संकेत मुनोत
विवेचनातील मुद्दे
- जागतिक प्रभाव
- स्वातंत्र्य फक्त गांधींमुळे मिळालं का?
- गांधीजी -जात आणि धर्म
- भगतसिंग आणि क्रांतिकारकांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न
- गांधींना महापुरुषाबद्दल आदर
- देशाच्या फाळणीला गांधींचा विरोध
- गांधीहत्येचे कारण
- पाकिस्तानला पैसे देण्यासाठी आंदोलन नव्हते
- गांधींचे आध्यात्म
- नेहरू की पटेल पंतप्रधान
- स्त्रियांचे सक्षमीकरण
- मुस्लिमांवरील प्रभाव
आज गांधी जयंती ज्या माणसाला लहाणपणी मी टकल्या, म्हातार्या, मजबूरी वगैरे काय काय म्हणायचो त्याच्याविषयी थोडेसे. प्रेयसीवर अँसिड फेकणाऱ्या तरुणाला जर प्रेमवीर म्हणायचं असेल तर गांधीजीचा खुन करणाऱ्या नथुरामलाही देशभक्त म्हणता येईल.
सध्या सोशल मीडियावर नथुराम आणि गांधी हत्त्या या संदर्भात विपर्यस्त मजकूर नथुरामभक्त मोठ्या प्रमाणात पोस्ट करीत असून त्याद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्त्या करून फासावर गेलेल्या एका गुन्हेगाराच्या गुन्ह्याचे उदात्तीकरण केले जाते आहे. कुणाला फाळणी, पन्नास कोटी, मुस्लिमअनुनय अशी करणे सापडतात तर कुणाला पुणे करार आठवतो. गांधीला झोडपण्यासाठी काहीना भगतसिंग, सुभाषबाबू, सरदार पटेल ह्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवावी लागते तर कुणाला आंबेडकरांचा खांद्याची गरज भासते.
आपल्या शेवटच्या भाषणात आपण गांधीहत्त्या का केली याचे १५ मुद्दे नथुरामने सांगितले होते, असे हे मेसेज पाठवणारे विकृत लोक सांगतात. हे सर्व खोटे मुद्दे जुनेच आहेत, पण ते पुन्हा-पुन्हा सांगून महात्मा गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातील काही मुद्यांचा येथे परामर्ष घेत आहे.
१) जागतिक प्रभाव :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अँप्पल चे मुख्य स्टिव्ह जॉब्स, विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिन, दक्षिण आफ्रिकेचे राष्टाध्यक्ष नेल्सन मंडेला आणि जगातल्या कितीतरी लोकांनी त्यांच्या आयुष्यात गांधीविचारांची प्रेरणा असल्याचे कबूल केले आणि जागतिक परिवर्तन घडवून दाखवले.अल्बर्ट आईन्स्टाईन या थोर वैज्ञानिकांने म्हटलेच आहे की ‘’ येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत कि असा कोणी हाडा मांसाचा माणूस या पृथ्वीतलावर वावरत होता’’ आणि होय आईन्स्टाईनच्या इतर सिद्धांताप्रमाणे हाही सिद्धांत खरा ठरतो की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आज आहे.
२) स्वातंत्र्य फक्त गांधींमुळे मिळालं का? :
अस कोणीही म्हणत नाही की स्वातंत्र्य फक्त गांधींमुळे मिळाले. पण हे राष्ट्र घडवण्यात , सर्व जाती-पाती, धर्म च्या लोकांना एकत्र आणण्यात, कोट्यवधी सामान्य माणसांना इंग्रजांविरुद्ध निर्भयपणे लढण्यास प्रेरणा देणारे ते होते त्यामुळे ते स्वातंत्र्य लढ्याचे नायक ठरतात.आणि हे त्याकाळचे सर्वच नेते मान्य करतात. नेताजी बोस त्यामुळेच त्यांना राष्ट्रपिता म्हणतात आणि आझाद हिंद सेनेत ही बहुतेक कार्यक्रमानंतर ‘महात्मा गांधी की जय’ म्हटले जाते. जसे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की सगळे मावळे त्यात येतात त्यात वेगवेगळ्या मावळ्यांची वेगळी नावे घेऊन जय म्हणण्याची गरज पडत नाही तसेच महात्मा गांधी की जय म्हटलं की त्याकाळचे सगळेच स्वातंत्र्यसैनिक येतात.
पूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याचे पंतप्रधान चर्चिल म्हणाले होते कि “या गांधीला जर जनरल स्मट्स ने आफ्रिकेतील तुरुंगातच संपवले असते तर ब्रिटिशांचे जगावर राज्य अजून काही दशके टिकले असते” शिवाय “भारताला स्वातंत्र्य दिले तर 10 वर्षात भारताचे तुकडे तुकडे होऊन हा देश बेचिराख होईल” असेही त्यांचे म्हणणे होते पण स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरी आपण आजही एकत्र आहोत आणि लोकशाही टिकून आहे ती या गांधींविचारांमुळेच.
३) गांधीजी -जात आणि धर्म :
गांधीजींनी कोणत्याही जातिचे वा धर्माचे अतिरेकी समर्थन केले नाही म्हणून सर्व जाती / धर्मातील कट्टरवादी लोक त्यांचा द्वेष करतात. एका जातीतील कट्टर लोकांना पुणे करारामुळे गांधीजी ब्राम्हणधार्जिणे आणि दलितद्वेष्टे (मनुवादी) वाटतात. एका जातीतील काही कट्टर लोकांना गांधी ब्राम्हणद्वेष्टे दलित धार्जिणे वाटतात कारण जिथे एका जातीचे वर्चस्व होते अशी सर्व ठिकाणे राजकारण, समाजकारण व इतर अनेक गांधीजींनी अस्पृश्यता निवारण चळवळीद्वारे त्या जातीचे वर्चस्व संपवून सर्वांना त्यात पुढे आणले. पाकिस्तानमधील काही कट्टर मुस्लिमांनाही आम्हाला छोटा पाकिस्तान दिला,काश्मीर दिला नाही वगैरे कारणावरून गांधी मुस्लिमद्वेष्टे व हिंदुधार्जिणे वाटतात.
त्यामुळे गांधीजींच्या मागे त्यांचा उदो उदो वा देव करणारी कोणताही जातसमूह नाही. जेवढी टिंगल गांधीजींची उडवली जाते त्याच्या एक टक्का जरी इतर कोणत्या महापुरुषांची झाली असती तर दंगली झाल्या असत्या, पण कुठल्याही जातीचा , धर्माचा, पंथाचा आधार न घेता ते जगभर पोहचले या उलट इतर जातींच्या महापुरुषांना त्यांच्याच जातीच्या लोकांनी स्वतःपुरते संकुचित करून ठेवले. काही महापुरुषाचे गुणगान करताना किंवा चरित्र लिहितांना गांधीजींना कमी लेखावेच लागते त्याशिवाय यांचा महापुरुष मोठा होत नाही.याउलट गांधींचे वर्णन करताना कोणाला कमी लेखायची गरज नाही. गांधीजीनी स्वतःच्या चरित्रात इतर कुणाही पेक्षा स्वतःलाच कमी लेखले आहे.
४) भगतसिंग आणि क्रांतिकारकांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न
भगत सिंह, सुखदेव व राजगुरू या तीन देशभक्त क्रांतिकारक तरुणांना ब्रिटिशांनी फाशी दिली. त्यावेळी गांधीजी काय करत होते? हा प्रश्न विचारला जातो चित्रपटात तर गांधींजींनीच ब्रिटिशांना लवकर फाशी द्या म्हणून सांगितले असे काही दाखवले आहे.
पण सत्य असे आहे की, भगतसिंग आणि क्रांतिकारकांचे प्राण वाचावे यासाठी गांधी गव्हर्नर जनरल आयर्विन यास भेटले व फाशीची शिक्षा अमलात न आणण्याची विनंती केली. शिक्षेच्या एक दिवस आधी त्यांनी आपले सर्व भाषिक कौशल्य पणाला लावून पत्र लिहून अगदी येशू ख्रिस्ताचा दाखला देऊनही शिक्षा माफ करण्याची विनंती केली, पण त्यास न जुमानता फाशी अंमलात आणली गेली. ब्रिटिश गांधीजींचे सहज ऐकणारे असते तर गांधी म्हटले असते “चले जाव” आणि ब्रिटिश निघून गेले असते. तसे मग ब्रिटिशांनी कस्तुरबांच्या आरोग्याची मुद्दामून गैरसोय करून त्यांची हत्या ही केली नसती.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भगतसिंग आणि त्याचे सहकारी हौतात्म्यासाठी खूपच अधीर झाले होते. त्यांना माफी नकोच होती, म्हणून तर त्यांनी खटल्या दरम्यान बचावाचा प्रयत्न केला नाही. वीर भगतसिंग यांनी स्वतःच्या पालकांना ही खडसावुन शिक्षा माफ करण्यासाठी कुठलेही प्रयत्न करू नका असे सांगितले.आमच्या हुतात्मा जाण्याने हजारो तरुणांना स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा मिळेल असे ते म्हणत.
