायकवाड(जगन्नाथ), सचिन शेळके (सोमनाथ) या विद्यार्थ्यांनी अभिवाचन केले. डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ताथवडे येथील प्रा.वैशाली ढोले यांनी “मराठी म्हणीतील दडलेले मानसशास्त्र” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
‘मराठी भाषा व भाषिक कौशल्य विकास कार्यशाळेचे’ बीजभाषक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.शिरीष लांडगे-पाटील म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या संवादाचे कौशल्य निर्माण व्हावे. यासाठी त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने मराठी, हिंदी आणि उर्दू भाषेकडे संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून पहायला पाहिजे. व्यक्ती आपल्या मातृभाषेमधून अधिक प्रभावीपणे संवाद करू शकते. त्यामुळे व्यक्तीने संवादासाठी मातृभाषेचा वापर करायला पाहिजे. तसेच जगातील इतर व्यक्तींशी संवाद करण्यासाठी इतर भाषाही शिकणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी न्यू आर्ट्स, अँड सायन्स कॉलेज पारनेर येथील डॉ. हरेष शेळके यांनी ‘मराठी भाषिक संज्ञापन कौशल्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी पा.वावरे महाविद्यालय, सिडको, नाशिक येथील डॉ.राहुल पाटील यांनी ‘प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्य’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब म्हणाले भाषा ही मानवाला जगण्यासाठीचे मूल्य देते. भाषेमधील प्रत्येक शब्दात कौशल्य दडलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ते कौशल्य आत्मसात करून, त्याचा वापर व्यक्तिमत्व विकासासाठी करायला पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागाच्या अभ्यास मंडळाने काळाची पावले ओळखून विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू करून, विद्यार्थी हिताला चालना दिल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख मराठी विभागप्रमुख व उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी करून दिली. तर आभार डॉ. अतुल चौरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अविनाश जाधव व प्रा.मिनाक्षी कापरे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डाॅ.रमेश रणदिवे, डाॅ.राजेंद्र रासकर, प्रा.सुशीलकुमार गुजर, प्रा. एकनाथ झावरे, प्रा.भीमराव पाटील, प्रा. नलिनी पाचर्णे आणि बहुसंख्येने विद्यार्थीवर्ग ऑनलाईन उपस्थित होता.