ब्रह्माकुमारीज परिवाराच्या वतीने पत्रकारांचा सपत्नीक सत्कार

रिसोड/प्रतिनिधी शंकर सदार :- स्थानिक सिव्हिल लाईन स्थित ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने रिसोड शहरासह तालुक्यातील अधिकृत प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दीना निमित्ताने ब्रह्माकुमारीज मीडिया विंग सदस्य रवि अंभोरे यांच्या पुढाकाराने व ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राच्या संचलिका ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली 6 जानेवारी शनिवारी सकाळी 9 वाजता पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर तर सत्कार मुर्ती म्हणून सर्व प्रतिष्ठित पत्रकार उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तहसीलदार तेजनकर, ब्रह्माकुमारी ज्योती दीदी, जेष्ठ पत्रकार शंकरराव हजारे, पी डी पाटील, जयंत वसमतकर, ताराचंद वर्मा,मोहनराव देशमुख या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सारिका वाघमारे यांनी ईश्वरीय संदेश देणारे सुंदर गीत गायन करून कार्यक्रमाची अधिक शोभा वाढवीली. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर आणि ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांच्या शुभहस्ते उपस्थित पत्रकारांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. ब्रह्माकुमारीज मीडिया विंग सदस्य रवि अंभोरे यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना ब्रह्माकुमारीज विद्यालय करीत असलेल्या सामाजिक उपक्रमाविषयक माहिती दिली. पत्रकारांचे कार्य हे सामाजिक सदभाव,अध्यात्मिक विकास आणि सकारात्मक समाजनिर्मिती करण्यासाठी बांधील आहे.

प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार तेजनकर यांनी रिसोड शहरात ब्रह्माकुमारीज सेवा केंद्र करीत असलेल्या कार्याचा विशेष गौरव केला. लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत सर्वाना दैनंदिन जीवनात ताण तणावाचा सामना करावा लागतो त्यामुळे कुटुंबातील मानसिक स्वास्थ बिघडत चालले आहे त्यासाठी उपचार म्हणून ब्रह्माकुमारीज सेवा केंद्रातून दिले जाणारे ज्ञान उपयुक्त आहे. शहरातील व तालुक्यातील पत्रकारा सह सर्वांनी ब्राह्मकुमारीज च्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ब्रह्मा कुमारी ज्योती दीदींनी बहुतांश पत्रकार सत्कार स्वीकारण्यासाठी सपत्नीक आल्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद दिले. भारतीय लोकशाहीचे प्रसार माध्यम चौथा आधारस्तंभ असून निःस्वार्थ पणे समाजकार्य करणारा, समाजाला न्याय मिळवून देणारा महत्वाचा घटक आहे. समाजपरिवर्तनाची दिशा निश्चित करण्याची फार मोठी शक्ती प्रसार माध्यमात आहे त्या दिव्य शक्तीचा उपयोग समाजहितासाठी अधिक सजग राहून व समर्थपणे करावा असा आशावाद दीदींनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट संचालन ब्राह्मकुमारी गीता दीदींनी केले तर आभार मीडिया विंग सदस्य रवि अंभोरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी वंदना दीदी,कु.पूजा डाखोरे,भगवान भाई काळे, तुकाराम फुके, पुरुषोत्तम भाऊ,ज्ञानेश्वर भाऊ इत्यादी सह ब्रह्माकुमारीज परिवारातील ज्ञानार्थी भाऊ बहिणींनी विशेष सहकार्य केले.