५) गांधींना महापुरुषाबद्दल आदर
छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि गुरू गोविंदसिंग या थोर पुरुषांबद्दल गांधींच्या मनामध्ये आदरच होता. त्यांचा विरोध या थोर पुरुषांची नावे घेऊन हिंसेचा प्रचार करणाऱ्या लोकांना होता.
६) देशाच्या फाळणीला गांधींचा विरोध
भारताची फाळणी करण्याचा निर्णय ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचा होता. पण शेवटपर्यंत तिला विरोध करण्याचा प्रयत्न गांधींनी केला. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांची अनुकूल भूमिका, मुस्लिम आणि हिंदुमधील काही कट्टरवादी संघटना यांनी घडवून आणलेला हिंसाचार, मना-मनात पेरलेले विष, देशात वाढत चाललेली जातीय हिंसा व त्यातून निर्माण होऊ शकणारे अराजक याचा विचार करून जींना, वल्लभभाई पटेल, नेहरू, मौलाना आझाद यांनी फाळणीचा निर्णय स्वीकारला. कॉँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीमध्ये गांधींनी त्यास विरोध केला आणि शेवटी बैठक सोडून ते निघून गेले. फाळणीचे खरे श्रेय जाते ते जींना, सावरकर, हेडगेवार, गोळवलकर अश्या लोकांना आणि त्यांच्या हिंदू महासभा, मुस्लिम लीग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सारख्या संघटनांना ज्यांनी या देशात ब्रिटिश विरोधापेक्षा धार्मिक विरोध महत्वाचा मानला. यात विशेष म्हणजे जेव्हा पूर्ण देश ब्रिटिशांविरुद्ध लढत होता तेव्हा हिंदू महासभा, मुस्लिम लीग यांनी ब्रिटिशांना समर्थन करत युती करत सरकार स्थापन केले होते.
७) गांधीहत्येचे कारण :
गांधीहत्येबद्दल 55 कोटी, फाळणी आदी काही खोटी कारणे सांगितली जातात पण हे सत्य नाही. फाळणीला शेवटपर्यत विरोध करणारे एकमेव गांधीजींच होते तर त्यांचे उपोषण हे 55 कोटींसाठी नसून दंगली थांबाव्यात यासाठी होते.सरकारने 55 कोटी देण्याचे कबूल केले तरी ते उपोषण थांबले नव्हते. दंगल थांबली तेव्हा त्यांनी उपोषण मागे घेतले. गांधीहत्येचे मुख्य कारण होते त्यांचे सर्वसमावेशक धोरण. जे कार्य हजारो वर्षांपूर्वी भ महावीर व म. बुद्धांनी केले तेच काम थोडे आणखी पुढे जाऊन गांधीजींनी आत्ता केले ते म्हणजे धर्म, राजकारण , शिक्षण, अर्थकारण , समाजकारण आदी सगळीकडे एका वर्गाची मक्तेदारी, वर्चस्व मोडून काढून ते सामान्य माणसासाठी खुले केले. गांधीजींच्या उदयापूर्वी राजकारण धर्मकारण आदी ठिकाणी मुख्यतः उच्चवर्णीय लोकांची मक्तेदारी होती ज्यामुळे त्यांची हत्या झाली. गांधीजींवर पहिला हल्ला पुण्यात जून1934 मध्ये ते अस्पृश्यता निवारण चळवळीचे कार्य करत असतांना झाला जेव्हा 55 कोटी, फाळणी इ गोष्टी ही अस्तित्वात नव्हत्या. सनातनी लोकांनी गांधीजींच्या सर्वांना मंदिरे खुली करा या मोहिमेला विरोध करण्यासाठी तो हल्ला घडवला होता.त्यानंतरही अनेक हल्ले झाले. गांधीजींनी हे राष्ट्र शतकानुशतके राजकीयदृष्ट्या झोपलेल्या बहुजनांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव निर्माण करून लोकशाही स्थापित करून त्यांच्या हाती हे सोपवले. त्यामुळे सनातनी चिडले होते .आणि हत्या त्यामुृळे झाली होती.
८) पाकिस्तानला पैसे देण्यासाठी आंदोलन नव्हते
भारत आणि पाकिस्तान यामध्ये फाळणी झाली तेव्हां मालमत्तेचे वाटप करण्यात आले. भारतात २४ शस्त्रास्त्र निर्मिती करणारे कारखाने होते. त्यातील काही कारखाने पाकिस्तानला देण्याऐवजी त्यांची किंमत म्हणून ७० कोटी रुपये द्यावे असे ठरले. त्यातील २० कोटी रुपये सरकारने दिले व ५५ कोटी रुपये द्यावयाचे होते. काश्मीरचे युद्ध सुरू झाल्यानंतर सरकारने रक्कम देण्याचे पुढे ढकलले. कराराप्रमाणे भारताने ही रक्कम पाकिस्तानला द्यावीच लागणार होती नाहीतर आंतरराष्ट्रीय (UNO) दबाव येऊन भारताला ते द्यावेच लागले असते भारताची जगभर नालस्ती झाली असती असे गांधींचे म्हणणे होते. जानेवारी १९४८ मध्ये गांधींनी केलेले उपोषण हे जातीय सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी होते, पाकिस्तानला ५५ कोटी रुपये मिळावेत यासाठी नव्हते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण 55 कोटीं देण्याचे सरकारने मान्य केल्यावरही अनेक दिवस गांधीजींचे उपोषण चालू होते. जे सामजिक सलोखा निर्माण करणे व दंगली थांबवणे हे होते आणि दंगली थांबल्यावरच गांधीजींचे उपोषण थांबले.
९) गांधींचे आध्यात्म
काही मंडळी गांधीजी धार्मिक होते आणि आम्ही धर्म मानत नाही म्हणत गांधींचा विरोध करतात. गांधीजींचे अध्यात्म हे धार्मिक अथवा साक्षात्कारी नव्हते. त्याला सामाजिक परिमाणे होती. समाजाची सेवा, निसर्गाचे रक्षण, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्याची काळजी हे त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिगत त्याग व व्यक्तिगत विकास यातून समाजाच्या हिताचा व्यापक विचार त्यांनी मांडला होता. एकाही डोळ्यातून एकही अश्रू निघू नये, गरिबी, अन्याय, विषमता यांचे उच्चाटन व्हावे, हीच त्यांची जीवनदृष्टी होती, हेच त्यांचे अध्यात्म होते आणि हाच त्यांचा परमार्थ होता. स्वातंत्र्याचा उल्लेख करणाऱ्यांनी स्वातंत्र्याकडे कसे पाहावे, याची दृष्टी गांधीजींच्या आचरणातून मिळते..
१०) नेहरू की पटेल पंतप्रधान :
पं. नेहरू हे कॉँग्रेसचे तरुण आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरचे सर्वांत लोकप्रिय नेते होते. १९३० च्या निवडणुकीत हे सिद्ध झाले होते. नेहरूंनी पंतप्रधान व्हावे हे पटेलांनीही मान्य केले होते व कॉँग्रेस संसदीय पक्षाने त्यांची एकमताने निवड केली होती. पटेल जास्त आजारी असत ज्यामुळे गांधी स्वतः त्यांची काळजी घेत. आज जे लोक नेहरू नव्हे पटेल असे सांगतात जर पटेल पंतप्रधान असते तर तेच लोक पटेल नव्हे नेहरूंना पंतप्रधान करायला हवे होते असे म्हणाले असते.
११) स्त्रियांचे सक्षमीकरण :
जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात पुरुष कार्य करतात त्या त्या क्षेत्रात स्त्रिया कार्य करू शकतात; स्त्रियांना कार्य करता आले पाहिजे आणि स्त्रियांनी कार्य केले पाहिजे हा गांधीजींचा आग्रह होता. त्यामुळेच त्यांनी स्त्रियांसाठी खास असे काही कार्यक्रम राबवले नसले तरी त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांची योजनाच अशी असायची की त्यात स्त्रियांचा सहभाग आवश्यक असे. एकदा बिहारमध्ये त्यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते, आपल्या पूर्ण देशामध्ये स्त्रियांना चूल, मुल पदर आणि बुरखा एवढ्या पुरतेच मर्यादित ठेवले जाई बिहार मध्ये तर स्त्रियांवर अजून काही बंधने होती असे असताना गांधीजींनी अट घातली कि कार्यक्रमात स्त्रियांची ही संख्या असली तरच मी कार्यक्रमाला येणार आणि तेथे तो चमत्कार घडला सुद्धा. आपली भारतीय राज्यघटना तयार करण्यात अनेक गांधीवादी स्त्रियांचे मोठे योगदान आहे.स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी अनेक विकसित देशांना भांडावे लागले. आपल्या भारतात ते स्वातंत्र्यासोबतच मिळाले त्याला कारण गांधींनी तयार केलेली मानसिकता.
१२) मुस्लिमांवरील प्रभाव :
अफगाणिस्तान-पख्तुनिस्तान-नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स येथील प्रदेश जेथे प्रत्येक घरामध्ये बंदुका, मशीनगन्स, हँडग्रेनेड्स होत्या, वयाच्या 10-12 वर्षांपासून प्रत्येक मुलाला खांद्यावर बंदूक बाळगायची सहज सवय होती, अलेक्झांडरपासून ते अरबांपर्यंत, मोगलांपासून ते ब्रिटिशांपर्यंत आणि सोव्हिएत युनियनपासून ते अमेरिकेपर्यंत अनेकांनी या प्रदेशाला (म्हणजेच येथील डोंगरी-वाळवंटी जीवन जगणा-या टोळ्यांना) आपल्या कब्जात आणण्याचे प्रयत्न केले. पण येथील लोकांची स्वाभिमानाची भावना इतकी तीव्र, इतकी उग्र आणि इतकी तेजस्वी की, त्यांना कुणीही नामोहरम करू शकलेले नाही. त्या बंदुका, त्या मशीनगन्स, ती बेदरकारी हे सर्व त्या स्वाभिमानाचे आविष्कार. खांद्यावरची मशीनगन म्हणजे, पठाणी टोळ्यांच्या पुरुषार्थाने झळझळणारे प्रतीक.बादशाह खान उर्फ खान अब्दुल गफार खान हे या प्रदेशातील एका उमराव कुटुंबातील, जवळजवळ सव्वासहा फूट उंची, पिळदार शरीर, तडफदार चेहरा, तेजस्वी डोळे. तशीच लढाऊ वृत्ती आणि धडाडी. केव्हाही मरायला वा मारायला सज्ज.अशा व्यक्तीला आणि त्या उग्र, धगधगत्या वातावरणात अहिंसेचा विचार सुचावा, हेच आश्चर्य. त्याहून महद् आश्चर्य म्हणजे, तो विचार एक लाखाहून अधिक पठाणांना पटवून देण्यात त्यांना आलेले यश. बादशाह खान यांच्या ‘खुदाई खिदमतगार’मध्ये एक लाखाहून अधिक अहिंसाव्रती सामील व्हावे, यावरूनच इस्लामचा शांतता व प्रेमाचा संदेश त्या प्रांतातील जहाल इस्लामपंथीयांना पटला होता.
आइनस्टाईन म्हणाले होते, की, ‘गांधींसारखी महान व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही.’
अहिंसक किंवा सशस्त्र दोन्ही प्रकारे लढा देणारी माणसं गांधीजी ना प्रेरणादायकच मानत होती. कारण, आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर ही नेताजींनी त्यात ज्या 2तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते व आकाशवाणीवरून गांधीजीना #राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी #सुभाषचंद्र_बोसच होते. शहीदेआजम #भगतसिंगांनीही तुरुंगामध्ये ऊपोषण केले होते. काही मतभेद असले तरी त्यांच्यामध्येही गांधीजीबद्दल आदरच होता. पण ज्या गोडसेनी वा माफीवीरांनी ना #अहिंसक ना #सशस्त्र क्रांतीत कुठेही भाग घेतला नाही व नुसतीच हिंसक व ज्वलंत भाषणे दिली अशा निष्क्रिय माणसांनी तेव्हाही द्वेश व अफवा पसरवण्याचे कार्य केले व आजही तेच करत आहेत असल्या खोट्या अफवांपासुन सावध रहा
मित्रांनो गांधी समजुनच घ्यायचे असतील तर डॉ #अभय_बंग, #प्रकाश_बाबा_आमटे, #दलाई_लामा, #सत्यार्थी #मलाला, #मार्टिन_ल्युथर_किंग असे कोट्यावधी लोक ज्यांनी गांधीविचारातुन आपले आयुष्य समर्पित केले त्यांच्यासोबत काही क्षण राहुन पहा मंडेला, आईनस्टाईन यांना ऊमजलेले गांधीजी, य दि फडकेंचे नथुरामायण, महात्म्याची अखेरb(जगन फडणीस), freedome at midnight वाचा. धर्म, जात-पात, गट यांच्या अफवांना बळी पडु नका.
नास्तिक असो वा आस्तिक, स्त्री असो वा पुरुष , हिंदु असो वा मुस्लिम वा कोणत्याही धर्माचा, शेतकरी असो वा व्यापारी , ऊच्च शिक्षित असो वा अशिक्षित, लहान/तरुण असो वा वयस्कर त्याकाळात अशा कोट्यावधी लोकांचा लोकमान्य नेता गांधी हेच होते. मित्रांनो तुम्ही जर नाही समजुन घेतल तर त्याच काहीच बिगडत नाही पण त्यात तुमचेच अडाणीपण दिसुन येते